व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मनुष्य कशाने अशुद्ध होतो?

मनुष्य कशाने अशुद्ध होतो?

अध्याय ५६

मनुष्य कशाने अशुद्ध होतो?

येशूला होणारा विरोध अधिक प्रखर होतो. त्याचे अनेक शिष्य निघून जातात इतकेच नव्हे तर इ. स. ३१ च्या वल्हांडणाच्या वेळी तो यरुशलेमामध्ये असताना यहुदी त्याचा घात करू पाहात होते तसे आताही ते त्याला मारण्यासाठी टपले आहेत.

आता इ. स. ३२ चा वल्हांडण सण आहे. बहुधा, तेथे उपस्थित राहण्याच्या देवाच्या नियमाला अनुसरुन येशू यरुशलेमामध्ये वल्हांडण सणासाठी जातो. परंतु त्याच्या जिवाला धोका असल्यामुळे तो सावधगिरीने जातो. त्यानंतर तो गालीलला परततो.

यरुशलेममध्ये परुशी व शास्त्री त्याच्याकडे येतात तेव्हा बहुधा येशू कफर्णहूमात आहे. धार्मिक नियमभंग केल्याचा त्याच्यावर आरोप करता येण्यासाठी ते आधार शोधीत आहेत. ते विचारतातः “आपले शिष्य वाडवडीलांचा सांप्रदाय का मोडतात? कारण जेवताना ते हात धूत नाहीत.” हा काही देवाचा नियम नाही तरी वहिवाटीचा हा विधी न करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे परुशी मानतात. त्या विधीमध्ये कोपरापर्यंत हात धुण्याचा समावेश आहे.

त्यांच्या आरोपासंबंधाने त्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांचेच जाणून-बुजून देवाचे नियम मोडणे येशू त्यांच्या नजरेस आणून देतो. तो विचारतोः “तुम्हीही आपल्या सांप्रदायेकरून देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने असे म्हटले आहे की, ‘तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर.’ आणि ‘जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता की, ‘जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, “मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे,” त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये.’”

खरोखरच, देवाला भेट म्हणून अर्पण केलेले धन, मालमत्ता वा काहीही, मंदिराचे असून इतर कोणत्याही कामासाठी वापरता येऊ शकत नाही. तरी, वस्तुतः अर्पण केलेली भेटवस्तु अर्पण करणाऱ्‍या व्यक्‍तीकडेच असते. अशा रितीने, एखादा मुलगा त्याचा पैसा वा मालमत्ता “कुर्बान”—देवाला किंवा मंदिराला अर्पण केलेली भेटवस्तु—आहे असे केवळ म्हणून त्याच्या वयस्कर आईवडीलांना मदत करण्याची जबाबदारी टाळतो. ते आईवडील अत्यंत हलाखीत असू शकतील.

परुशांनी देवाच्या नियमाचा केलेल्या दुष्ट विपर्यासाबद्दल रास्त संतापाने येशू म्हणतोः “तुम्ही आपल्या सांप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला आहे की, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात. परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात. कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम.’”

परुशांना येशूला प्रश्‍न विचारता यावेत म्हणून कदाचित जमाव मागे हटला असावा. आता, येशूने त्यांची खरडपट्टी केल्यावर परुशी निरुत्तर झाले. तेव्हा तो जमावाला जवळ बोलावतो. तो म्हणतोः “ऐका व समजून घ्या. जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवविते.”

काही वेळाने ते एका घरात जातात तेव्हा त्याचे शिष्य विचारतातः “हे वचन ऐकून परुशी नाराज झाले हे आपल्याला कळले काय?”

येशू उत्तर देतोः “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. त्यांना असू द्या. ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत; आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”

आता पेत्र विचारतो की, माणूस कशाने विटाळतो, तेव्हा येशूला काहीसे आश्‍चर्य वाटलेसे दिसते. तो म्हणतोः “तुम्ही देखील अज्ञानी आहा काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते, हे तुम्हाला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळवते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्‍या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. ह्‍या गोष्टी माणसाला विटाळवतात; न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवत नाही.”

येथे येशू सर्वसामान्य स्वच्छतेला नकार दर्शवीत नाही. अन्‍न खाण्यापूर्वी वा जेवणापूर्वी एखाद्या व्यक्‍तीने हात धुण्याची गरज नाही, असे त्याचे म्हणणे नाही. तर अशास्त्रीय रुढींबद्दल आग्रह धरून देवाच्या नीतीमान नियमांना अप्रामाणिकपणे डावलण्याच्या धार्मिक नेत्यांच्या दांभिकपणाचा येशू धिक्कार करीत आहे. होय, दुष्ट कर्मे माणसाला विटाळवतात, व त्यांचा उगम व्यक्‍तीच्या अंतःकरणात होतो हे येशू दाखवतो. योहान ७:१; अनुवाद १६:१६; मत्तय १५:१-२०; मार्क ७:१-२३; निर्गम २०:१२; २१:१७; यशया २९:१३.

▪ आता येशू कोणत्या विरोधाला तोंड देतो?

▪ परुशी कोणता आरोप करतात, पण येशूच्या मताने परुशी देवाचे नियम हेतुपुरस्सर कसे मोडतात?

▪ कशाने माणूस विटाळतो असे येशू उघड करतो?