व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूच्या गावातील सभास्थानात

येशूच्या गावातील सभास्थानात

अध्याय २१

येशूच्या गावातील सभास्थानात

येशू घरी परत येतो तेव्हा तेथे खळबळ होते यात शंका नाही. एका वर्षापेक्षा थोड्या अधिक काळापूर्वी योहानाकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी तो गेला त्या आधी, तो एक सुतार म्हणून ओळखला जात होता. परंतु आता चमत्कार करणारा म्हणून त्याची दूरवर ख्याति आहे. तसे चमत्कार आपल्यामध्ये घडलेले पाहण्यास स्थानिक रहिवासी उत्सुक आहेत.

त्याच्या रिवाजाप्रमाणे येशू स्थानिक सभास्थानात जातो तेव्हा त्यांची अपेक्षा वाढते. उपासनेमध्ये तो वाचावयास उभा राहतो व त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट देण्यात येतो. यहोवाच्या आत्म्याने अभिषेक केलेल्या व्यक्‍तीबद्दल जेथे सांगितले आहे ती जागा तो शोधतो. ती जागा आहे, आपल्या आजच्या पवित्र शास्त्रातील यशयाचा ६१ वा अध्याय.

ती व्यक्‍ती, धरुन नेलेल्यांची सुटका, अंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ कसा देते व यहोवाच्या प्रसादाचे वर्ष याबद्दल वाचून झाल्यावर येशू सेवकाला ग्रंथपट परत देतो व खाली बसतो. सर्व डोळे त्याच्यावर खिळले आहेत. मग, खुलासा करत, कदाचित विस्तारितपणे, तो बोलतोः “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.

त्याच्या ‘कृपा वचनां’बद्दल लोक आश्‍चर्य करू लागतात व एकमेकांना म्हणतातः “हा योसेफाचा पुत्र ना?” परंतु त्यांना चमत्कार पाहण्याची इच्छा असल्याचे जाणून येशू पुढे म्हणतोः “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, ‘हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्या असे आम्ही ऐकले, त्या येथेही आपल्या गावी कर.’” घरी किंवा स्वदेशी त्याने आपल्या स्वतःच्या लोकांना प्रथम बरे करावे असे येशूच्या पूर्वीच्या शेजाऱ्‍यांना वाटत असावे हे उघड आहे. यामुळे, येशू आपल्याला तुच्छ लेखत आहे असे त्यांना वाटते.

येशू त्यांचे विचार ओळखून त्यांना लागू होणाऱ्‍या काही ऐतिहासिक घटना सांगतोः एलियाच्या काळात इस्राएलामध्ये अनेक विधवा होत्या परंतु एलियाला त्यांच्यापैकी कोणाकडेही पाठवले गेले नाही, याकडे तो लक्ष वेधतो. उलट, सीदोनमधील एका यहुद्देत्तर विधवेकडे तो गेला, जेथे त्याने जीव वाचविण्याचा चमत्कार केला. तसेच अलीशाच्या काळी अनेक कुष्ठरोगी होते, पण अलीशाने फक्‍त सूरियाच्या नामानाला शुद्ध केले.

त्यांचा स्वार्थ व अविश्‍वासूपणा उघडकीस आणणाऱ्‍या ऐतिहासिक घटनांशी तुलना केल्यामुळे संतापून, सभास्थानातील लोक उठतात व येशूला गावाबाहेर नेतात. तेथे, ज्या डोंगरावर नासरेथ वसलेले आहे त्याच्या कड्यावरुन त्याला टाकण्याचा प्रयत्न करतात. पण येशू त्यांच्या हातून सुटतो व सुरक्षितपणे निघून जातो. लूक ४:१६-३०; १ राजे १७:८-१६; २ राजे ५:८-१४.

▪ नासरेथमध्ये खळबळ का उडते?

▪ येशूच्या भाषणाबद्दल लोक काय म्हणतात, पण मग त्यांना इतका संताप कशाने येतो?

▪ लोक येशूला काय करण्याचा प्रयत्न करतात?