व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मोहरांचा दाखला

मोहरांचा दाखला

अध्याय १००

मोहरांचा दाखला

येशू कदाचित अजूनही जक्कयाच्या घरी आहे. यरुशलेमाच्या वाटेवर तो तेथे थांबला आहे. ते यरुशलेमला पोहोचल्यावर आपण मसीहा असल्याची तो घोषणा करील व आपले राज्य स्थापन करील अशी त्याच्या शिष्यांची कल्पना आहे. ही कल्पना सुधारण्यासाठी तसेच ते राज्य अजून खूप दूर असल्याचे दाखवण्यासाठी येशू एक दाखला देतोः

तो सांगतोः “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्‍या उद्देशाने दूर देशी गेला.” येशू हाच तो “उमराव” असून स्वर्ग हा “दूर देश” आहे. तो तेथे पोहंचल्यावर त्याचा पिता त्याला राज्यसत्ता देईल.

परंतु, जाण्यापूर्वी तो उमराव आपल्या दहा सेवकांना बोलावतो व त्यातील प्रत्येकाला एक चांदीची मोहर देतो व म्हणतोः “मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा.” ते दहा दास या दाखल्याच्या पूर्णतेमध्ये, येशूच्या सुरवातीच्या शिष्यांचे प्रतिनिधित्व करतात. मोठ्या प्रमाणावर लागू करताना, स्वर्गीय राज्यात त्याच्या सोबतच्या सर्व भावी वारशांचे ते प्रतिनिधित्व करतात.

चांदीच्या मोहरा मोलवान आहेत. एक मोहर, शेतातील कामगारांच्या, जवळजवळ तीन महिन्यांच्या मजुरीइतकी आहे. पण मोहरा कशाचे प्रतिनिधित्व करतात? तसेच त्या दासांनी त्यांच्यावर कशा प्रकारचा व्यापार करावयाचा आहे?

वचनयुक्‍त राज्यामध्ये राजा या नात्याने येशू येईपर्यंत स्वर्गीय राज्याचे अधिक वारस उत्पन्‍न करण्यासाठी आत्म्याने जन्मलेल्या शिष्यांना वापरता येण्यासारख्या मालमत्तेचे प्रतिनिधित्व या मोहरा करतात. पुनरुत्थान व शिष्यांना प्रकट होण्यानंतर, अधिक शिष्य बनवण्यासाठी व अशा रितीने स्वर्गातील राज्याच्या वर्गात भर घालण्यासाठी येशूने त्यांना या लाक्षणिक मोहरा दिल्या.

येशू पुढे सांगतोः “[पण] त्याच्या नगरचे लोक [उमरावाचा] द्वेष करीत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितलेः ‘ह्‍याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’” त्याच्या नगरचे लोक हे, त्याचे शिष्य वगळून बाकीचे इस्राएल किंवा यहुदी लोक होत. येशू स्वर्गात गेल्यावर त्याच्या शिष्यांचा छळ करून हे यहुदी जाहीर करतात की त्याने [येशूने] त्यांचा राजा व्हावे अशी त्यांची इच्छा नाही. अशा तऱ्‍हेने ते, वकील पाठवणाऱ्‍या त्याच्या नगराच्या लोकांप्रमाणे वागत आहेत.

दहा दास त्यांच्या मोहरा कशा वापरतात? येशू स्पष्टीकरण देतो. तो म्हणतोः “मग असे झाले की, तो राज्य मिळवून परत आल्यावर, ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी, व्यापारात काय मिळविले हे पहावे म्हणून त्याने त्यांस आपणाकडे बोलावण्यास सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणालाः ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळविल्या आहेत.’ त्याने त्याला म्हटलेः ‘शाब्बास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्‍वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’ नंतर दुसरा येऊन म्हणालाः ‘महाराज आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमविल्या आहेत.’ त्यालाही त्याने म्हटलेः ‘तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे.’”

दहा मोहरा असलेला दास इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टपासून आतापर्यंतच्या एका वर्गाला किंवा गटाला चित्रित करतो, यात प्रेषितांचा समावेश आहे. पाच मोहरा मिळविलेला दासही, त्यांना मिळालेल्या संधी व कुवतीप्रमाणे राजाची पृथ्वीवरील मालमत्ता वाढवणाऱ्‍या, त्याच कालखंडातील एका गटाचे प्रतिनिधित्व करतो. दोन्ही गट आवेशाने सुवार्तेचा प्रचार करतात व परिणामी अनेक सरळ मनाचे लोक ख्रिस्ती बनतात. नऊ दासांनी यशस्वी व्यापार करून त्यांची मालमत्ता वाढवली.

येशू पुढे म्हणतोः “मग, आणखी एक येऊन म्हणालाः ‘महाराज, ही पहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.’ तो त्याला म्हणला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो हे तुला ठाऊक होते काय? मग, तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’ मग त्याने जवळ उभे राहणाऱ्‍यांस सांगितलेः ‘ह्‍याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’”

दुष्ट दासासाठी ती लाक्षणिक मोहर गमावण्याचा अर्थ स्वर्गीय राज्यातील जागा गमावणे असा आहे. होय, जणू दहा नगरांवर किंवा पाच नगरांवर राज्य करण्याचा विशेषाधिकार तो गमावतो. त्याने केलेल्या वाइटपणामुळे नाही तर त्याच्या धन्याच्या राज्याची संपत्ती वाढवण्यासाठी काम करण्यात उणे पडल्यामुळे तो दुष्ट गणला जातो हे लक्षात घ्या.

दुष्ट दासाची मोहर पहिल्या दासाला दिली जाते तेव्हा आक्षेप घेतला जातो की, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’ तरीही येशू उत्तर देतोः “ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या वैऱ्‍यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांस येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.” लूक १९:११-२७; मत्तय २८:१९, २०.

▪ मोहरांचा दाखला देण्यास येशू कशाने प्रवृत्त होतो?

▪ उमराव कोण आहे व तो जातो तो देश कोणता?

▪ दास कोण आहेत व मोहरांनी कशाचे प्रतिनिधित्व केले आहे?

▪ त्या नगराचे लोक कोण आहेत व ते त्यांचा द्वेष कशा तऱ्‍हेने दाखवतात?

▪ एका दासाला दुष्ट का म्हटले आहे व त्याने मोहर गमावण्याचा अर्थ काय होतो?