व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचा बाप्तिस्मा

येशूचा बाप्तिस्मा

अध्याय १२

येशूचा बाप्तिस्मा

योहान प्रचार करू लागल्यापासून साधारण सहा महिन्यांनी आता ३० वर्षांचा झालेला येशू योहानाकडे यार्देनेला येतो. कोणत्या कारणासाठी? सहज भेटण्यास? येशूला काय फक्‍त योहानाच्या कार्यात झालेल्या प्रगतीत रस आहे? नाही. येशू योहानाला त्याचा बाप्तिस्मा करण्याची विनंती करतो.

तात्काळ योहान त्यावर आक्षेप घेत म्हणतोः “आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असताना आपण माझ्याकडे येता हे काय?” आपला मावसभाऊ येशू हा देवाचा विशेष पुत्र असल्याचे योहानाला माहीत आहे. येशू गर्भात असताना मरीयेने अलीशिबेला भेट दिली असताना योहानाने आपल्या मातेच्या उदरात आनंदाने उडी मारली होती! योहानाची आई अलीशिबा हिने याबद्दल सांगितले असावे यात शंका नाही. येशूच्या जन्माविषयी देवदूताची घोषणा तसेच येशूच्या जन्माच्या रात्री मेंढपाळांना देवदूताचे प्रकट होणे याविषयीही तिने त्याला सांगितले असावे.

यामुळे योहान येशूशी अपरिचित नाही, आणि योहानाला माहीत आहे की, त्याचा बाप्तिस्मा येशूसाठी नाही. तो आहे आपल्या पापांबद्दल पश्‍चाताप करणाऱ्‍यांसाठी, परंतु येशू तर पापमुक्‍त आहे. या कारणास्तव, योहानाचा आक्षेप असला तरीही येशू त्याला गळ घालतो. तो म्हणतोः “आता हे होऊ दे, कारण ह्‍याप्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे आपल्याला उचित आहे.”

येशूचा बाप्तिस्मा होणे उचित का आहे? कारण येशूचा बाप्तिस्मा हा पापांसाठी पश्‍चातापाचे चिन्ह म्हणून नसून आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःला सादर करण्याचे ते चिन्ह आहे. येशूने आतापर्यंत सुताराचे काम केले आहे. परंतु, यहोवा देवाने त्याला पृथ्वीवर जे सेवाकार्य करण्यास पाठवले ते सुरु करण्याची त्याची वेळ आता आली आहे. येशूचा बाप्तिस्मा करण्याच्या वेळी काहीतरी विलक्षण घडेल अशी योहानाची अपेक्षा आहे असे तुम्हाला वाटते का?

नंतर योहान म्हणतोः “ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यास पाठवले त्याने मला सांगितले होते की, ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा कराणारा आहे.” या कारणास्तव, त्याने बाप्तिस्मा केलेल्या कोणा एकावर देवाचा आत्मा उतरण्याची योहान अपेक्षा बाळगत होता. त्यामुळे कदाचित, येशू पाण्यातून वर आल्यावर “यहोवाचा आत्मा कबुतरासारखा उतरताना” योहानाला दिसतो तेव्हा त्याला मुळीच आश्‍चर्य वाटत नाही.

परंतु, येशूचा बाप्तिस्मा होत असताना अधिक काही घडते. त्याच्या दृष्टीला ‘आकाश उघडले आहे’ असे दिसते. याचा अर्थ काय? त्याचा बाप्तिस्मा होत असताना, मानवी जीवनापूर्वीच्या, स्वर्गातील जीवनाची आठवण परतते, असा याचा अर्थ आहे हे उघड आहे. अशा रितीने, मानव-जन्मापूर्वी स्वर्गात देवाने त्याला सांगितलेल्या सर्व गोष्टींसह यहोवा देवाच्या आत्मिक पुत्राच्या रुपातील आपल्या जीवनाची सर्व आठवण आता येशूला होते.

याशिवाय, त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी स्वर्गातून एक वाणी होतेः “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे. ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” हा आवाज कोणाचा असावा? येशूचा स्वतःचा? निश्‍चितच नाही! तो देवाचा आहे. काही लोक दावा करतात तसा येशू स्वतः देव नसून देवाचा पुत्र आहे हे उघड आहे.

परंतु येशू देवाचा मानवी पुत्र आहे, अगदी, प्रथम मानव आदामाप्रमाणे. येशूच्या बाप्तिस्म्याचे वर्णन केल्यानंतर लूक लिहितोः “येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. योसेफ एलीचा, . . . तो दावीदाचा, . . . तो अब्राहामाचा, . . . तो नोहाचा, . . . तो आदामाचा, तो देवाचा पुत्र.”

जसा आदाम हा “देवाचा पुत्र” मानवी होता, तसाच येशूही आहे. येशूच्या जीवनाचा अभ्यास केल्यावर दिसून येते की, येशू हा सर्व मानवांमध्ये श्रेष्ठ आहे. परंतु त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याचे देवाशी नवीन नाते जुळते. तो देवाचा आध्यात्मिक पुत्रही होतो. दोषी ठरलेल्या मानवजातीसाठी आपल्या मानवी जीवनाचे कायमचे बलिदान द्यावे लागेल अशा मार्गावर चालण्याची त्याची सुरवात करून, देव जणू त्याला स्वर्गात परत बोलावीत आहे. मत्तय ३:१३-१७; लूक ३:२१-३८; १:३४-३६, ४४; २:१०-१४; योहान १:३२-३४; इब्रीयांस १०:५-९.

▪ योहानासाठी येशू अनोळखी असा का नाही?

▪ येशूने पाप केले नसताना येशूचा बाप्तिस्मा का होतो?

▪ योहानाला येशूची असलेली माहिती लक्षात घेता, देवाचा आत्मा येशूवर उतरला तेव्हा योहानाला आश्‍चर्य का वाटले नसावे?