व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूला ठार मारण्याचे आणखी प्रयत्न

येशूला ठार मारण्याचे आणखी प्रयत्न

अध्याय ८१

येशूला ठार मारण्याचे आणखी प्रयत्न

तेहिवाळ्याचे दिवस असल्यामुळे येशू शलमोनाची देवडी म्हटल्या गेलेल्या आडोशाच्या जागेत चालत आहे. ती मंदिराजवळच आहे. येथे यहुदी त्याला गराडा घालून म्हणू लागतातः “तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हास उघड सांगा.”

येशू प्रत्युत्तर देतोः “मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्‍वास ठेवीत नाही.” विहीरीपाशी शोमरोनी स्त्रीला सांगितल्याप्रमाणे येशूने आपण ख्रिस्त असल्याचे, त्यांना सरळपणे सांगितले नव्हते. तरी तो वरचा आहे तसेच अब्राहामापूर्वी तो होता असा खुलासा करून वस्तुतः त्याने आपली ओळख दिली होती.

येशूची मात्र इच्छा आहे की, ख्रिस्त ज्या गोष्टी साध्य करील अशी भविष्यवाणी पवित्र शास्त्र करते त्याच्याशी, त्याच्या कार्याची तुलना करून तो ख्रिस्त आहे असे अनुमान लोकांनी काढावे. या कारणामुळे, तो ख्रिस्त असल्याचे कोणालाही सांगू नये असे त्याने आपल्या शिष्यांना बजावले होते. आणि याच कारणामुळे या प्रतिकूल यहुद्यांना तो आता म्हणतोः “जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तरी तुम्ही विश्‍वास ठेवीत नाही.”

ते विश्‍वास का ठेवीत नाहीत? येशू हाच ख्रिस्त असल्याचा पुरावा असल्याने? नाही, तर येशू पुढे त्यांच्याशी बोलताना सांगतो, त्या कारणांसाठी. तो म्हणतोः “तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही. आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही.”

मग, येशू त्याच्या पित्याशी असलेल्या नजिकच्या संबंधाचे वर्णन करतो. तो स्पष्ट करतोः “मी आणि पिता एक आहो.” येशू पृथ्वीवर व त्याचा पिता स्वर्गात असल्याने तो व त्याचा पिता शब्दशः वा शरीराने एक आहेत असे तो म्हणत नाही. तर त्यांचे ध्येय एक आहे, त्यांच्यात एकता आहे असा त्याचा अर्थ आहे.

येशूच्या बोलण्याने संतापून, मागे मंडपाच्या सणाच्या वेळी केले तसे त्याला मारण्यासाठी ते दगड उचलतात. त्याला मारु पाहणाऱ्‍यांना धीराने तोंड देऊन येशू म्हणतोः “मी पित्याकडील पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हाला दाखवली आहेत. त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता?”

ते उत्तर देतातः “चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुम्हाला दगडमार करीत नाही. तर दुर्भाषणासाठी. कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता.” आपण देव असल्याचा दावा येशूने कधीही केला नसला तरी यहुदी असे का म्हणतात?

जे सामर्थ्य केवळ देवापाशी आहे अशी त्यांची भावना आहे ते येशूने स्वतःला लावल्यामुळे ते असे म्हणतात हे उघड आहे. उदाहरणार्थ, “मेंढरां”बद्दल तो आत्ताच म्हणाला की, “मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो.” ही गोष्ट कोणीही माणूस करू शकत नाही. परंतु आपल्या पित्यापासून तो अधिकार प्राप्त झाल्याचे येशू मान्य करतो याकडे यहुद्यांचे दुर्लक्ष होते.

येशू विचारतोः “‘तुम्ही देव आहा, असे मी म्हणालो,’ हे तुमच्या शास्त्रात [स्तोत्रसंहिता ८२:६ मध्ये] लिहिलेले नाही काय? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले, . . . तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठविले त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरुन, ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?” यानंतर, आपण स्वतःला देवापेक्षा लहान समजत असल्याचे येशू दाखवतो.

शास्त्रलेख अन्यायी मानवी न्यायधिशांना देखील “देव” म्हणत असल्यामुळे, “मी देवाचा पुत्र आहे” असू येशूने म्हटल्याबद्दल यहुदी त्याला काय दोष देणार? येशू पुढे म्हणतोः “मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर विश्‍वास ठेवू नका. परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्‍वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्‍वास ठेवा. अशासाठी की माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे.”

येशूने असे म्हटल्यावर यहुदी त्याला धरण्याचा प्रयत्न करतात. परंतु मंडपाच्या सणाच्या वेळेप्रमाणे येशू निसटून जातो. तो यरुशलेम सोडतो व यार्देन नदी पार करून साधारण चार वर्षांपूर्वी योहानाने बाप्तिस्मा करण्यास जेथे सुरवात केली तेथे येतो. ही जागा, यरुशलेमापासून दोन एक दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावर, गालील समुद्राच्या दक्षिण किनाऱ्‍याजवळ आहे असे दिसते.

या जागी येशूकडे पुष्कळ लोक येतात व म्हणू लागतातः “योहानाने काही चिन्ह केले नाही खरे, तरी योहानाने ह्‍याच्याविषयी जे काही सांगितले आहे ते सर्व खरे आहे.” अशा रितीने, येथे अनेक लोक येशूवर विश्‍वास ठेवतात. योहान १०:२२-४२; ४:२६; ८:२३, ५८; मत्तय १६:२०.

▪ आपण ख्रिस्त आहोत असे लोकांनी कशाच्या आधारावर ओळखावे अशी येशूची इच्छा आहे?

▪ येशू व त्याचा पिता एक कसे आहेत?

▪ येशू स्वतःला देव म्हणवतो असे यहुद्यांनी म्हणण्याचे कारण काय असावे असे दिसते?

▪ येशूने स्तोत्रसंहितेतून उतारा उद्धृत केल्याने, तो स्वतःला देवाच्या बरोबरीचा समजत नसल्याचे कसे दिसून येते?