व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू पृथ्वीवर का आला

येशू पृथ्वीवर का आला

अध्याय २४

येशू पृथ्वीवर का आला

येशूचा आपल्या चौघा शिष्यांसह कफर्णहूमातील दिवस अतिशय कामात गेला आहे. सरतेशेवटी संध्याकाळी कफर्णहूमातील लोकांनी आपापल्या दुखणाईतांना बरे करण्यासाठी आणले. एकांतात बसण्यास वेळच मिळाला नाही.

आता दुसऱ्‍या दिवसाची पहाट आहे. अजून अंधार असताना येशू उठतो व एकटाच बाहेर जातो. एकांतात आपल्या पित्याला प्रार्थना करता येईल अशा एकाकी ठिकाणी तो जातो. येशूचा एकांत फार वेळ टिकत नाही, कारण येशू जागेवर नसल्याचे पेत्र व इतरांच्या लक्षात येते व ते त्याला शोधायला निघतात.

त्यांना येशू सापडल्यावर पेत्र म्हणतोः “सर्व लोक आपला शोध करीत आहेत.” येशू आपल्यामध्ये राहावा असे कफर्णहूमातील लोकांना वाटते. त्याने त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टींची त्यांना खरी कदर आहे! पण असे, अद्‌भुतरित्या रोग बरे करण्यासाठी मुख्यत्वे येशू पृथ्वीवर आला होता का? याबद्दल तो काय म्हणतो?

पवित्र शास्त्रातील एका अहवालानुसार येशू शिष्यांना उत्तर देतोः “मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ. कारण याच उद्देशाने मी निघालो आहे.” तेथे राहण्यासाठी लोकांनी येशूला गळ घातली तरी तो त्यांना सांगतोः “मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.”

होय, विशेषतः देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी येशू पृथ्वीवर आला होता. त्या राज्यानेच त्याच्या पित्याचे नाव निष्कलंक असल्याचे सिद्ध होईल व मानवांच्या सर्व दुखण्यांवर कायमचा तोडगा निघेल. परंतु येशूला देवाने पाठवले असल्याचा पुरावा देण्यासाठी तो अद्‌भुतरित्या रोग बरे करतो. अनेक शतके आधी, देवाचा सेवक असल्याबद्दल स्वतःची ओळख पटविण्यासाठी मोशेने देखील चमत्कार केले होते.

आता, इतर गावांमध्ये प्रचार करण्यासाठी येशू निघतो तेव्हा त्याचे चौघे शिष्य त्याच्यासोबत जातात. हे चौघे म्हणजे पेत्र व त्याचा भाऊ आंद्रिया तसेच योहान व त्याचा भाऊ याकोब होत. एकाच आठवड्यापूर्वी येशूचे पहिले प्रवासी सहकारी म्हणून त्यांना पाचारण करण्यात आले होते हे तुम्हाला आठवतच असेल.

आपल्या चौघा शिष्यांबरोबरचा येशूचा गालीलातील प्रचार-दौरा यशस्वी झाला आहे! इतका की त्याच्या कार्याची बातमी सर्व सूरिया देशातही पसरते. गालील, यहूदीया व यार्देनच्या पलिकडल्या प्रदेशातील मोठा जनसमुदाय येशू व त्याच्या शिष्यांच्या मागे जातो. मार्क १:३५-३९; लूक ४:४२, ४३; मत्तय ४:२३-२५; निर्गम ४:१-९, ३०, ३१.

▪ कफर्णहूमात कामाच्या गर्दीचा दिवस घालवल्यावर सकाळी काय घडते?

▪ येशूला पृथ्वीवर का पाठवले होते व त्याने कोणत्या उद्देशाने चमत्कार केले?

▪ गालीलातील प्रचार-दौऱ्‍यावर येशूबरोबर कोण जातात व येशूच्या कार्याला कसा प्रतिसाद मिळतो?