व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचे पहिले शिष्य

येशूचे पहिले शिष्य

अध्याय १४

येशूचे पहिले शिष्य

अरण्यात चाळीस दिवस राहिल्यावर येशू, त्याला बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाकडे परत येतो. तो येत असल्याचे पाहून, बहुधा त्याच्याकडे बोट दाखवून, तेथे उपस्थित असलेल्यांना योहान सांगतोः “हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे; कारण तो माझ्यापूर्वी होता असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे.” योहान हा आपला मावसभाऊ येशूपेक्षा वडील असला तरी स्वर्गातील एक आत्मिक व्यक्‍ती म्हणून येशू त्याच्या आधी अस्तित्वात होता हे योहानाला माहीत आहे.

तरीही थोड्याच आठवड्यांपूर्वी बाप्तिस्मा घेण्यासाठी येशू आला तेव्हा येशू हाच मशीहा असल्याबद्दल योहानाची खात्री नसावी. तो कबूल करतोः “मी तर त्याला ओळखत नव्हतो,” पण “त्याने इस्राएलांस प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो आहे.”

त्याने येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा घडलेल्या गोष्टींबद्दल आपल्या श्रोत्यांना योहान पुढे खुलासा करतोः “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखत नव्हतो, तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठवले त्याने मला सांगितले होते की, ‘ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’ मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”

दुसऱ्‍या दिवशी योहान आपल्या दोन शिष्यांसह उभा आहे. पुन्हा येशू आपल्याकडे येत असताना पाहून तो म्हणतोः “हा पहा देवाचा कोकरा!” तेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे ते दोघे शिष्य येशूच्या मागे जातात. त्यातील एक आंद्रिया आहे व दुसरा या सर्व गोष्टी लिहिणारा स्वतःच आहे हे स्पष्ट आहे. त्याचे नावही योहान आहे. एकंदर परिस्थितीवरून हा योहान, मरीयेची बहीण सलोमे हिचा मुलगा, येशूचा दुसरा एक मावस भाऊ आहे.

वळल्यावर आंद्रिया व योहान यांना आपल्या मागे येताना पाहून येशू विचारतोः “तुम्ही काय शोधीत आहात?”

ते विचारतातः “गुरुजी, तुम्ही कोठे राहता?”

येशू उत्तर देतोः “या म्हणजे तुम्ही पाहाल.”

दुपारचे सुमारे चार वाजले आहेत व आंद्रिया आणि योहान उरलेला दिवस येशू बरोबर राहतात. त्यानंतर आंद्रिया इतका उत्तेजित होतो की पेत्र नावाच्या आपल्या भावाला शोधण्यासाठी तो घाईने जातो. तो त्याला सांगतो, “आम्हाला मसीहा सापडला आहे.” आणि तो पेत्राला येशूकडे घेऊन जातो. कदाचित योहानही तेव्हा आपला भाऊ याकोब याला शोधून येशूकडे आणतो. पण स्वभावाला अनुसरून योहान आपल्या सुवार्तेतून ही वैयक्‍तीक माहिती वगळतो.

दुसऱ्‍या दिवशी येशू फिलिप्पाला भेटतो. हा बेथसैदा गावचा असून आंद्रिया व पेत्रही मूळचे याच गावचे आहेत. येशू त्याला पाचारण करतोः “माझ्या मागे ये.”

मग, फिलिप्प नथनेलला भेटतो. नथनेलला बर्थलमय असेही म्हटले जाई. फिलिप्प म्हणतोः “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेथकर आम्हाला सापडला आहे.” नथनेलला शंका आहे. तो विचारतोः “नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?”

फिलिप्प त्याला आग्रह करतोः “येऊन पाहा.” ते येशूकडे येत असताना नथनेलबद्दल येशू म्हणतोः “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे. ह्‍याच्याठायी कपट नाही.”

“आपल्याला माझी ओळख कोठली?” नथनेल विचारतो.

येशू उत्तरतोः “फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले.”

नथनेलला आश्‍चर्य वाटते. तो म्हणतोः “गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहा.”

येशू विचारतोः “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्‍वास धरतोस काय?” मग तो त्याला वचन देतोः “मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.”

यानंतर लवकरच, आपल्या नव्या शिष्यांसह येशू यार्देनेची दरी सोडून गालीलाकडे प्रवास करतो. योहान १:२९-५१.

▪ येशूचे पहिले शिष्य कोण?

▪ पेत्राची व कदाचित याकोबाची येशूशी ओळख कशी करून दिली जाते?

▪ येशू देवाचा पुत्र असल्याबद्दल नथनेलची खात्री कशी पटते?