व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू एका विधवेचे दुःख निवारण करतो

येशू एका विधवेचे दुःख निवारण करतो

अध्याय ३७

येशू एका विधवेचे दुःख निवारण करतो

शताधिपतीच्या चाकराला बरे केल्यावर लवकरच येशू, कफर्णहूमाच्या नैऋत्येला ३२ किलोमीटर्सहून थोड्या अधिक अंतरावर असलेल्या नाईन शहराकडे जाण्यास रवाना होतो. त्याचे शिष्य व एक मोठा लोकसमुदाय त्याच्यासोबत आहे. बहुधा सायंकाळच्या सुमाराला ते नाईनच्या परिसरात येतात. तेथे त्यांना एक प्रेतयात्रा भेटते. एका तरुणाचे प्रेत दफन करण्यासाठी नेले जात असते.

मृताच्या आईची स्थिती अतिशय शोचनीय आहे कारण ती विधवा असून हा तिचा एकुलता एक मुलगा आहे. तिचा पती मरण पावला तेव्हा तिच्यापाशी तिचा मुलगा असल्याचे तिला समाधान होते. तिच्या आशा, इच्छा व आकांक्षा त्याच्या भवितव्याशी निगडीत झाल्या होत्या. पण आता तिला सांत्वन देणारे कोणीही नाही. गावकऱ्‍यांसोबत दफनभूमीकडे येताना तिला मोठे दुःख होत आहे.

येशूची नजर त्या स्त्रीकडे जाते तेव्हा तिच्या पराकोटीच्या दुःखाने त्याला अतिशय भरुन येते. तेव्हा कोमलतेने पण विश्‍वास उत्पन्‍न करणाऱ्‍या दृढतेने तो तिला म्हणतोः “रडू नको.” त्याच्या या बोलण्याने जमावाचे लक्ष वेधले जाते. या कारणाने, तो जवळ येऊन तिरडीला स्पर्श करतो तेव्हा तिरडी वाहणारे थांबतात. आता तो काय करील याचे सर्वांना आश्‍चर्य वाटत असणार.

येशूसोबत येणाऱ्‍यांनी त्याला, अनेकांचे रोग चमत्काराने बरे करताना पाहिले आहे हे खरे. पण कोणा मृताला उठवताना त्यांनी त्याला कधी पाहिले नसावेसे वाटते. त्याला अशी गोष्ट करता येते का? शवाला उद्देशून तो आज्ञा करतोः “मुला, मी तुला सांगतो, उठ!” आणि तो माणूस उठतो! तो बोलू लागतो व येशू त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करतो.

तो तरुण खरोखरच जिवंत झालेला पाहून लोक म्हणू लागतातः “आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे.” इतर काही म्हणतातः “देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.” हा हा म्हणता, या आश्‍चर्यकारक कृत्याची बातमी यहूदीया व आसपासच्या प्रदेशात पसरते.

बाप्तिस्मा करणारा योहान अजून तुरुंगात आहे व येशू करू शकत असलेल्या कृत्यांबद्दल अधिक माहिती त्याला हवी आहे. योहानाचे शिष्य त्याला या चमत्कारांबद्दल सांगतात. त्याचा प्रतिसाद काय आहे? लूक ७:११-१८.

▪ येशू नाईनजवळ येत असताना काय घडत आहे?

▪ येशूला दिसलेल्या दृश्‍याचा त्याच्यावर कसा परिणाम होतो व तो काय करतो?

▪ येशूच्या चमत्कारांना लोक कसा प्रतिसाद देतात?