व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू यरीहोमध्ये शिकवतो

येशू यरीहोमध्ये शिकवतो

अध्याय ९९

येशू यरीहोमध्ये शिकवतो

लवकरच येशू व त्याच्याबरोबर प्रवास करणारा लोकसमुदाय, यरुशलेमापासून एका दिवसाच्या प्रवासाच्या अंतरावर असलेल्या यरीहो शहरी येतात. यरीहो हे जुळे शहर आहे असे दिसते. जुने यहूदी शहर नव्या रोमी शहरापासून साधारण दीड किलोमीटर्स अंतरावर आहे. लोकसमुदाय जुन्या शहराच्या बाहेर पडून नव्या शहराजवळ येतात तेव्हा दोन अंधळे भिकारी तो गलबला ऐकतात. त्यातील एकाचे नाव बार्तीमय आहे.

जवळून जाणारा येशू आहे असे कळल्यावर बार्तीमय व त्याचा सोबती ओरडू लागतातः “हे प्रभो, दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा.” त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यांना दरडावून सांगितल्यावर ते अधिकच जोरात ओरडतातः “प्रभो, दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा.”

तो गोंधळ ऐकून येशू थांबतो. आरडाओरड करणाऱ्‍यांना आपल्याकडे बोलावण्यास तो आपल्या बरोबरच्या लोकांना सांगतो. ते त्या अंधळ्या भिकाऱ्‍यांकडे जातात व त्यातील एकाला म्हणतातः “धीर धर, उठ, तो तुला बोलावीत आहे.”

येशू विचारतोः “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”

दोघे अंधळे विनंती करतातः “प्रभुजी, आमचे डोळे उघडावे.”

येशूला दया येऊन तो त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करतो. मार्कच्या वृत्तांतानुसार येशू त्यातील एकाला म्हणतोः “जा, तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे.” तात्काळ दोन्ही अंधळ्यांना दृष्टी प्राप्त होते व ते दोघे देवाचे गौरव करू लागतात. काय घडले ते सर्व लोक पाहतात तेव्हा तेही देवाची स्तुती करतात. वेळ न दवडता बार्तीमय व त्याचा सोबती येशूच्या मागे जातात.

येशू यरीहोमधून जात असताना अतिशय गर्दी असते. अंधळ्यांना बरे करणाऱ्‍याला पाहण्याची इच्छा प्रत्येकाला असते. सर्व बाजूंनी लोक येशूभोवती गर्दी करतात व त्यामुळे काहींना त्याचे ओझरते दर्शनही मिळत नाही. अशा लोकांमध्ये यरीहोमधील व आसपासच्या जकातदारांवर प्रमुख असणारा जक्कय आहे. तो ठेंगणा असल्यामुळे काय चालले आहे ते त्याला दिसत नाही.

यासाठी जक्कय पुढे धावत जाऊन येशूच्या वाटेवरील एका उंबराच्या झाडावर चढतो. या मोक्याच्या जागेवरून त्याला सर्व दृश्‍य नीट दिसते. जनसमुदाय जवळ येतो तसा येशू झाडाकडे वर पाहून हाक देतोः “जक्कया, त्वरा करून खाली ये. कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे.” तो हर्ष करीत खाली उतरतो व त्याच्या प्रसिद्ध पाहुण्यासाठी स्वागताची तयारी करण्यासाठी घाईने घरी जातो.

परंतु काय घडत आहे ते पाहून सर्व लोक कुरकुर करू लागतात. येशू अशा माणसाचा पाहुणा होणे अयोग्य आहे असे ते मानतात. कारण जकात गोळा करण्याच्या धंद्यात, जक्कय बेईमानीने व बळजबरीने पैसे घेऊन श्रीमंत झाला होता.

अनेक लोक येशूच्या मागोमाग जातात व येशू जक्कयाच्या घरात शिरल्यावर “पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे” असे ते कुरकुरतात. पण येशूला जक्कयात पश्‍चातापाची शक्यता आढळते. आणि येशूचा अपेक्षाभंग होत नाही. कारण जक्कयच स्वतः उभा राहून घोषणा करतोः “प्रभुजी, पहा मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्‌यांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”

आपली अर्धी मालमत्ता गरीबांना देऊन व उरलेल्या अर्ध्यातून त्याने लुबाडलेल्यांना परतफेड करून आपला पश्‍चात्ताप खरा असल्याचे जक्कय सिद्ध करतो. बहुधा त्याच्या जकातीच्या कागदपत्रावरुन त्या लोकांना तो किती देणे लागतो याचा हिशोब तो करू शकतो असे दिसते. ‘एखाद्या माणसाने मेंढरू चोरले तर त्याने मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावी,’ असे म्हणणाऱ्‍या देवाच्या नियमाला अनुसरून चौपट परतफेड करण्याची शपथ तो घेतो.

जक्कय आपली मालमत्ता ज्या प्रकारे वाटून टाकण्याचे वचन देतो त्यावर येशू खूष होतो. कारण तो म्हणतोः “आज ह्‍या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हा देखील अब्राहामाचा पुत्र आहे, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे.”

उधळ्या पुत्राच्या गोष्टीतून ‘हरवलेल्यां’ची परिस्थिती येशूने नुकतीच समजावून सांगितली आहे. आता, हरवलेला सापडल्याचे वास्तव जीवनातील एक उदाहरण आपल्यापाशी आहे. धार्मिक नेते व त्यांचे अनुयायी, जक्कयसारख्या लोकांकडे येशू लक्ष देत असल्याबद्दल कुरकुर व तक्रार करीत असले तरी, येशू अब्राहामाच्या या हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना परत आणीत राहतो. मत्तय २०:२९-३४; मार्क १०:४६-५२; लूक १८:३५–१९:१०; निर्गम २२:१.

▪ येशू अंधळ्या भिकाऱ्‍यांना कोठे भेटतो असे दिसते व तो त्यांच्यासाठी काय करतो?

▪ जक्कय कोण आहे व तो झाडावर का चढतो?

▪ जक्कय त्याचा पश्‍चात्ताप कसा सिद्ध करतो?

▪ येशूने जक्कयाला दिलेल्या वागणूकीपासून आपण काय शिकतो?