व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मनुष्याचा पुत्र प्रकट केला जातो तेव्हा

मनुष्याचा पुत्र प्रकट केला जातो तेव्हा

अध्याय ९३

मनुष्याचा पुत्र प्रकट केला जातो तेव्हा

येशू अजून उत्तरेकडे (शोमरोनात अथवा गालीलात) असताना, देवाच्या राज्याच्या आगमनाबद्दल परुशी त्याला विचारतात. ते आगमन वाजत गाजत येईल अशी त्यांची कल्पना आहे. पण येशू म्हणतोः “देवाचे राज्य दृश्‍य स्वरुपात येत नाही. ‘पहा, ते येथे आहे!’ किंवा ‘तेथे आहे,’ असे म्हणणार नाहीत. कारण पहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”

“तुमच्यामध्ये आहे,” या येशूच्या शब्दांचे भाषांतर कधी कधी, “तुमच्या आत आहे,” असे केले गेले आहे. त्यामुळे देवाच्या सेवकांच्या हृदयात देवाच्या राज्याची सत्ता चालते असे येशूचे म्हणणे होते असे काहींना वाटले आहे. पण येशू ज्यांच्यासोबत बोलत आहे, त्या अविश्‍वासू परुशांच्या हृदयात देवाचे राज्य नाही हे उघड आहे. परंतु, देवाच्या राज्याचा नियुक्‍त राजा येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये असल्याने, ते त्यांच्यामध्ये आहे.

कदाचित, परुशी निघून गेल्यानंतर देवाच्या राज्याच्या येण्याबद्दल येशू आपल्या शिष्यांबरोबर अधिक बोलतो. “ते तुम्हाला म्हणतील, ‘पहा, तो तेथे आहे! पहा, येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका. कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसऱ्‍या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल,” असा इशारा तो देतो तेव्हा, राज्य-सामर्थ्यासह त्याची भावी उपस्थिती त्याच्या मनात विशेषरित्या आहे. यासाठीच, वीज जशी मोठ्या प्रदेशात दिसते, तशी बघण्याची इच्छा असणाऱ्‍या सर्वांना, राज्य-सामर्थ्यासह त्याच्या उपस्थितीचा पुरावा स्पष्टपणे दिसेल असे येशू सुचवीत आहे.

त्याच्या भावी उपस्थितीच्या वेळी लोकांची भूमिका काय असेल ते दाखवण्यासाठी येशू त्यांची तुलना प्राचीन घटनांशी करतो. तो खुलासा करतोः “नोहाच्या दिवसात झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातही होईल . . . तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकीत होते, लागवड करीत होते, घरे बांधीत होते. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल.”

केवळ खाणेपिणे, विकत घेणे, विकणे, लागवड करणे किंवा घरे बांधणे ही सर्वसामान्य कार्ये करीत राहिल्यामुळे नोहा व लोटाच्या दिवसातील लोकांचा नाश झाला असे येशू म्हणत नाही. नोहा, लोट व त्यांचे कुटुंब देखील या गोष्टी करत होते. पण देवाच्या इच्छेकडे लक्ष न देता इतर लोक ही दैनिक कार्ये करत होते व याच कारणासाठी त्यांचा नाश केला गेला. या व्यवस्थीकरणावर येणाऱ्‍या मोठ्या संकटाच्या वेळी ख्रिस्त प्रकट होतो तेव्हा त्याच कारणासाठी लोकांचा नाश केला जाईल.

राज्य-सामर्थ्यासह आपल्या महत्त्वाच्या भावी उपस्थितीच्या पुराव्याला झटकन प्रतिसाद देण्यावर जोर देत येशू पुढे म्हणतोः “त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरात असलेले सामान नेण्याकरता खाली येऊ नये. तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरु नये. लोटाच्या बायकोची आठवण करा.”

ख्रिस्ताच्या उपस्थितीचा पुरावा दिसू लागल्यावर लोकांनी भौतिक मालमत्तेच्या प्रेमाला विनाविलंब हालचाल करण्याच्या आड येऊ देता कामा नये. सदोम सोडून जाताना लोटाच्या बायकोने मागे सोडलेल्या गोष्टींकडे उत्कट इच्छेने वळून पाहिले असे भासते व यामुळेच ती मिठाचा खांब झाली.

आपल्या भावी उपस्थितीच्या काळात असलेल्या परिस्थितीचे वर्णन पुढे करताना, येशू आपल्या शिष्यांना सांगतोः “त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल. दोघी मिळून दळीत असतील, एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल.”

घेतले जाणे हे आपल्या कुटुंबासह नोहाने तारवात प्रवेश करणे व देवदूतांनी लोट व त्याच्या कुटुंबाला सदोमाच्या बाहेर नेण्यासारखे आहे. याचा अर्थ आहे, तारण. याउलट, तेथेच ठेवले जाण्याचा अर्थ, नाश मिळणे असा आहे.

आता शिष्य विचारतातः “प्रभुजी कोठे?”

येशू उत्तर देतोः “जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील.” जे तारणासाठी ‘घेतले जातात’ ते गिधाडांसारखे तीक्ष्ण दृष्टीचे आहेत कारण ते ‘प्रेता’पाशी जमतात. राज्य-सामर्थ्यासह खऱ्‍या ख्रिस्ताच्या अदृश्‍य उपस्थितीशी व यहोवा देत असलेल्या आध्यात्मिक मेजवानीशी प्रेताचा संबध आहे. लूक १७:२०-३७; उत्पत्ती १९:२६.

▪ देवाचे राज्य परुशांमध्ये कसे होते?

▪ कोणत्या प्रकारे ख्रिस्ताची उपस्थिती विजेसारखी आहे?

▪ ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या वेळी लोकांचा त्यांच्या कृत्यांसाठी का नाश करण्यात येईल?

▪ घेतले जाणे व तेथेच ठेवले जाणे यांचा अर्थ काय होतो?