व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यरुशलेममध्ये ख्रिस्ताचा जयोत्सवाने प्रवेश

यरुशलेममध्ये ख्रिस्ताचा जयोत्सवाने प्रवेश

अध्याय १०२

यरुशलेममध्ये ख्रिस्ताचा जयोत्सवाने प्रवेश

दुसऱ्‍या दिवशी, रविवार, निसान ९ तारखेला सकाळी बेथानी सोडून येशू आपल्या शिष्यांबरोबर जैतुनाच्या डोंगरावरून यरुशलेमकडे जातो. थोड्याच वेळात जैतुनाच्या डोंगरावर असलेल्या बेथफगे गावाजवळ ते येतात. येशू त्याच्या दोघा शिष्यांना सूचना देतोः

“तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर, ‘प्रभूला याची गरज आहे,’ असे सांगा; म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.”

या सूचनांचा पवित्र शास्त्राच्या भविष्यवादाच्या पूर्णतेशी काही संबंध असेल असे सुरवातीला शिष्यांच्या लक्षात आले नाही, तरी मागाहून त्यांच्या ते लक्षात येते. जखऱ्‍या संदेष्ट्याने भविष्यवाद केला होता की, देवाचा वचनयुक्‍त राजा एका गाढवावर, होय “गाढवीच्या पिलावर” बसून यरुशलेममध्ये येईल. अशाच तऱ्‍हेने शलमोन राजा त्याच्या अभिषेकासाठी गाढवीच्या पिलावर बसून गेला होता.

बेथफगेमध्ये प्रवेश करून शिष्य शिंगरू व त्याच्या आईला घेतात तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काहीजण म्हणतातः “शिंगरू सोडून तुम्ही काय करता?” परंतु प्रभुसाठी ते प्राणी हवे असल्याचे सांगितल्यावर ती माणसे शिष्यांना ते येशूकडे नेऊ देतात. शिष्य आपली वस्त्रे गाढवीवर व तिच्या शिंगरावर घालतात. पण येशू शिंगरावर बसतो.

येशू गाढवावर बसून यरुशलेमाकडे जाऊ लागतो तसा जमाव वाढतो. बरेचसे लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरतात, तर इतर काही झाडांच्या डहाळ्या तोडून त्या पसरतात. ते उंच स्वराने म्हणतातः “यहोवाच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती, आणि ऊर्ध्वलोकी गौरव.” (न्यू.व.)

जमावातील काही परुशांना या घोषणांचा राग येतो व ते येशूकडे तक्रार करतातः “गुरुजी, आपल्या शिष्यांना दटावा.” पण येशू उत्तर देतोः “मी तुम्हास सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.”

यरुशलेमाच्या जवळ येत असताना शहराकडे पाहून त्याकरता रडत तो म्हणतोः “जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.” येशू भविष्य करतो त्याप्रमाणे यरुशलेमने केलेल्या बुद्धिपुरस्सर आज्ञाभंगाची किंमत तिला मोजावी लागेल.

“तुझे शत्रू [सेनापती टायटसच्या हाताखालील रोमी लोक] तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील. तुझा चहूकडून कोंडमारा करतील. तुला व तुझ्या मुला-बाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्‍यावर चिरा राहू देणार नाहीत.” इ. स. ७० मध्ये ३७ वर्षांनंतर येशूने सांगितलेला यरुशलेमचा नाश खरोखर घडतो.

काही आठवडे अलिकडेच जमावातील अनेकांनी येशूने लाजराला उठवलेले पाहिले होते. आता ते तो चमत्कार इतरांना सांगत राहतात. त्यामुळे येशूने यरुशलेममध्ये प्रवेश केल्यावर सर्व शहरात गलबला होतो. लोकांना जाणून घेण्याची इच्छा असते की, “हा कोण?” “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा होय,” असे [त्याच्याबरोबर आलेला] जमाव सांगत राहतो. घडत असलेल्या गोष्टी पाहून, त्यांचे काहीच चालत नसल्यामुळे परुशी शोक करतात. कारण ते म्हणतातः “जग त्याच्यामागे चालले आहे.”

यरुशलेमला भेटी देताना नेहमी त्याचा रिवाज असतो त्याप्रमाणे, शिकवण्यासाठी येशू मंदिरात जातो. तेथे अंधळे व पांगळे त्याच्याकडे येतात व तो त्यांना बरे करतो. येशू करीत असलेल्या अद्‌भुत गोष्टी प्रमुख याजक व शास्त्री पाहतात आणि “दावीदाच्या पुत्राला होसान्‍ना” असा मंदिरात मुलांचा गजर ऐकतात, तेव्हा त्यांना संताप येतो. ते निषेधाने त्याला म्हणतातः “ही काय म्हणतात, हे तू ऐकतोस काय?”

येशू त्यांना उत्तर देतोः “होय. ‘बालके व तान्ही मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करविली आहे,’ हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही का?”

येशू पुढे शिकवतो व तो मंदिरात सभोवार सर्वकाही पाहतो. लवकरच दिवस कलतो. तेव्हा त्या १२ जणांसह तो निघतो आणि बेथानीला तीन किलोमीटर्स परत जातो. तेथे, कदाचित, त्याचा मित्र लाजार याच्या घरी तो रविवारची रात्र काढतो. मत्तय २१:१-११, १४-१७; मार्क ११:१-११; लूक १९:२९-४४; योहान १२:१२-१९; जखऱ्‍या ९:९.

▪ राजा या नात्याने येशू यरुशलेमात कधी व कशाप्रकारे प्रवेश करतो?

▪ जनसमुदायाने येशूची प्रशंसा करणे किती महत्त्वाचे आहे?

▪ यरुशलेम पाहिल्यावर येशूला कसे वाटते व तो कोणता भविष्यवाद उच्चारतो?

▪ येशू मंदिरात जातो तेव्हा काय होते?