व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू—मतभेदाचा केंद्रबिंदू

येशू—मतभेदाचा केंद्रबिंदू

अध्याय ४१

येशू—मतभेदाचा केंद्रबिंदू

शिमोनाच्या घरी आदरातिथ्य झाल्यावर लागलीच येशू गालीलात प्रचाराचा दुसरा दौरा सुरु करतो. या प्रांताच्या त्याच्या मागील दौऱ्‍यावर त्याचे पहिले शिष्य पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान त्याच्यासोबत होते. पण आता त्याचे १२ शिष्य व काही स्त्रियाही त्याच्याबरोबर आहेत. त्यात मरीया मग्दालिया, सुसान्‍ना व जिचा पती हेरोद राजाचा अधिकारी आहे ती योहान्‍ना, यांचा समावेश आहे.

येशूच्या सेवाकार्याची गती जसजशी वाढते तसतसा त्याच्या कार्याबद्दल वादविवादही वाढतो. अंधळा व मुका असलेला एक भूतग्रस्त माणूस येशूकडे आणला जातो. येशूने त्याला बरे केल्याने तो दुरात्म्याच्या ताब्यातून मुक्‍त होतो आणि बोलू व पाहू शकतो. तेव्हा लोकसमुदाय आश्‍चर्याने थक्क होतो. ते म्हणू लागतातः “हा दावीदाचा पुत्र असेल काय?”

येशू राहात असलेल्या घराभोवती लोक इतक्या मोठ्या संख्येने जमतात की त्याला व त्याच्या शिष्यांना जेवायलाही सवड मिळत नाही. देवाने वचन दिल्याप्रमाणे तो “दावीदाचा पुत्र” आहे असे मानणाऱ्‍या लोकांव्यतिरिक्‍त त्याची मानहानी करण्याच्या उद्देशाने दूरच्या यरुशलेमाहून आलेले शास्त्री व परुशीही तेथे आहेत. येशूविषयी उठलेल्या या गोंधळाबद्दल ऐकून त्याला घेण्यासाठी येशूचे नातेवाईक येतात. कोणत्या कारणास्तव?

खरे तर, तो देवाचा पुत्र आहे असा त्याच्या भावांचाही विश्‍वास नाही. तसेच त्याने उठवलेला सार्वजनिक गोंधळ व वाद, नासरेथमध्ये लहानाचा मोठा होत असतानाच्या, त्यांना माहीत असलेल्या येशूच्या स्वभावात मुळीच बसत नव्हता. त्यामुळे येशूमध्ये गंभीर स्वरुपाचा मानसिक बिघाड झाला आहे अशी त्यांची समजूत आहे. “त्याला वेड लागले आहे,” असा निष्कर्ष काढून, त्याला धरून घेऊन जाण्याची त्यांची इच्छा आहे.

परंतु येशूने भूतग्रस्त माणसाला बरे केल्याचा स्पष्ट पुरावा आहे. हे खरोखर घडल्याचे त्यांना नाकारता येत नाही हे शास्त्री व परुशांनाही माहीत आहे. म्हणून त्याची अपकिर्ती करण्यासाठी ते लोकांना सांगतातः “भूतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भूते काढीत नाही.”

त्यांचे विचार जाणून येशू त्या शास्त्री व परुशांना आपल्याजवळ बोलावतो व म्हणतोः “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले नगर किंवा घर टिकणार नाही. सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्यांच्यात फूट पडली आहे. मग, त्यांचे राज्य कसे टिकणार?”

शत्रुपक्षाचा पार धुव्वा उडवणारा हा केवढा प्रबळ युक्‍तीवाद! त्यांच्यामधील काही लोकांनीही भूते काढली असल्याचा परुशांचा दावा असल्याने येशू असेही विचारतो की, “मी जर बालजबूलच्या साहाय्याने भूते काढीत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात?” दुसऱ्‍या शब्दात म्हणायचे तर, येशू विरुद्ध त्यांनी केलेला आरोप त्यांनाही तितकाच लागू होतो. मग, येशू इशारा देतोः “परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भूते काढत असल्यास देवाच्या राज्याने खरोखर तुम्हावर मात केली आहे.”

भूते काढण्याची त्याची क्षमता, सैतानापेक्षा तो अधिक बलवान असल्याचा पुरावा असल्याचे उदाहरणासहित दाखवण्यासाठी येशू म्हणतोः “बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरुन त्याची चीजवस्तु कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटील. जो मला अनुकूल नाही, तो मला प्रतिकूल आहे; आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळून टाकतो.” परुशी उघडपणे येशूच्या विरुद्ध आहेत. ते स्वतःला सैतानाचे हस्तक सिद्ध करतात. ते इस्राएली लोकांना येशूपासून दूर पांगवतात.

या कारणासाठी येशू या सैतानी विरोधकांना बजावतो की, “पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या दुर्भाषणाला क्षमा होणार नाही.” तो स्पष्टीकरण देतोः “मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही. ह्‍या युगी नाही व येणाऱ्‍या युगीही नाही.” देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे आश्‍चर्यकारकपणे झालेल्या कार्याचे श्रेय खोडसाळपणे सैतानाला देऊन त्या शास्त्री व परुशांनी ते अक्षम्य पाप केले आहे. मत्तय १२:२२-३२; मार्क ३:१९-३०; योहान ७:५.

▪ येशूचा गालीलातील दुसरा दौरा पहिल्यापेक्षा भिन्‍न कसा आहे?

▪ येशूचे नातलग त्याला ताब्यात घेण्याचा का प्रयत्न करतात?

▪ येशूच्या चमत्कारांबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न परुशी कसा करतात व येशू त्यांचा आरोप कसा खोडून काढतो?

▪ परुशी कोणत्या बाबतीत दोषी आहेत व का?