व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहूदीयामधील करुणेची कामगिरी

यहूदीयामधील करुणेची कामगिरी

अध्याय ८९

यहूदीयामधील करुणेची कामगिरी

काही आठवड्यांपूर्वी, यरुशलेममध्ये पुनःस्थापनेच्या सणाच्या वेळी, यहुद्यांनी येशूला जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तो उत्तरेला निघून गेला होता. ही जागा गालील समुद्रापासून दूर नसावी हे उघड आहे.

यार्देन नदीच्या पूर्वेकडील पेरिया प्रांतातील त्याच्या वाटेत येणाऱ्‍या गावात प्रचार करीत तो अलिकडेच पुन्हा दक्षिणेला यरुशलेमाच्या दिशेने जात आहे. श्रीमंत मनुष्य व लाजर यांचा दाखला सांगितल्यावर पूर्वी गालीलात असताना त्याने शिकवलेल्या गोष्टी तो आपल्या शिष्यांना शिकवत राहतो.

उदाहरणार्थ, तो म्हणतो की, देवाच्या या “लहानातील एकाला” एखाद्याने अडखळण करण्यापेक्षा “[अडखळण करणाऱ्‍याच्या] गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समद्रात टाकावे” हे त्या अडखळण करणाऱ्‍या माणसाच्या अधिक हिताचे आहे. “[एखाद्या भावाने] दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, ‘मला पश्‍चाताप झाला आहे’ असे म्हटले तरी त्याला क्षमा कर.” असा खुलासा करून क्षमा करण्याच्या गरजेवरही तो जोर देतो.

“आमचा विश्‍वास वाढवा,” अशी विनंती शिष्यांनी केली असता येशू उत्तर देतोः “तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्‍वास असेल तर, ह्‍या तुतीला, ‘तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा,’ असे तुम्ही म्हणताच ती तुमचे ऐकेल.” तेव्हा, थोडासा विश्‍वास देखील मोठ्या गोष्टी साध्य करू शकतो.

त्यानंतर, सर्वसमर्थ देवाच्या सेवकाच्या मनाचा योग्य कल समजावून सांगणाऱ्‍या एका सत्य परिस्थितीचे वर्णन तो करतोः “तुम्हापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘आत्ताच येऊन जेवावयाला बैस?’ उलट, ‘माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तू खा व पी’ असे तो त्याला म्हणणार नाही का? सांगितलेली कामे दासाने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो का? त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर, ‘आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे,’ असे म्हणा.” अशा रितीने देवाची सेवा केल्याने त्यांनी त्याच्यावर उपकार केले आहेत असे देवाच्या सेवकाला कधीही वाटता कामा नये. उलट, त्याच्या घरातील विश्‍वासू सदस्य या नात्याने त्याची भक्‍ती करण्याचा विशेष अधिकार त्यांना लाभला आहे याची त्यांनी सदैव आठवण ठेवावी.

असे दिसते की, येशूने हा दाखला दिल्यानंतर लवकरच एक निरोप्या येतो. यहूदीयातील बेथानी येथे राहणाऱ्‍या, लाजराच्या बहिणी मरिया व मार्था यांनी त्याला पाठवले होते. हा निरोप्या सांगतोः “प्रभुजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.”

येशू म्हणतोः “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्यायोगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे, ह्‍यासाठी आहे.” येशू जेथे आहे तेथे आणखी दोन दिवस राहिल्यावर त्याच्या शिष्यांना म्हणतोः “आपण पुन्हा यहूदीयात जाऊ या.” परंतु ते त्याला आठवण करून देतातः “गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार करावयास पाहात होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय?”

यावर येशू विचारतोः “दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्याठायी उजेड नसतो.”

“दिवसाचे . . . तास” अथवा येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्याला देवाने दिलेला काळ अजून संपलेला नाही, व तो संपेपर्यंत कोणीही त्याला अपाय करू शकत नाही, असा येशूच्या म्हणण्याचा अर्थ असावा असे दिसते. त्याच्यासाठी उरलेला “दिवसाचा” थोडासा वेळ त्याने पूर्णपणे वापरण्याची गरज आहे. कारण जेव्हा त्याच्या शत्रूंनी त्याला जिवे मारले असेल अशी “रात्र” त्यानंतर येईल.

येशू पुढे म्हणतोः “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो.”

लाजर झोपेत आराम करीत आहे व तो बरा होण्याचे हे खात्रीचे लक्षण आहे असे त्याच्या शिष्यांना वाटते हे उघड आहे. त्यामुळे शिष्य म्हणतातः “प्रभुजी, त्याला झोप लागली असली तर तो बरा होईल.”

तेव्हा येशू त्यांना निःसंदिग्धपणे सांगतोः “लाजर मेला आहे; आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्‍वास ठेवावा. तरी आपण त्याकडे जाऊ.”

यहूदीयामध्ये येशू मारला जाईल हे उमजून, तरी त्याला पाठिंबा देण्याची इच्छा असल्याने, थोमा आपल्या गुरुबंधूंना उत्तेजन देतोः “आपणही ह्‍याच्याबरोबर मरावयास जाऊ.” तेव्हा, आपल्या जिवावर जोखीम घेऊन, यहूदीयातील दयेच्या कामगिरीवर, शिष्य येशूसोबत जातात. लूक १३:२२; १७:१-१०; योहान १०:२२, ३१, ४०-४२; ११:१-१६.

▪ अलिकडे येशू कोठे प्रचार करीत आहे?

▪ येशू कोणत्या शिकवणीची पुनरावृत्ती करतो व कोणता मुद्दा उदाहरणासहित पटवण्यासाठी तो वास्तव जीवनाच्या परिस्थितीचे वर्णन करतो?

▪ येशूला कोणती बातमी कळते आणि “दिवस” व “रात्र” असे म्हणण्यात त्याचा काय अर्थ आहे?

▪ ‘आपणही जाऊ व त्याच्याबरोबर मरु,’ असे थोमाने म्हणण्याचा अर्थ काय आहे?