व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मार्थाला सल्ला व प्रार्थनेविषयी सूचना

मार्थाला सल्ला व प्रार्थनेविषयी सूचना

अध्याय ७४

मार्थाला सल्ला व प्रार्थनेविषयी सूचना

येशूच्या यहूदीयातील सेवाकार्याच्या काळात तो बेथानी गावात प्रवेश करतो. येथेच मार्था, मरीया व त्यांचा भाऊ लाजर राहतात. येशू बहुधा त्याच्या सेवाकार्यात मागेच या तिघांना भेटला होता व म्हणून तो आधीच त्यांचा जिवलग मित्र आहे. ते काही असले तरी आता येशू मार्थाच्या घरी जातो व ती त्याचे स्वागत करते.

मार्था, आपल्यापाशी असलेल्या सर्वोत्तम गोष्टी येशूला देण्यास उत्सुक आहे. खरोखर, वचनयुक्‍त मशीहाने आपल्या घरी यावे हा फार मोठा सन्मान आहे! यासाठीच, सुग्रास भोजन बनवण्यात व येशूचा मुक्काम अधिक आनंदी व सुखावह करण्यासाठी बारीक-सारीक गोष्टी करण्यात ती गढून जाते.

उलटपक्षी, मार्थाची बहीण मरीया येशूच्या पायाशी बसते व त्याचे बोलणे ऐकते. काही वेळाने मार्था येऊन येशूला म्हणतेः “गुरुजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्‍याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करावयास तिला सांगा.”

पण, मरीयेला काहीही सांगण्यास येशू नकार देतो. उलटपक्षी, भौतिक गोष्टीची फाजील काळजी केल्याबद्दल तो मार्थाला समज देतो. तो प्रेमळपणे दटावतोः “मार्थे, मार्थे; तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस. परंतु थोडक्याच, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे.” जेवणासाठी अनेक पदार्थ बनवण्यात फार वेळ खर्च करण्याची गरज नाही असे येशू म्हणत आहे. फारच थोडे पदार्थ किंवा एकच पदार्थ पुरेसा आहे.

मार्थाचा हेतू चांगला आहे. तिला आदरातिथ्य करणारी यजमानीण व्हावयाची इच्छा आहे. पण भौतिक गरजा पुरवण्याकडे लक्ष देण्याच्या चिंतेने, देवाच्या स्वतःच्या पुत्राकडून व्यक्‍तीगत सूचना मिळण्याची संधी ती घालवत होती! यामुळेच शेवटी येशू म्हणतोः “मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे; तो तिच्याकडून काढून घेतला जाणार नाही.”

पुढे दुसऱ्‍या एके प्रसंगी एक शिष्य येशूला म्हणतोः “प्रभुजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा.”

दीड वर्षापूर्वी डोंगरावरील प्रवचनात येशूने आदर्श प्रार्थना सांगितली तेव्हा बहुतेक हा शिष्य उपस्थित नसावा. यामुळेच येशू सूचनांची पुनरावृत्ती करतो व चिकाटीने प्रार्थना करण्याच्या गरजेवर जोर देण्यासाठी पुढे एक उदाहरण देखील देतो.

येशू सुरवात करतोः “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतोः ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे. कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे, आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही.’ आणि तो आतून उत्तर देईलः ‘मला त्रास देऊ नको. आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत. मी उठून तुला देऊ शकत नाही.’? मी तुम्हास सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्‍यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी, तो उठून त्याला देईल.”

गोष्टीतील मित्राप्रमाणे, याचनेला प्रतिसाद देण्याची यहोवा देवाची इच्छा नाही, असे या तुलनेने येशू म्हणू इच्छित नाही. तर तो उदाहरणाने दाखवून देत आहे की, एखादा राजी नसलेला मित्र चिकाटीच्या विनंत्यांना प्रतिसाद देणार असेल तर आपला प्रेमळ स्वर्गीय पिता किती अधिक प्रतिसाद देईल! याकरताच येशू पुढे म्हणतोः “मी तुम्हास सांगतो, मागत राहा म्हणजे तुम्हास दिले जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हास सापडेल; ठोकत राहा म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.” (न्यू.व.)

त्यानंतर, येशू असिद्ध व पापी मानवी पित्यांचा उल्लेख करून म्हणतोः “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” सतत प्रार्थना करण्यासाठी येशू खरोखर किती प्रेरणादायक उत्तेजन देतो! लूक १०:३८–११:१३.

▪ येशूसाठी मार्था इतकी अधिक तयारी का करते?

▪ मरीया काय करते व मार्थेऐवजी येशू तिची स्तुती का करतो?

▪ प्रार्थनेबद्दल दिलेल्या सूचनांची पुनरावृत्ती येशूला कशामुळे करावीशी वाटते?

▪ प्रार्थनेतील चिकाटीची गरज येशू उदाहरणासहित कशी स्पष्ट करतो?