व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू आणि ज्योतिषी

येशू आणि ज्योतिषी

अध्याय ७

येशू आणि ज्योतिषी

पूर्वेकडून अनेक लोक येतात. ते ताऱ्‍यांच्या स्थितीचा अर्थ सांगणारे, ज्योतिषी आहेत. पूर्वेला आपल्या घरी असताना त्यांनी एक नवा तारा पाहिलेला आहे, आणि त्याच्यामागे प्रवास करीत ते शेकडो किलोमीटरवरील यरुशलेमला आले आहेत.

यरुशलेमला आल्यावर ते ज्योतिषी विचारतातः “यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करायला आलो आहोत.”

यरुशलेम येथील हेरोद राजा हे ऐकतो व फार अस्वस्थ होतो. यामुळे तो प्रमुख याजकांना बोलावतो व ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे ते विचारतो. शास्त्रवचनाच्या आधारावर ते उत्तर देतातः “बेथलहेमात.” तेव्हा हेरोद त्या ज्योतिषांना आणवून त्यांना सांगतोः “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.” परंतु, वास्तविक, त्या बाळाला मारण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेऊ इच्छितो.

ते निघाल्यावर एक आश्‍चर्यकारक गोष्ट घडते. पूर्वेकडे असताना त्यांनी पाहिलेला तारा त्यांच्यापुढे जाऊ लागतो. हा काही सर्वसामान्य तारा नाही हे उघड आहे. तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेषेकरुन नेमलेला आहे. नेमका, योसेफ व मरीया राहात असलेल्या घरावर तो थांबेपर्यंत ज्योतिषी त्याच्या पाठोपाठ चालतात.

ज्योतिषी घरात शिरतात तेव्हा मरीया तिच्या लहान मुलासह, येशूसह, त्यांना दिसते. ते सर्व त्याला नमन करतात, व आपल्या थैल्या काढून सोने, ऊद व गंधरस यांच्या भेटी देतात. त्यांनतर बालक कोठे आहे ते हेरोदाला सांगण्यासाठी परतण्याच्या तयारीत असताना तसे न करण्याविषयी, एका स्वप्नात देव त्यांना सूचना करतो. त्यामुळे ते दुसऱ्‍याच मार्गाने स्वदेशी जातात.

ज्योतिषांना मार्गदर्शन करण्यासाठी आकाशात चालणारा हा तारा कोणी पाठवला असावा असे तुम्हाला वाटते? त्या ताऱ्‍याने त्यांना थेट बेथलहेमात येशूकडे नेले नाही हे लक्षात घ्या. उलट, येशूला मारु इच्छिणाऱ्‍या हेरोदाकडे यरुशलेमात त्यांना आणले गेले. आणि देवाने मध्ये पडून येशू कोठे आहे ते हेरोदाला न सांगण्याबद्दल ज्योतिषांना सूचना दिली नसती तर हेरोदाने येशूला मारलेच असते. देवाचा शत्रू, दियाबल सैतानाला येशूला ठार करण्याची इच्छा होती व आपला हेतू साध्य करण्यासाठी त्याने त्या ताऱ्‍याचा उपयोग केला. मत्तय २:१-१२; मीखा ५:२.

▪ ज्योतिषांनी पाहिलेला तारा सर्वसामान्य नव्हता हे कसे दिसते?

▪ ज्योतिषी येशूला पाहतात तेव्हा तो कोठे असतो?

▪ ज्योतिषांना मार्गदर्शन करण्यासाठी सैतानाने तो तारा नेमला होता हे आपण कसे समजू शकतो?