व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचा जन्म—कोठे व केव्हा?

येशूचा जन्म—कोठे व केव्हा?

अध्याय ५

येशूचा जन्म—कोठे व केव्हा?

रोमी साम्राज्याचा सम्राट कैसर औगुस्त याने, आपापल्या जन्मस्थानी नावनिशी लिहिण्यास प्रत्येकाने जावे असे फर्मान काढले आहे. यासाठीच, योसेफ आपले जन्मस्थान बेथलहेम या गावी जातो.

नावनिशी लिहिण्यास बेथलहेममध्ये पुष्कळ लोक आलेले आहेत. त्यामुळे योसेफ व मरीया यांना राहण्यासाठी फक्‍त एक तबेला सापडतो. गाढवे व इतर प्राणी ठेवतात अशा या जागी येशू जन्माला येतो. मरीया त्याला बाळंत्यामध्ये गुंडाळून गव्हाणीत, गुरांचा चारा ठेवला जातो तेथे, ठेवते.

कैसर औगुस्तने नावनिशीचा नियम काढावा हे नक्कीच देवाच्या मार्गदर्शनाने घडून आले असावे. त्यामुळे वचन दिलेल्या शासकाचे जन्मस्थान बेथलहेम असेल असे शास्त्रवचनात खूप पूर्वी लिहिल्याप्रमाणे, तेथे येशूचा जन्म होणे शक्य झाले.

ही किती महत्त्वाची रात्र आहे! बाहेर शेतामध्ये मेंढपाळांभोवती तेजस्वी प्रकाश पसरतो. ते यहोवाचे तेज आहे! आणि यहोवाचा दूत त्यांना सांगतोः “भिऊ नका. कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हांस सांगतो. ती ही की, तुमच्यासाठी आज दावीदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभु आहे. आणि तुम्हांस खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हास आढळेल.” अचानक आणखी अनेक देवदूत प्रकटतात व गातातः “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”

देवदूत गेल्यावर मेंढपाळ एकमेकांना म्हणतातः “चला, आपण बेथलहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट यहोवाने आपल्याला कळवली आहे, ती पाहू.” ते घाईने जातात व देवदूताने सांगितलेल्या जागी येशू त्यांना सापडतो. देवदूताने त्यांना कळवलेल्या गोष्टी मेंढपाळ सांगतात तेव्हा ऐकणारे आश्‍चर्यचकित होतात. या सर्व गोष्टींचे मनन करून मरीया त्यांना आपल्या हृदयात जतन करते.

येशूचा जन्म डिसेंबर महिन्याच्या २५ तारखेला झाला असा कित्येकांचा विश्‍वास आहे. परंतु बेथलहेम येथे डिसेंबरमध्ये हवामान थंड व पावसाळी असते. त्या वेळी आपल्या कळपासह मेंढपाळ रात्री शेतात असणार नाहीत. शिवाय, आधीच रोमी कैसराच्या विरुद्ध बंड करण्याचा कल असलेल्या लोकांना, भर थंडीच्या दिवसात तो नावनिशी लिहिण्यासाठी प्रवास करायला लावील हे असंभवनीय आहे. तेव्हा, येशूचा जन्म पानझडीच्या सुरवातीला—सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान—झाला असला पाहिजे. लूक २:१-२०; मीखा ५:२.

▪ योसेफ व मरीया बेथलहेमाला का जातात?

▪ येशूच्या जन्माच्या रात्री कोणती आश्‍चर्यकारक गोष्ट घडते?

▪ येशूचा जन्म डिसेंबर महिन्याच्या २५ तारखेला झाला नसल्याचे आपल्याला कसे कळते?