व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यरुशलेमला गुप्त प्रवास

यरुशलेमला गुप्त प्रवास

अध्याय ६५

यरुशलेमला गुप्त प्रवास

.स. ३२ चा हा हेमंत ऋतु आहे. मंडपांचा सण जवळ आला आहे. इ. स. ३१ च्या वल्हांडणाच्या सणाला यहूद्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केल्यापासून येशूने आपले बहुतेक कार्य गालीलात मर्यादित ठेवले आहे. तेव्हापासून येशूने यहुद्यांचे तीन वार्षिक सण पाळण्यासाठीच यरुशलेमाला बहुधा भेट दिली आहे.

येशूचे भाऊ आता त्याला आग्रह करतातः “तू येथून निघून यहूदीयात जा.” यरुशलेम हे यहूदीयाचे प्रमुख शहर आहे व संपूर्ण देशाचे धार्मिक केंद्र आहे. त्याचे भाऊ विचार मांडतातः “जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करीत नाही.”

त्याच्या चार भावांचा म्हणजे याकोब, शिमोन, योसेफ व यहूदा यांचा आपला वडील भाऊ येशू हा खरोखर मशीहा असल्याबद्दलचा विश्‍वास नसला तरी, सणासाठी जमलेल्या सर्वांना त्याने अद्‌भुत सामर्थ्य दाखवावे अशी त्यांची इच्छा आहे. परंतु येशूला त्यातील धोक्याची जाणीव आहे. तो म्हणतोः “जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही. पण ते माझा द्वेष करते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याविषयी साक्ष देतो.” या कारणामुळे येशू त्याच्या भावांना सांगतोः “तुम्ही वर सणाला जा, . . . मी काही आत्ताच ह्‍या सणास जात नाही.”

मंडपाचा सण हा सात दिवसांचा उत्सव असतो. आठव्या दिवशी पवित्र कार्यक्रमाने त्याचा समारोप केला जातो. हा सण कृषि-वर्षाचा शेवट दर्शवतो व मोठ्या आनंदाचा आणि उपकारस्तुतीचा काळ आहे. यात्रेकरूंच्या प्रमुख जथ्याबरोबर त्याचे भाऊ सण पाळण्यासाठी निघून गेल्यावर काही दिवसांनी तो व त्याचे शिष्य लोकांच्या नजरेपासून दूर, गुप्तपणे जातात. बहुतेक लोक यार्देन नदीजवळून जाणारा मार्ग घेतात. त्याऐवजी ते शोमरोनातून जाणारा रस्ता घेतात.

शमरोनी गावांमध्ये येशू व त्याच्या सोबत्यांना उतरण्यास जागेची गरज भासणार असल्याने, तशी तयारी करण्यासाठी तो निरोप्यांना पुढे पाठवतो. तो यरुशलेमला जात असल्याचे कळल्यावर लोक येशूसाठी काहीही करण्याचे नाकारतात. संतापून याकोब व योहान विचारतातः “गुरुजी, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे का?” अशी गोष्ट सुचवल्याबद्दल येशू त्यांना दटावतो व ते पुढील गावाकडे प्रवास करतात.

ते रस्त्याने चालत असताना एक शास्त्री येशूला विचारतोः “आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”

येशू उत्तर देतोः “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.” तो शास्त्री येशूचा अनुयायी झाल्यास त्याला कष्ट सहन करावे लागतील असे येशू सांगत आहे व तो शास्त्री अतिशय गर्विष्ठ असल्याने अशा प्रकारच्या जीवनाचा स्वीकार करणार नाही असा अर्थ यातून दिसतो.

दुसऱ्‍या एका माणसाला येशू म्हणतोः “माझ्या मागे ये.”

तो माणूस म्हणतोः “पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या.”

यावर येशू म्हणतोः “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरु दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” त्या माणसाचा पिता अजून मेलेला नाही हे उघड दिसते. कारण तसे असते तर बहुधा त्याचा मुलगा तेथे, येशूचा उपदेश ऐकत नसता. तो मुलगा आपल्या पित्याच्या मृत्युपर्यंत वेळ देण्याची विनंती करीत आहे. त्याच्या जीवनात देवाच्या राज्याला पहिले स्थान देण्याची त्याची तयारी नाही.

ते यरुशलेमाच्या वाटेवर पुढे जात असताना आणखी एक माणूस येशूला सांगतोः “मी आपल्या मागे येईन; परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या.’

उत्तरादाखल येशू म्हणतोः “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही.” येशूचे शिष्य होणाऱ्‍यांचे लक्ष राज्याच्या सेवेवर केंद्रित असले पाहिजे. नांगरणाऱ्‍याचे लक्ष अगदी सरळ, पुढे नसल्यास जसा चर वाकडा होईल तसा या जुन्या व्यवस्थेकडे मागे वळून पाहणारा, सार्वकालिक जीवनाकडे जाणाऱ्‍या मार्गापासून विचलीत होण्याचा संभव आहे. योहान ७:२-१०; लूक ९:५१-६२; मत्तय ८:१९-२२.

▪ येशूचे भाऊ कोण आहेत व त्यांच्या त्याच्याबद्दल काय भावना आहेत?

▪ शोमरोनी लोक इतके असभ्य का आहेत व याकोब आणि योहानाला काय करावेसे वाटते?

▪ वाटेवर येशूशी कोणती तीन संभाषणे होतात व आत्मत्यागाच्या सेवेच्या गरजेवर येशू कसा जोर देतो?