व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू परुशांची कानउघाडणी करतो

येशू परुशांची कानउघाडणी करतो

अध्याय ४२

येशू परुशांची कानउघाडणी करतो

येशू म्हणतो की, जर सैतानाच्या बळाने तो भूते काढत असेल तर सैतानामध्येच फूट पडली आहे. तो पुढे म्हणतोः “झाड चांगले व त्याचे फळ चांगले असे म्हणा; अथवा झाड वाईट व त्याचे फळ वाईट असे म्हणा. कारण फळावरुन झाड कळते.”

भूते काढण्याची चांगली फळे येशूने सैतानाची सेवा केल्याने मिळाली आहेत असा आरोप करणे मूर्खपणाचे आहे. फळ चांगले असल्यास झाड वाईट असू शकणार नाही. उलटपक्षी, हास्यास्पद आरोप व येशूला निष्कारण विरोध ही परुशांची वाईट फळे, ते स्वतः वाईट असल्याचा पुरावा आहेत. येशू उद्‌गारतोः “अहो, सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरुन गेले आहे तेच मुखावाटे निघणार.”

आपले शब्द आपल्या अंतःकरणाच्या स्थितीचे प्रतिबिंब असल्याने आपले बोल न्यायाचा आधार होतात. येशू म्हणतोः “मी तुम्हास सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरुन निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरुन दोषी ठरशील.”

येशूने अनेक अद्‌भूत कृत्ये केली असली तरी शास्त्री व परुशी त्याला विनंती करतातः “गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे.” यरुशलेमच्या या लोकांनी स्वतः येशूचे चमत्कार पाहिले नसले तरी त्यांच्याबद्दल नाकारता न येणारा पुरावा उपलब्ध आहे. म्हणून त्या यहूदी नेत्यांना येशू सांगतोः “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. परंतु योना संदेष्टा ह्‍याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही.”

आपल्या विधानाचा खुलासा करत येशू पुढे म्हणतोः “जसा योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.” माशाने योनाला गिळल्यानंतर तो जेव्हा परत बाहेर आला तेव्हा जणू त्याचे पुनरुत्थानच झाले होते. यामुळे येशूने आपण मरू व तिसऱ्‍या दिवशी आपले पुनरुत्थान केले जाईल असे भाकित केले. परंतु कालांतराने येशूचे पुनरुत्थान झाल्यावर देखील, यहुदी नेते ‘योनाचे चिन्ह’ नाकारतात.

यासाठीच येशू सांगतो की, योनाच्या उपदेशामुळे पश्‍चाताप केलेले निनवेचे लोक, न्यायाच्या काळी उठून, येशूला नाकारणाऱ्‍या यहुद्यांना दोषी ठरवतील. त्याचप्रमाणे, तो त्यांची तुलना शिबाच्या राणीसोबत करतो. शलमोनाची विद्वत्ता ऐकण्यासाठी ती पृथ्वीच्या टोकाहून आली होती व तिने पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टींचे तिला नवल वाटले. येशू म्हणतोः “पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.”

मग येशू, ज्याच्यातून दुरात्मा निघाला आहे अशा एका माणसाचा दृष्टांत देतो. तो माणूस ती पोकळी चांगल्या गोष्टींनी भरत नाही, व त्यामुळे त्याच्यात आणखी सात दुरात्मे येऊन राहतात. येशू म्हणतोः “तसेच ह्‍या दुष्ट पिढीचेही होईल.” इस्राएल राष्ट्राला शुद्ध करण्यात आले होते व त्यांनी दुरात्म्याच्या तात्पुरत्या जाण्याप्रमाणे सुधारणांचा अनुभव घेतला होता. परंतु त्या राष्ट्राने देवाच्या प्रेषितांचा केलेला अव्हेर आणि शेवटी स्वतः येशूला केलेला विरोध, त्याची दुष्टपणाची वृत्ती सुरवातीपेक्षा अधिक वाईट झाल्याचे उघड करतात.

येशू बोलत असताना त्याची आई व भाऊ ऐकतात व जमावाच्या कडेला उभे राहतात. तेव्हा कोणीतरी म्हणतेः “पाहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत.”

येशू विचारतोः “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?” शिष्यांकडे हात करून तो म्हणतोः “पाहा, माझी आई व माझे भाऊ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.” अशा रितीने, आपल्या नातेवाईकांशी असलेला संबंध कितीही प्रिय असला तरी त्याचा आपल्या शिष्यांसोबत असणारा संबंध अधिक प्रिय असल्याचे येशू दाखवतो. मत्तय १२:३३-५०; मार्क ३:३१-३५; लूक ८:१९-२१.

▪ “झाड” व “फळ” दोहोंना चांगले ठरवण्यात परुशी कसे अपयशी ठरतात?

▪ ‘योनाचे चिन्ह’ काय आहे व पुढे ते कसे नाकारण्यात आले?

▪ पहिल्या शतकातील इस्राएल राष्ट्र, दुरात्मा निघालेल्या माणसासारखे कसे आहे?

▪ आपल्या शिष्यांसोबत असणाऱ्‍या घनिष्ट संबंधावर येशूने कसा भर दिला?