व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू खरोखर कोण आहे?

येशू खरोखर कोण आहे?

अध्याय ५९

येशू खरोखर कोण आहे?

येशू व त्याच्या शिष्यांना नेणारी नाव बेथेसैदा येथे किनाऱ्‍यास लागल्यावर लोक एका आंधळ्या माणसाला त्याच्याकडे आणतात व त्या माणसाला स्पर्श करून बरे करण्याची त्याला विनंती करतात. येशू त्या माणसाचा हात धरून त्याला गावाबाहेर आणतो व त्याच्या डोळ्यांवर थुंकून विचारतोः “तुला काही दिसते काय?”

तो माणूस उत्तर देतोः “मला माणसे दिसत आहेत असे वाटते. कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीपण ती चालत आहेत.” त्या माणसाच्या डोळ्यांवर हात ठेवून येशू त्याची दृष्टी आणतो व त्याला स्पष्ट दिसू लागते. मग, येशू त्या माणसाला घरी पाठवतो व गावात न जाण्याबद्दल सूचना देतो.

आता येशू आपल्या शिष्यांबरोबर पॅलेस्टाईनच्या सर्वात उत्तरेकडील फिलिप्पाच्या कैसरिया गावाकडे जाण्यास निघतो. समुद्र सपाटीपासून ३४९ मीटर्स उंच असलेल्या फिलिप्पाच्या कैसरिया या सुंदर स्थळी जाणारा, चढावाचा, जवळजवळ ४५ किलोमीटर्स लांब रस्ता आहे. त्या प्रवासाला बहुतेक दोन दिवस लागतात.

वाटेमध्ये प्रार्थना करण्यासाठी येशू एकटाच एकीकडे जातो. त्याच्या मृत्युला केवळ नऊ ते दहा महिने उरले आहेत व त्याला आपल्या शिष्यांची काळजी वाटत आहे. अनेक त्याला सोडून गेले आहेत. त्याला राजा बनवण्याचा लोकांचा प्रयत्न त्याने अव्हेरला व शत्रूंनी आव्हान दिले असता, त्याचे राज्यपद सिद्ध करण्यासाठी त्याने स्वर्गातून चिन्ह दाखवले नाही. यामुळे इतर शिष्य गोंधळलेले आहेत व त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. तो प्रार्थना करीत असलेल्या ठिकाणी ते येतात तेव्हा येशू त्यांना विचारतोः “लोक मला काय म्हणून म्हणतात?”

ते उत्तर देतातः “कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलीया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्ट्यातील कोणीएक असे म्हणतात.” होय, या माणसांतला, मृतातून उठलेला एक, येशू असावा असे लोकांना वाटते.

येशू विचारतोः “पण, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”

पेत्र चटकन उत्तर देतोः “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.”

पेत्राच्या उत्तराबद्दल समाधान व्यक्‍त करून येशू म्हणतोः “मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस; आणि ह्‍या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.” येशू एक मंडळी रचणार असून तिच्या सभासदांच्या पृथ्वीवरील विश्‍वासू जीवनानंतर मृत्युही त्यांना जखडून ठेवू शकणार नाही असे येशू येथे प्रथम जाहीर करतो. मग, तो पेत्राला सांगतो: “मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन.”

अशा रितीने, पेत्राला विशेष अधिकार प्राप्त होणार असल्याचे येशू येथे प्रकट करतो. पेत्राला प्रेषितांमध्ये अग्रस्थान दिले गेले नाही. तसेच त्याला मंडळीचा पायाही केलेले नाही. त्याची मंडळी ज्यावर रचली जाईल तो खडक स्वतः येशू आहे. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याची संधी लोकांच्या गटांना जणू उघडली जाईल अशा तीन किल्ल्या पेत्राला देण्यात येणार आहेत.

तारण प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे ते, पश्‍चाताप झालेल्या यहुद्यांना दाखवण्यासाठी इ. स. ३३ मध्ये पेत्र पहिली किल्ली वापरील. त्यानंतर लवकरच देवाच्या राज्यात प्रवेश करण्याची संधी विश्‍वासू शोमरोनी लोकांना खुली करण्यासाठी तो दुसरी किल्ली वापरील. मग, इ. स. ३६ मध्ये, सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकांना—कर्नेल्य व त्याची मित्रमंडळी—तीच संधी देण्यासाठी तो तिसरी किल्ली वापरील.

येशू त्याच्या प्रेषितांसोबत पुढे चर्चा करतो. यरूशलेममध्ये लवकरच त्याला भोगाव्या लागणाऱ्‍या यातना व मृत्युबद्दल सांगून तो त्यांना उदास करतो. येशूला पुन्हा उठवण्यात येईल हे न समजल्यामुळे पेत्र येशूला एका बाजूला घेतो व म्हणतोः “प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.” त्याच्याकडे पाठ करून येशू उत्तर देतोः “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा. तू मला अडखळण आहेस. कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”

येशूबरोबर प्रेषितांव्यतिरिक्‍त इतरही लोक प्रवास करीत आहेत हे दिसते. यासाठी तो आता त्यांना आपल्याकडे बोलावतो व त्याचे अनुयायी बनणे सोपे होणार नसल्याबद्दल खुलासा करतो. तो म्हणतोः “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता व सुवार्तेकरता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील.”

होय, त्याच्या कृपेला पात्र ठरायचे असल्यास येशूच्या अनुयायांना धैर्यवान व स्वार्थत्यागी झाले पाहिजे. तो सांगतोः “ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल त्याची लाज, मनुष्याच्या पुत्र पवित्र देवदूतांसह आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा, त्यालाही वाटेल.” मार्क ८:२२-३८; मत्तय १६:१३-२८; लूक ९:१८-२७.

▪ येशूला आपल्या शिष्यांची चिंता का वाटत आहे?

▪ येशू कोण आहे याबद्दल लोकांचा दृष्टीकोण काय आहे?

▪ पेत्राला कोणत्या किल्ल्या देण्यात आल्या आहेत व त्यांचा उपयोग कसा करायचा आहे?

▪ पेत्राची कोणती चूक दुरुस्त करण्यात आली व का?