व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मंदिराला पुन्हा भेट देणे

मंदिराला पुन्हा भेट देणे

अध्याय १०३

मंदिराला पुन्हा भेट देणे

यरीहोहून आल्यापासून येशू व त्याच्या शिष्यांनी बेथानीमध्ये नुकतीच तिसरी रात्र घालवली आहे. आता, सोमवार, निसान १० च्या पहाटेलाच ते यरुशलेमाच्या मार्गाला लागले आहेत. येशूला भूक लागली आहे. पानांनी भरलेले अंजिराचे झाड त्याच्या दृष्टीला येताच त्यावर अंजिरे आहेत किंवा कसे हे पाहण्यासाठी तो त्या झाडाकडे जातो.

अंजिराचा मोसम जूनपर्यंत येत नाही आणि सध्या मार्च महिन्याचा शेवट आहे. तेव्हा त्या झाडाला मोसमापूर्वीच पाने आलेली आहेत. परंतु लवकर पाने आली असल्यास अंजिरेही लवकर आली असतील असे येशूला वाटते हे उघड आहे. पण त्याचा अपेक्षाभंग होतो. पानांनी त्या झाडाला फसवे स्वरुप दिले आहे. मग, “कोणीही ह्‍यापुढे तुझे फळ कधीही न खावो,” असे म्हणून येशू त्या झाडाला शाप देतो. येशूच्या कृतीचा परिणाम व त्याचे महत्त्व दुसऱ्‍या दिवशी सकाळी समजते.

पुढे जाता, येशू व त्याचे शिष्य लवकरच यरुशलेमला पोहोचतात. येशू मंदिरात जातो. त्याची त्याने आदल्या दिवशी दुपारी पाहणी केली होती. पण आज, तीन वर्षांपूर्वी, इ. स. ३०च्या वल्हांडण सणाला तो आलेला असताना त्याने केले होते, तसा येशू मंदिरात क्रय-विक्रय करणाऱ्‍यांना बाहेर घालवून देतो व सराफांचे चौरंग आणि कबुतरे विकणाऱ्‍यांच्या बैठकी उलथून टाकतो. तो कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरातून ने-आण करू देत नाही.

मंदिरात प्राणी विकण्याचा व सराफाचा धंदा करणाऱ्‍यांना दोष देत तो म्हणतोः “‘माझ्या घराला सर्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.” अर्पणासाठी जरूरी असलेले प्राणी त्यांच्याकडून विकत घेण्याशिवाय इतर पर्याय नसलेल्या लोकांकडून ते अवास्तव किंमत घेत असल्यामुळे ते लुटारू आहेत. त्या कारणाने येशूच्या दृष्टीने हे धंदेवाईक व्यवहार एका प्रकारची बळजबरी वा लूट आहे.

येशूने केलेल्या गोष्टी मुख्य याजक, शास्त्री व प्रतिष्ठित लोकांच्या कानावर जातात तेव्हा पुन्हा ते येशूला ठार करण्याचा मार्ग शोधतात. अशा रितीने ते सुधारता न येणारे असल्याचे सिद्ध करतात. पण त्याचे शब्द ऐकण्यासाठी लोक आतुर झालेले असल्यामुळे, येशूला ठार कसे करावे हे त्यांना कळत नाही.

निसर्गस्वभावाने यहुदी असलेल्यांव्यतिरिक्‍त परराष्ट्रीय लोकही वल्हांडण सणाला आले आहेत. ते मतानुसारी आहेत; म्हणजे त्यांनी यहुद्यांचा धर्म स्वीकारला आहे. कोणी ग्रीक लोक—ते यहुदीमतानुसारी असावेत हे उघड आहे—आता फिलिप्पाकडे येतात आणि येशूला भेटवण्याची विनंती करतात. कदाचित, अशा भेटीचे औचित्य विचारण्यासाठी, फिलिप्प आंद्रियाकडे जातो. जेथे ते ग्रीक लोक येशूला भेटू शकतात अशा त्या मंदिरात येशू अजूनही आहे असे दिसते.

आपल्या आयुष्याचे अगदी थोडे दिवस राहिले असल्याचे येशूला ठाऊक आहे. यासाठी तो मार्मिकपणे आपली परिस्थिती उदाहरणाने समजावतोः “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो. आणि तो मेला तर पुष्कळ पीक देतो.”

गव्हाच्या एका दाण्याची किंमत काहीच नाही. पण तो मातीत टाकला गेला व बी म्हणून त्याचे आयुष्य संपवून “मेला” तर कसे? मग, तो रुजतो व पुढे गव्हाचे अनेक दाणे निर्माण करणारे झाड म्हणून वाढतो. तसेच, येशू हा केवळ एक सिद्ध माणूस आहे. परंतु तो देवाशी एकनिष्ठ राहून मेल्यास त्याच्यासारखी आत्म-त्यागाची वृत्ती असलेल्या विश्‍वासू लोकांना सार्वकालिक जीवन देण्याचे साधन बनतो. यासाठीच येशू म्हणतोः “जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्‍या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील.”

येशू केवळ स्वतःचा विचार करीत नसल्याचे उघड आहे कारण नंतर तो खुलासा करतोः “जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.” येशूला अनुसरण्याचे व त्याची सेवा करण्याचे हे किती अद्‌भुत प्रतिफळ! देवाच्या राज्यात ख्रिस्ताची सोबत करण्याचा, देवाकडून होणारा सन्मान, हेच ते प्रतिफळ आहे.

त्याच्यापुढे वाढून ठेवलेले मोठे दुःख व यातनामय मृत्यु यांचा विचार करीत येशू पुढे म्हणतोः “आता माझा जीव व्याकुळ झाला आहे. मी काय बोलू? हे बापा ह्‍या घटकेपासून माझे रक्षण कर.” त्याच्यापुढे वाढून ठेवलेल्या गोष्टी जर टाळता आल्या तर! पण तो म्हणतो त्याप्रमाणे “मी ह्‍यासाठीच ह्‍या घटकेत आलो आहे.” त्याच्या बलिदानाच्या मृत्युसकट देवाच्या संपूर्ण योजनेशी येशू सहमत आहे. मत्तय २१:१२, १३, १८, १९; मार्क ११:१२-१८; लूक १९:४५-४८; योहान १२:२०-२७.

▪ अंजिरांचा हंगाम नसताना येशू झाडावर अंजिरे असावीत अशी अपेक्षा का करतो?

▪ मंदिरात विक्री करणाऱ्‍यांना येशू “लुटारू” का म्हणतो?

▪ येशू कोणत्या रितीने मरणाऱ्‍या गव्हाच्या दाण्यासारखा आहे?

▪ येशूला त्याच्यापुढे वाढून ठेवलेल्या दुःख व मृत्युबद्दल कसे वाटते?