व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यशयाचा भविष्यवाद पूर्ण करणे

यशयाचा भविष्यवाद पूर्ण करणे

अध्याय ३३

यशयाचा भविष्यवाद पूर्ण करणे

परुशी व हेरोदाचे अनुयायी आपल्याला ठार करण्याचा बेत करीत आहेत असे समजल्यावर येशू व त्याचे शिष्य गालील समुद्राकडे निघून जातात. येथे, पॅलेस्टाईनच्या सर्व भागातून तसेच त्याच्या सीमेपलिकडूनही लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे येतात. तो अनेकांना बरे करतो. परिणामी भयंकर आजार असणारे लोक त्याला स्पर्श करण्यासाठी धडपडतात.

जमाव इतका मोठा असल्याकारणाने, येशू आपल्या शिष्यांना आपल्या कामासाठी सतत एक होडी तयार ठेवण्यास सांगतो. होडी किनाऱ्‍यापासून दूर नेल्याने जमाव त्याला करीत असलेली रेटारेटी तो रोखू शकतो. होडीतून तो त्यांना शिकवू शकतो किंवा किनाऱ्‍याने प्रवास करून दुसऱ्‍या ठिकाणच्या लोकांना मदत करू शकतो.

येशूची कार्ये, “यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते,” ते पूर्ण करतात असे शिष्य मत्तय नोंद करतो. मग, मत्तय येशूने पूर्ण केलेल्या यशयाच्या भविष्यवादाचा उतारा देतोः

“पाहा, हा माझा सेवक, ह्‍याला मी निवडिले आहे; तो मला परमप्रिय आहे; त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन. तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील. तो भांडणार नाही व ओरडणार नाही; व रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझवणार नाही. तो न्यायाला विजय देईल तोवर असे होईल. आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.”

येशू हा, अर्थातच, ज्याच्याबद्दल देव संतुष्ट आहे असा सेवक आहे. तो खोट्या धार्मिक रुढींमुळे दुर्बोध झालेला खरा न्याय काय आहे ते स्पष्ट करतो. देवाच्या नियमाचे अन्यायी अवलंबन केल्यामुळे परुशी शब्बाथ दिवशी आजारी माणसाला मुळीच मदत करणार नाहीत! देवाचा न्याय स्पष्ट करुन येशू लोकांना या अन्यायी रुढीपासून मोकळे करतो, आणि यासाठी ते धार्मिक पुढारी त्याला मारण्याचा प्रयत्न करतात.

पण मग, ‘तो भांडणार नाही, वा रस्त्यावर ऐकू जाणार इतका आवाजही वाढवणार नाही,’ याचा काय अर्थ होतो? लोकांना बरे करताना येशू, ‘मला प्रकट करू नका, अशी सक्‍त ताकीद देतो.’ रस्तोरस्ती, गोंगाटाने आपली जाहिरात व्हावी वा स्वतःविषयी विपर्यासाच्या बातम्या पसराव्या अशी त्याची इच्छा नाही.

तसेच, येशू आपला सांत्वनाचा संदेश, लाक्षणिक दृष्ट्या चेपलेल्या बोरुप्रमाणे, वाकलेल्या व पायदळी तुडवलेल्या लोकापर्यंत नेतो. ते विझायला आलेल्या मिणमिणत्या वातीसारखे आहेत. येशू, अशा या चेपलेल्या बोरुंना मोडत नाही वा मिणमिणत्या वातींना विझवत नाही. तर ममतेने व प्रेमाने लीनजनांना तो सहजतेने आधार देतो. खरोखर, रा ज्याच्यावर आशा ठेवू शकतात, असा येशूच आहे! मत्तय १२:१५-२१; मार्क ३:७-१२; यशया ४२:१-४.

▪ येशू न भांडता वा रस्त्यात आपला आवाज न वाढवता न्याय कसा स्पष्ट करतो?

▪ चेपलेल्या बोरुप्रमाणे व विझायला आलेल्या वातीप्रमाणे कोण आहेत व येशू त्यांना कसे वागवतो?