व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मंदिरातील सेवाकार्य पूर्ण करणे

मंदिरातील सेवाकार्य पूर्ण करणे

अध्याय ११०

मंदिरातील सेवाकार्य पूर्ण करणे

येशू मंदिरात आपली शेवटली उपस्थिती देत आहे. वास्तविक तीन दिवसानंतर होणारी त्याची चौकशी व प्राणदंड या घटनांव्यतिरिक्‍त पृथ्वीवरील त्याच्या सेवाकार्याचा तो समारोप करीत आहे. आता तो शास्त्री व परुशांवर कडक टीका पुढे बोलतो.

आणखी तीन वेळा, “अहो शास्त्र्यांनो, अहो परुश्‍यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार!” असे उद्‌गार तो काढतो. प्रथम, ते ‘ताटवाटी बाहेरुन साफ करतात पण ते आतून जुलूम व असंयमाने भरलेले’ असल्यामुळे तो त्यांजवर येणाऱ्‍या पीडेचा उच्चार करतो. तेव्हा तो त्यांना ताकीद देतोः “पहिल्याने वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरुनही साफ होईल.”

यानंतर, देवनिष्ठेच्या देखाव्याखाली, आतला कुजकेपणा व नासकेपणा झाकण्याचा प्रयत्न करण्याबद्दल तो शास्त्री व परुशांवर येणाऱ्‍या पीडेचा उच्चार करतो. तो म्हणतोः “तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहा. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत.”

शेवटी, औदार्याच्या आपल्या कृत्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संदेष्ट्यांच्या कबरा बांधण्याच्या व त्या सजवण्याच्या त्यांच्या तयारीमधून त्यांचे ढोंग दिसून येते. तरीपण येशूने प्रकट केल्याप्रमाणे ते “संदेष्ट्याचा घात करणाऱ्‍यांचे पुत्र” आहेत. खरोखर, त्यांचा ढोंगीपणा उघड करण्यास धजावणाऱ्‍याची धडगत नाही!

पुढे जाता येशू दोषारोपांच्या सर्वात कडक शब्दांचा उच्चार करतो. तो म्हणतोः “सापांनो, सापाच्या पिलांनो, तुम्ही गेहेन्‍नाचा दंड कसा चुकवाल?” (न्यू.व.) यरुशलेम शहराचा कचरा-कुंड म्हणून गेहेन्‍नाची दरी वापरली जाते. तेव्हा, दुष्टतेचा मार्ग अनुसरल्याने शास्त्री व परुशांना सार्वकालिक नाश भोगावा लागेल, असे येशू म्हणत आहे.

स्वतःचे प्रतिनिधी म्हणून ज्यांना तो पाठवतो, त्यांच्याबद्दल येशू म्हणतोः “तुम्ही त्यांच्यातील कित्येकांस जिवे माराल व वधस्तंभावर खिळाल, आणि कित्येकांस तुम्ही आपल्या सभास्थानामध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल. ह्‍यासाठी की, नीतीमान हाबेल ह्‍याच्या रक्‍तापासून, वेदी व पवित्रस्थान ह्‍यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्‍या ह्‍याच्या रक्‍तापर्यंत जे सर्व नीतीमान लोकांचे रक्‍त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा. मी तुम्हास खचित सांगतो की, ह्‍या सर्व गोष्टी या पिढीवर येतील.”

जखऱ्‍याने इस्राएलांच्या नेत्यांची अशी खरडपट्टी काढल्याने “त्यांनी त्याजविरुद्ध कट करून राजाज्ञेने यहोवाच्या मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केला.” परंतु येशू भाकित करतो तसे अशा सांडलेल्या सर्व नीतीमान रक्‍तासाठी इस्राएलांना किंमत मोजावी लागेल. ३७ वर्षानंतर इ. स. ७० मध्ये रोमी सैन्याने यरुशलेमाचा नाश केल्यावर व दहा लाखावर यहुदी मरण पावल्यावर ती किंमत चुकती होते.

अशा या भीतीदायक परिस्थितीचा विचार करून येशूला दुःख होते. तो पुन्हा म्हणतोः “यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्‍ये व तुझ्याकडे पाठविलेल्यांस धोंडमार करणाऱ्‍ये! जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची नव्हती! पहा, तुमचे घर तुम्हावर ओसाड सोडले आहे.”

मग, येशू पुढे म्हणतोः “आतापासून ‘यहोवाच्या नावाने येणारा धन्यवादित’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.” ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या वेळी तो आपल्या स्वर्गीय राज्यात आल्यावर आणि विश्‍वास-चक्षूंनी लोक त्याला पाहतील तेव्हा तो दिवस असेल.

आता जेथून मंदिरातील भांडार व त्यामध्ये पैसे टाकणारे लोक दिसू शकतात अशा जागी येशू येतो. श्रीमंत लोक अनेक नाणी भांडारात टाकतात. पण त्यानंतर एक गरीब विधवा येते व ती अतिशय कमी किमतीची दोन नाणी त्यात टाकते.

आपल्या शिष्यांना जवळ बोलावून येशू म्हणतोः “मी तुम्हाला खचित सांगतो की, हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत, त्या सर्वांच्यापेक्षा ह्‍या गरीब विधवेने अधिक टाकले आहे.” हे कसे असा प्रश्‍न त्यांना पडला असणार. या कारणास्तव येशू खुलासा करतोः “कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले. परंतु हिने तर आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजिविका टाकली.” या गोष्टी बोलल्यावर येशू मंदिरातून जातो.

मंदिराचा आकार व सौंदर्य याबद्दल नवल व्यक्‍त करीत त्याचा एक शिष्य म्हणतोः “गुरुजी, पहा कसे हे चिरे व कशा ह्‍या इमारती!” खरोखरच, असे म्हणतात की ते दगड ११ मीटर्स लांब, ५ मीटर्सहून जास्त रुंद व ३ मीटर्सपेक्षा अधिक उंच आहेत!

येशू उत्तर देतोः “ह्‍या इमारती तू पाहतोस ना? जमीनदोस्त केला जाणार नाही असा येथे चिऱ्‍यावर चिरा राहणार नाही.”

असे बोलल्यावर येशू आणि त्याचे शिष्य किद्रोन नदी पार करून जैतुनाच्या डोंगरावर चढतात. येथून ते खालच्या त्या भव्य मंदिराकडे पाहू शकतात. मत्तय २३:२५–२४:३; मार्क १२:४१–१३:३; लूक २१:१-६; २ इतिहास २४:२०-२२.

▪ मंदिराला दिलेल्या शेवटच्या भेटीमध्ये येशू काय करतो?

▪ शास्त्री व परुशांचा ढोंगीपणा कसा दिसून येतो?

▪ “गेहेन्‍नाचा दंड” याचा अर्थ काय?

▪ विधवेने श्रीमंतांपेक्षा अधिक दिले असे येशू का म्हणतो?