व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू अद्‌भूतरित्या हजारोंना जेवू घालतो

येशू अद्‌भूतरित्या हजारोंना जेवू घालतो

अध्याय ५२

येशू अद्‌भूतरित्या हजारोंना जेवू घालतो

बारा प्रेषितांनी एका विलक्षण प्रचाराच्या दौऱ्‍याचा आनंद गालीलभर लुटला आहे. आता योहानाच्या वधानंतर लवकरच ते येशूकडे परत येतात व आपल्या आश्‍चर्यकारक अनुभवांचे वर्णन करतात. ते थकलेले असून येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या अनेक लोकांमुळे त्यांना जेवणाची सवडही मिळत नाही असे पाहून येशू म्हणतोः “चला, आपण रानात एकांती जाऊ; तेथे तुम्हाला विसावा घेता येईल.”

कदाचित, कफर्णहूमाहून जवळ, नावेत बसून ते आडवाटेच्या जागेकडे जाऊ लागतात. ती जागा यार्देनेच्या पूर्वेला बेथेसदाच्या पलिकडे असावी. परंतु, अनेक लोक त्यांना जाताना पाहतात व इतरांना त्याबद्दल कळते. ते सर्व समुद्रकिनाऱ्‍याने पुढे धावत जातात व नाव किनाऱ्‍याला लागते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी लोक तेथे आहेत.

नावेतून उतरल्यावर मोठ्या जमावाला पाहून येशूला दया येते. कारण मेंढपाळाविना असलेल्या मेंढरांसारखे ते लोक आहेत. म्हणून तो त्यांच्या रोग्यांना बरे करतो व त्यांना अनेक गोष्टी शिकवू लागतो.

वेळ भराभर जातो आणि येशूचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणतातः “ही अरण्यातील जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतःसाठी खाण्यास काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”

परंतु उत्तरादाखल येशू म्हणतोः “तुम्हीच त्यांना खावयास द्या.” आपण काय करणार आहोत हे येशूला माहीत असल्याने मग, “ह्‍यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या?” असे विचारून तो फिलिप्पाची परीक्षा घेतो.

फिलिप्पाच्या दृष्टीकोणातून हे प्रकरण अशक्य कोटीतले आहे. तेथे जवळपास ५,००० पुरुष आहेत, आणि स्त्रिया व मुले जमेस धरता एकंदर लोक १०,००० च्या वर आहेत! फिलिप्प उत्तरतो की, “ह्‍यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे दिनारांच्या [त्या काळी एका दिवसाची मजुरी एक दिनार होती] भाकरी पुरणार नाहीत.”

कदाचित इतक्या लोकांना खायला देण्याची अशक्यता दाखवण्यासाठी आंद्रिया म्हणतोः “येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत. परंतु इतक्या लोकांना त्या कशा पुरणार?”

इ. स. ३२ च्या वल्हांडणापूर्वीचा हा काळ असून वसंत ऋतु असल्याने सर्वत्र खूप हिरवळ आहे. म्हणून लोकांनी ५० व १०० च्या गटांनी गवतावर बसावे असे त्यांना सांगण्याची आज्ञा येशू त्याच्या शिष्यांना करतो. तो त्या पाच भाकरी व दोन मासळ्या घेतो, स्वर्गाकडे पाहतो व धन्यवाद देतो. मग, तो त्या भाकऱ्‍या मोडू लागतो व मासळ्यांचे तुकडे करू लागतो. तो ते आपल्या शिष्यांना देतो व ते त्यांना लोकांमध्ये वाटतात; आणि काय आश्‍चर्य, सर्व लोक पोटभर जेवतात!

नंतर, येशू त्याच्या शिष्यांना सांगतोः “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” तसे केल्यावर, खाल्लेल्यातून उरलेल्याने त्यांनी १२ टोपल्या भरल्या! मत्तय १४:१३-२१; मार्क ६:३०-४४; लूक ९:१०-१७; योहान ६:१-१३.

▪ येशू आपल्या शिष्यांसाठी एकांताची जागा का शोधतो?

▪ येशू त्याच्या शिष्यांना कोठे नेतो व त्यांना विश्रांती का मिळत नाही?

▪ दिवस उतरल्यावर शिष्य कशाचा आग्रह करतात, परंतु येशू लोकांची कशी काळजी घेतो?