व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचा मृत्यु जवळ येत असता शिष्य वाद घालतात

येशूचा मृत्यु जवळ येत असता शिष्य वाद घालतात

अध्याय ९८

येशूचा मृत्यु जवळ येत असता शिष्य वाद घालतात

येशू व त्याचे शिष्य यार्देन नदीपाशी असून ती पार करून ते पेरिया प्रांतातून यहूदीयात येतात. एखादा आठवडा दूर असलेल्या इ. स. ३३च्या वल्हांडण सणासाठी इतर अनेक त्यांच्याबरोबर प्रवास करीत आहेत.

येशू शिष्यांच्या पुढे चालत आहे व त्याच्या खंबीर निर्धाराचे त्यांना आश्‍चर्य वाटत आहे. थोड्याच आठवड्यांपूर्वी लाजर मेला व येशू पेरियाहून यहूदीयाला निघणार असताना, “आपणही ह्‍याच्याबरोबर मरावयास जाऊ,” असे उत्तेजन थोमाने इतरांना दिले होते याची आठवण करा. तसेच येशूने लाजराला उठवल्यावर येशूला जिवे मारवण्याच्या योजना न्यायसभेत केल्या गेल्या याचीही आठवण करा. तेव्हा आता यहूदीयात प्रवेश करीत असताना शिष्यांना भीती वाटते यात नवल नाही.

पुढे वाढून ठेवलेल्या गोष्टीसाठी त्यांची तयारी करण्यासाठी त्या १२ जणांना खाजगीत घेऊन येशू त्यांना सांगतोः “पाहा, आपण वर यरुशलेमास जात आहो आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्र्यांच्या हाती धरुन देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील; आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील. आणि तिसऱ्‍या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.”

गेल्या काही महिन्यात येशूने त्याच्या शिष्यांना आपल्या मृत्यु व पुनरुत्थानाबद्दल हे तिसऱ्‍यांदा सांगितले आहे. आणि त्यांनी त्याचे ऐकले तरी त्यांच्या लक्षात आले नाही. कदाचित, इस्राएल राष्ट्राच्या पृथ्वीवरील पुनर्स्थापनेवर त्यांचा विश्‍वास आहे व ख्रिस्तासह भूतलावरील राज्यात गौरव व सन्मान उपभोगण्याची ते वाट पाहत असल्याने, असे होते.

वल्हांडणासाठी जाणाऱ्‍या प्रवाशांमध्ये, प्रेषित याकोब व योहान यांची आई सलोमी आहे. या दोघांना येशूने “गर्जनेचे पुत्र” म्हटले आहे, ते त्यांच्या तापट स्वभावामुळे, यात शंका नाही. काही काळापासून या दोघांनी ख्रिस्ताच्या राज्यात श्रेष्ठ होण्याची आकांक्षा बाळगली आहे व त्यांनी आपली इच्छा आपल्या आईला सांगितली आहे. आता ती त्यांच्या वतीने येशूजवळ येते, त्याच्या पाया पडते व त्याला काही मागते.

“तुला काय पाहिजे?” येशू विचारतो.

ती म्हणतेः “तुमच्या राज्यात ह्‍या माझ्या दोघा मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा.”

या विनंतीचे मूळ जाणून, याकोब व योहानाला येशू म्हणतोः “तुम्ही काय मागता हे तुम्हास समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय?”

“पिता येईल,” असे ते म्हणतात. त्याला भयंकर छळाला व शेवटी मृत्युला तोंड द्यावयाचे आहे, असे येशूने नुकतेच सांगितले असले तरी, तो लवकरच पिणार असलेला “प्याला” हाच आहे असा त्याच्या बोलण्याचा अर्थ असल्याचे त्यांच्या ध्यानात येत नाही असे दिसते.

तरीही येशू त्यांना सांगतोः “माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही. तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला आहे त्याच्यासाठी तो आहे.”

काही वेळाने याकोब व योहानाने केलेली विनंती इतर दहा प्रेषितांना कळते व ते संतापतात. त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे याबद्दलच्या त्यांच्या आपसातील पूर्वीच्या वादामध्ये कदाचित याकोब व योहान हे ठळक होते. येशूने याबाबतीत दिलेला सल्ला त्यांनी लागू केला नसल्याचे त्यांच्या या विनंतीवरून प्रकट होते. दुःखाची गोष्ट अशी की प्रसिद्धीची त्यांची इच्छा अजूनही प्रबळ आहे.

तेव्हा या सर्वात अलिकडील वादविवादाला त्यामुळे उत्पन्‍न झालेल्या द्वेषबुद्धिला हाताळण्यासाठी येशू त्या १२ जणांना एकत्र बोलावतो. प्रेमाने त्यांना सल्ला देत तो म्हणतोः “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात हे तुम्हास ठाऊक आहे. तसे तुमच्यामध्ये नाही. तर जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल. आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल.”

शिष्यांनी अनुकरण करावे असे सुंदर उदाहरण येशूने घालून दिले आहे. तो खुलासा करतोः “ह्‍याप्रमाणे, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला जीव अर्पण करण्यास आला आहे.” इतरांच्या वतीने येशूने सेवाच केली असे नसून, मानवजातीसाठी मरण्यापर्यंत तो सेवा करीत राहील! सेवा करून घेण्यापेक्षा सेवा करण्याच्या व श्रेष्ठ स्थानावर कनिष्ठ होण्याच्या ख्रिस्तासारख्या स्वभावाची शिष्यांना गरज आहे. मत्तय २०:१७-२८; मार्क ३:१७; ९:३३-३७; १०:३२-४५; लूक १८:३१-३४; योहान ११:१६.

▪ आता शिष्यांना भीती का वाटते?

▪ पुढे होणाऱ्‍या गोष्टींसाठी येशू त्याच्या शिष्यांना कसे तयार करतो?

▪ येशूला काय विनंती केली जाते व त्याचा इतर प्रेषितांवर काय परिणाम होतो?

▪ त्याच्या प्रेषितांमधील समस्येला येशू कसे हाताळतो?