व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू पुन्हा यरुशलेमाकडे निघतो

येशू पुन्हा यरुशलेमाकडे निघतो

अध्याय ८२

येशू पुन्हा यरुशलेमाकडे निघतो

शहरोशहरी व खेडोपाडी शिकवण देत येशू पुन्हा मार्गाला लागतो. यहूदीयापासून यार्देन नदीच्या पलिकडील पेरिया प्रांतात येशू असल्याचे उघड आहे. पण तो यरुशलेमाला चालला आहे.

कदाचित, मोजके लोकच तारणाला पात्र असतील या यहूदी तत्त्वज्ञानामुळे एक माणूस विचारतोः “प्रभुजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” आपल्या उत्तराने येशू, तारणासाठी कशाची गरज आहे याचा लोकांना विचार करायला लावतो. तो म्हणतोः “अरुंद दरवाजाने आत जाण्यास झटून प्रयत्न करा.” (पंडिता रमाबाई भाषांतर)

असा झटून प्रयत्न करणे निकडीचे आहे, कारण येशू पुढे म्हणतोः “मी तुम्हास सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही.” ते आत का जाऊ शकणार नाहीत? तो पुढे म्हणतोः “एकदा का घरधन्याने उठून दार बंद केले व लोक बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागले, ‘प्रभुजी आम्हासाठी दार उघडा,’ की तो म्हणेलः ‘तुम्ही कोठले आहा हे मला माहीत नाही. अहो, सर्व अधर्म करणाऱ्‍यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.”

जे दाराबाहेर राहिले ते केवळ स्वतःच्या वेळेप्रमाणे येतात असे दिसते. परंतु तोवर संधीचा दरवाजा बंद होऊन त्याला कडी लावली आहे. गैरसोय झाली असती तरी, आत जाण्यासाठी त्यांनी आधी यायला हवे होते. यहोवाच्या भक्‍तीला आपल्या जीवनाचे सर्वप्रथम ध्येय करण्याचे लांबणीवर टाकणाऱ्‍यांना खरोखर दुःखद परिणाम होतील!

येशूला ज्यांची सेवा करण्यासाठी पाठवले आहे ते यहूदी, तारणासाठी देवाने केलेली तरतूद स्वीकारण्याच्या अद्‌भुत संधीचा फायदा घेण्यात बहुतेक उणे पडले आहेत. यासाठी येशू म्हणतो की, बाहेर टाकले गेल्यावर ते रडतील व दात खातील. याउलट, “पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून,” होय, सर्व देशातून, “लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील.”

येशू पुढे म्हणतोः “जे पहिले होतील असे काही शेवटले [तिरस्कृत यहुद्देतर तसेच पददलित यहूदी] आहेत आणि शेवटले होतील असे काही पहिले [भौतिक व धार्मिक दृष्ट्या कृपाप्राप्त यहूदी] आहेत.” ते शेवटले असण्याचा अर्थ, असे आळशी व कृतघ्न लोक देवाच्या राज्यात मुळी नसतीलच.

आता परुशी येशूकडे येतात व म्हणतातः “येथून निघून जा. कारण हेरोद [अंतिपा] तुम्हाला जिवे मारावयास पाहत आहे.” येशूने त्या प्रांतातून पळून जावे म्हणून ही अफवा हेरोदाने स्वतःच पसरवली, असेही असेल. बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाला मारण्यात तो जसा गोवला गेला तसा देवाच्या आणखी एका संदेष्ट्याच्या मृत्युमध्ये गोवले जाण्याची त्याला धास्ती वाटत असावी. पण येशू परुशांना सांगतोः “त्या खोकडाला जाऊन सांगाः ‘पहा, मी आज व उद्या भूते काढतो व रोग बरे करतो आणि तिसऱ्‍या दिवशी मी [माझे काम] परिपूर्ण होईल.”

तेथील त्याचे कार्य संपवल्यानंतर येशू, यरुशलेमाच्या दिशेने प्रवास करू लागतो. कारण त्याने खुलासा केल्याप्रमाणे, “यरुशलेमाबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हावयाचे नाही.” येशू यरुशलेमात मारला जाईल अशी अपेक्षा का करावी? कारण यरुशलेम ही राजधानी असून ७१ सदस्यांच्या न्यायसेभेचे उच्च न्यायालय तेथे आहे व तेथे प्राण्यांचे बली दिले जातात. त्यामुळे “देवाचा कोकरा,” यरुशलेम सोडून इतरत्र मारला गेलेला, चालणार नाही.

येशू विलाप करतोः “यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्‍ये, व तुझ्याकडे पाठवलेल्यांस दगडमार करणाऱ्‍ये! जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवट करते तसे तुझ्या मुलाबाळांस एकवट करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, तुमचे घर तुमच्यावर सोडिले आहे.” देवाच्या पुत्राचा अव्हेर केल्यामुळे त्या देशाचा विनाश निश्‍चित आहे!

येशू यरुशलेमाकडे जात असताना, त्याला परुशातील कोणाएका अधिकाऱ्‍याच्या घरी येण्याचे आमंत्रण मिळते. तो शब्बाथ दिवस आहे व जलोदर झालेला [कदाचित त्याच्या हातापायात पाणी साठले असावे] एक माणूस तेथे उपस्थित असल्याने लोक त्याच्या पाळतीवर आहेत. येशू तेथे उपस्थित असलेल्या परुशी व शास्त्र्यांना उद्देशून विचारतोः “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही?”

कोणीही चकार शब्द काढीत नाही. त्यामुळे येशू त्या माणसाला बरे करून जाऊ देतो. मग, तो विचारतोः “तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय?” पुन्हा, कोणी उत्तर देण्यास धजत नाही. लूक १३:२२–१४:६; योहान १:२९.

▪ तारणासाठी कशाची गरज आहे असे येशू दाखवतो व अनेक जण दाराबाहेर का राहतात?

▪ पहिले होणारे “शेवटले” कोण व शेवटले होणारे “पहिले” कोण आहेत?

▪ येशूला जिवे मारण्याची हेरोदाची इच्छा आहे असे का म्हटले गेले असावे?

▪ यरुशलेमाच्या बाहेर संदेष्ट्याचा घात झालेला का चालणार नाही?