व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू जिवंत आहे!

येशू जिवंत आहे!

अध्याय १२८

येशू जिवंत आहे!

त्यास्त्रियांना येशूची कबर रिकामी आढळल्यावर पेत्र व योहान यांना सांगण्यासाठी मरीया मग्दालिया पळत जाते. पण इतर स्त्रिया मात्र कबरेपाशीच राहतात हे उघड आहे. लवकरच एक स्वर्गदूत प्रकट होतो व त्यांना आत बोलावतो.

तेथे त्या स्त्रियांना आणखी एक स्वर्गदूत दिसतो, आणि त्यातील एक त्यांना म्हणतोः “तुम्ही भिऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहा हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही. कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला होता ते हे स्थळ पाहा; आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की, तो मेलेल्यातून उठला आहे.” तेव्हा भीतीने आणि अतिशय आनंदाने ह्‍या स्त्रियादेखील धावत जातात.

या वेळेपर्यंत मरीयेला पेत्र व योहान भेटतात व ती त्यांना सांगतेः “त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही.” तात्काळ दोघे प्रेषित धावत निघतात. योहान अधिक चपळ आहे—तो वयाने लहान असल्यामुळे, हे उघड आहे—आणि तो प्रथम कबरेकडे पोहचतो. या वेळेपर्यंत त्या स्त्रिया निघून गेल्या असल्यामुळे आसपास कोणीही नाही. खाली वाकून योहान कबरेत डोकावतो आणि कापडाच्या पट्ट्या पाहतो. पण तो बाहेरच थांबतो.

पेत्र आल्यावर, पेत्र मागे-पुढे न पाहता थेट आत जातो. तेथे पडलेल्या कापडाच्या पट्ट्या व येशूचे डोके लपेटण्यासाठी वापरण्यात आलेले कापड त्याला दिसते. ते गुंडाळून एका जागी ठेवलेले आहे. आता योहानही कबरेत शिरतो आणि मरीयेच्या बातमीवर त्याचा विश्‍वास बसतो. परंतु, येशूने आधीच तो पुन्हा उठेल हे अनेकदा सांगितले असले तरी, त्याला उठवले गेले आहे हे पेत्राच्या व किंवा योहानाच्या ध्यानात येत नाही. दोघे गोंधळून घरी परततात, पण कबरेकडे आलेली मरीया तेथेच राहते.

या दरम्यान इतर स्त्रिया, येशूचे पुनरुत्थान झाले असल्याचे स्वर्गदूताने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे शिष्यांना सांगण्यासाठी घाईने जात आहेत. त्या शक्य तेवढ्या जलद धावत असताना येशू त्यांना भेटतो व म्हणतोः “कल्याण असो!” त्याच्या पाया पडून त्या त्याला नमन करतात. तेव्हा येशू म्हणतोः “भिऊ नका. जा, माझ्या भावांस सांगा की, त्यांनी गालीलात जावे. तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.”

हे घडण्याआधी, भूकंप झाला आणि स्वर्गदूत प्रकट झाले तेव्हा पहाऱ्‍यावरील शिपायांना धक्का बसतो व ते मृतप्राय होतात. सावरल्यावर ते तात्काळ शहरात जातात व झालेली घटना ते मुख्य याजकांना सांगतात. यहूद्यांनी वडीलमंडळाशी सल्ला समलत केल्यावर, शिपायांना लांच देऊन प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात येतो. त्यांना सांगण्यात येतेः “‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले’ असे म्हणा.”

कामावर असताना झोपल्याबद्दल रोमी शिपायांना मृत्युदंड होण्याची शक्यता असल्यामुळे याजक त्यांना खात्री देतात की, “ही गोष्ट [तुमच्या झोपी जाण्याची बातमी] सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हाला निर्धास्त करू.” लाच भरपूर मोठी असल्याने रोमी शिपायांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे केले. परिणामी, येशूचे शरीर चोरल्याची खोटी बातमी यहूद्यांमध्ये सर्वत्र पसरते.

कबरेपाशी मागे राहिलेल्या मरीया मग्दालियेला शोक आवरत नाही. येशू कोठे असेल? कबरेत डोकावण्यासाठी खाली वाकल्यावर, पुन्हा प्रकट झालेले, पांढऱ्‍या वस्त्रातील ते दोन देवदूत तिला दिसतात! येशूचे शरीर ठेवलेल्या जागेच्या उशाकडे एक बसला आहे व दुसरा पायथ्याकडे आहे. ते विचारतातः “बाई, तू का रडतेस?”

ती म्हणतेः “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही.” मग ती वळते आणि पुन्हा “बाई, तू का रडतेस?” असा तोच प्रश्‍न विचारणारा कोणी एक तिला दिसतो. तो असेही विचारतोः “तू कोणाचा शोध करतेस?”

ज्या जागेत ही कबर आहे तिचा तो माणूस माळी असावा अशा कल्पनेने ती त्याला म्हणतेः “दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”

ती व्यक्‍ती म्हणतेः “मरीया!” आणि आवाजावरून तिला तात्काळ कळते की तो येशू आहे. ती म्हणतेः “रब्बोनी!” [म्हणजे, “गुरुजी!”] आणि आनंदाच्या भरात ती त्याला बिलगते. पण येशू म्हणतोः “मला बिलगू नकोस. कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, ‘जो माझा पिता आणि तुमचा पिता, आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.’”

आता मरीया, प्रेषित व बरोबरचे शिष्य एकत्र झालेल्या ठिकाणी धावत जाते. पुनरूत्थित येशूला पाहिल्याबद्दल इतर स्त्रियांनी अगोदरच दिलेल्या बातमीत ती आपल्या वृत्तांताची भर घालते. परंतु आधीच्या स्त्रियांवर विश्‍वास न ठेवलेली ही माणसे तिच्यावरही विश्‍वास ठेवत नाहीत. मत्तय २८:३-१५; मार्क १६:५-८; लूक २४:४-१२; योहान २०:२-१८.

▪ कबर रिकामी आढळल्यावर मरीया मग्दालिया काय करते आणि इतर स्त्रियांना कोणता अनुभव येतो?

▪ कबर रिकामी आढळल्यावर पेत्र आणि योहान यांची प्रतिक्रिया काय होते?

▪ येशूच्या पुनरुत्थानाची बातमी शिष्यांना देण्यासाठी जात असताना इतर स्त्रियांची कोणाशी गाठ पडते?

▪ पहाऱ्‍यावरील शिपायांचे काय होते आणि त्यांच्या बातमीला याजक कसा प्रतिसाद देतात?

▪ मरीया मग्दालिया कबरेपाशी एकटी असताना काय होते आणि या स्त्रियांनी दिलेल्या बातमीवर शिष्यांची काय प्रतिक्रिया होते?