व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूच्या यरुशलेमच्या शेवटल्या प्रवासात दहा कुष्ठरोगी बरे होतात

येशूच्या यरुशलेमच्या शेवटल्या प्रवासात दहा कुष्ठरोगी बरे होतात

अध्याय ९२

येशूच्या यरुशलेमच्या शेवटल्या प्रवासात दहा कुष्ठरोगी बरे होतात

यरुशलेम सोडून ईशान्येकडील कदाचित २४ किलोमीटर्सवरील एफ्राईम गावी जाऊन, येशू, त्याला जिवे मारण्याचे न्यायसभेचे प्रयत्न निष्फळ करतो. तेथे तो आपल्या शिष्यांसह, त्याच्या शत्रूपासून दूर राहतो.

परंतु, इ. स. ३३ च्या वल्हांडणाची वेळ जवळ येत आहे व लवकरच येशू मार्गाला लागतो. तो शोमरोनातून वर गालीलकडे प्रवास करतो. त्याच्या मृत्युपूर्वी त्या भागाला ही त्याची शेवटली भेट होय. गालीलात असताना वल्हांडण सण साजरा करण्यासाठी यरुशलेमाला जाणाऱ्‍या इतरांमध्ये, बहुधा तो व त्याचे शिष्य सामील होतात. यार्देन नदीच्या पूर्वेकडील पेरिया प्रांतातून जाणारा रस्ता ते धरतात.

प्रवासाच्या सुरवातीला, शोमरोन अथवा गालीलातील एका गावात येशू प्रवेश करत असताना, कुष्ठरोग झालेली दहा माणसे त्याला भेटतात. या भयानक रोगाने हळूहळू माणसाचे अवयव, त्याची हातापायाची बोटे, त्याचे कान, त्याचे नाक व त्याचे ओठ हे झडू लागतात. संसर्गापासून इतरांचा बचाव व्हावा म्हणून कुष्ठरोग्यांबद्दल देवाचा नियम म्हणतोः “त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि ‘अशुद्ध, अशुद्ध,’ असे ओरडत जावे. जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे. . . . छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.”

ते दहा कुष्ठरोगी, त्यांच्यासाठी असलेली नियमशास्त्रातील बंधने पाळतात व येशूपासून दूर राहतात. पण ते मोठ्याने ओरडून म्हणतातः “हे गुरु येशू, आमच्यावर दया कर.”

त्यांना दूरवर असलेले पाहून येशू आज्ञा करतोः “तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा.” आपल्या आजारापासून बऱ्‍या झालेल्या कुष्ठरोग्यांना बरे झाल्याचा निर्वाळा देण्याचा अधिकार देवाच्या नियमशास्त्राने याजकांना दिलेला असल्यामुळे येशू तसे म्हणतो. अशा रितीने ह्‍या लोकांना पुन्हा निरोगी लोकांबरोबर राहण्याची मान्यता मिळते.

येशूच्या अद्‌भूत सामर्थ्यावर या दहा कुष्ठरोग्यांचा भरवसा आहे. या कारणामुळे, अजून बरे केले गेले नसतानाच, याजकांना भेटण्यासाठी ते त्वरेने जातात. तेथे जात असताना मार्गातच, येशूवरील त्यांच्या विश्‍वासाला प्रतिफळ मिळते. त्यांना बरे झाल्याचे दिसते व जाणवते.

शुद्ध झालेल्या कुष्ठरोग्यातील नऊ तसेच पुढे जातात. पण शोमरोनी असलेला तो दहावा कुष्ठरोगी येशूला शोधण्यासाठी परत येतो. का बरे? कारण त्याच्या बाबतीत घडलेल्या गोष्टीबद्दल तो अत्यंत कृतज्ञ आहे. तो उच्च स्वरात देवाची स्तुती करतो आणि त्याला येशू सापडल्यावर, त्याचे आभार मानीत तो त्याच्या पाया पडतो.

ते पाहून येशू म्हणतोः “दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग, नऊ जण कोठे आहेत? ह्‍या परक्यावाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय?”

मग तो त्या शोमरोनी माणसाला सांगतोः “उठ, जा. तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे.”

येशूने दहा कुष्ठरोग्यांना बरे केल्याबद्दल आपण वाचतो तेव्हा, “मग नऊ जण कोठे आहेत?” या प्रश्‍नाने सूचित असलेल्या धड्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्या नऊ जणांनी दाखवलेली अकृतज्ञता हा एक गंभीर दोष आहे. देवाच्या नव्या जगामध्ये सार्वकालिक जीवनाच्या वचनासह देवाकडून मिळणाऱ्‍या गोष्टींबद्दल, त्या शोमरोनी माणसाप्रमाणे आपण देखील कृतज्ञ असल्याचे दाखवू का? योहान ११:५४, ५५; लूक १७:११-१९; लेवीय १३:१६, १७, ४५, ४६; प्रकटीकरण २१:३, ४.

▪ येशू, त्याला मारण्याचे प्रयत्न कसे निष्फळ करतो?

▪ त्यानंतर येशू कोठून प्रवास करतो व त्याला कोठे जायचे आहे?

▪ कुष्ठरोगी दूर अंतरावर का उभे राहतात व येशू याजकाकडे जाण्यास त्यांना का सांगतो?

▪ या अनुभवापासून आपण कोणता धडा घ्यावा?