व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मेंढवाडे व मेंढपाळ

मेंढवाडे व मेंढपाळ

अध्याय ८०

मेंढवाडे व मेंढपाळ

पुनःस्थापना किंवा हनुक्काच्या सणासाठी येशू यरुशलेमात आलेला आहे. या सणात ते मंदिर, यहोवाला पुन्हा समर्पित करण्यात आल्याचा उत्सव साजरा केला जातो. साधारण २०० वर्षांपूर्वी इ. स. पू. १६८ मध्ये चौथा अँटीऑकस एपिफॅनस याने यरुशलेमावर ताबा घेतला व मंदिर आणि त्याची वेदी यांना अपवित्र केले. परंतु तीन वर्षांनी यरुशलेम पुन्हा त्यांच्या ताब्यातून सोडवण्यात आले आणि मंदिराची पुःनस्थापना करण्यात आली. त्यानंतर हा पुनःस्थापनेचा वार्षिक सभारंभ साजरा करण्यात आला.

आपल्या आधुनिक कालगणनेतील नोव्हेंबर महिन्याच्या शेवटल्या व डिसेंबरच्या पहिल्या भागाशी जुळणाऱ्‍या किस्लेव या यहुदी महिन्याच्या २५ तारखेला, पुनःस्थापनेचा सण येतो. तेव्हा इ. स. ३३च्या महत्त्वाच्या वल्हांडण सणाला केवळ शंभराहून थोडे अधिक दिवसच उरतात. त्या ऋतुमानामध्ये हवामान थंड असल्याने प्रेषित योहान त्याला “हिवाळा” म्हणतो.

आता येशू एक उदाहरण देतो आणि त्यात, तीन मेंढवाडे व उत्तम मेंढपाळाच्या त्याच्या भूमिकेचा उल्लेख तो करतो. त्याने म्हटलेला पहिला मेंढवाडा म्हणजे मोशेच्या नियमशास्त्राच्या कराराची व्यवस्था होय. देवाशी झालेल्या या विशेष करारात नसलेल्या लोकांच्या, भ्रष्ट करणाऱ्‍या चालीरितींपासून यहुद्यांना वेगळे करण्याचे काम, एखाद्या कुंपणाप्रमाणे, त्या नियमशास्त्राने केले. येशू खुलासा करतोः “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे.”

आपण मशीहा वा ख्रिस्त आहोत असा दावा करणारे आले होते. पण ते, खरे मेंढपाळ नव्हते. त्या खऱ्‍या मेंढपाळाबद्दल येशू पुढे सांगतोः “त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो; मेंढरे त्याची वाणी ऐकतात व तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. . . . ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील. कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत.”

पहिल्या मेंढवाड्याचा “द्वारपाल” बाप्तिस्मा करणारा योहान होता. ज्या लाक्षणिक मेंढरांना येशू कुरणाकडे नेणार होता त्यांना त्याची ओळख करून देऊन, द्वारपाल या नात्याने योहानाने येशूला दरवाजा उघडला.

येशू ज्यांना नावाने हाक मारतो व बाहेर नेतो अशा मेंढरांना कालांतराने दुसऱ्‍या एका मेंढवाड्यात प्रवेश दिला जातो. येशूने खुलासा केल्याप्रमाणेः “मी तुम्हास खचित खचित सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे,” म्हणजे नवीन मेंढवाड्याचे दार. येशू आपल्या शिष्यांबरोबर नवीन कराराची स्थापना करतो व येत्या पेंटेकॉस्टला त्यांच्यावर स्वर्गातून पवित्र आत्मा ओततो तेव्हा त्यांना नवीन मेंढवाड्यात प्रवेश दिला जातो.

आपल्या भूमिकेबद्दल अधिक माहिती देताना येशू म्हणतोः “मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल, तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयाला मिळेल. . . . मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. . . . मीच उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो.”

“हे लहान कळपा, भिऊ नको. कारण तुम्हास राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे,” असे म्हणून येशूने नुकतेच आपल्या अनुयायांचे सांत्वन केले आहे. सरतेशेवटी ती १,४४,००० इतकी संख्या होईल असा हा लहान कळप या नव्या वा दुसऱ्‍या मेंढवाड्यात येतो. पण येशू पुढे म्हणतोः “या मेंढवाड्यातील नव्हत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत. तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील. मग, एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.”

“दुसरी मेंढरे” “या मेंढवाड्यातील नव्हत” अशी असल्याने ती आणखी एका कुंपणातील, तिसऱ्‍यातील असली पाहिजेत. या शेवटल्या दोन मेंढवाड्यांचे वा कोंडवाड्यांचे भवितव्य वेगवेगळे आहे. एका मेंढवाड्यातील “लहान कळप” ख्रिस्ताबरोबर स्वर्गात राज्य करील आणि दुसऱ्‍या मेंढवाड्यातील “दुसरी मेंढरे” नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर राहतील. तरी, वेगवेगळ्या मेंढवाड्यात असूनही त्या मेंढरात द्वेष नाही की त्यांना विभक्‍ततेची भावना नाही. कारण येशूने म्हटल्याप्रमाणे ‘एका मेंढपाळा’च्या हाताखाली ते “एक कळप” होतात.

येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ मेंढरांच्या दोन्ही गटासाठी स्वेच्छेने आपला प्राण देतो. तो म्हणतोः “मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.” असे येशूने म्हटल्यावर यहुद्यांमध्ये फूट पडते.

जनसमुदायातील अनेकजण म्हणतातः “त्याला भूत लागलेले आहे व तो वेडा आहे. त्याचे तुम्ही का ऐकता?” मग बहुधा, दोन महिन्यापूर्वी त्याने अंधळ्या माणसाला बरे केले होते त्याच्या संदर्भात ते म्हणतातः “भूताला अंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?” योहान १०:१-२२; ९:१-७; लूक १२:३२; प्रकटीकरण १४:१, ३; २१:३, ४; स्तोत्रसंहिता ३७:२९.

▪ पुनःस्थापनेचा सण म्हणजे काय व तो केव्हा साजरा केला जातो?

▪ पहिला मेंढवाडा कोणता व त्याचा द्वारपाल कोण आहे?

▪ द्वारपाल मेंढपाळाला दरवाजा कसा उघडतो व त्यानंतर मेंढरांना कोठे प्रवेश दिला जातो?

▪ उत्तम मेंढपाळाचे दोन मेंढवाडे कोणाचे बनलेले आहेत व त्यांचे किती कळप बनतात?