व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू व श्रीमंत तरुण अधिकारी

येशू व श्रीमंत तरुण अधिकारी

अध्याय ९६

येशू व श्रीमंत तरुण अधिकारी

येशू पेरिया प्रांतातून यरुशलेमाच्या दिशेने पुढे जात असताना एक तरुण धावत येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकतो. त्या माणसाला अधिकारी म्हटले आहे. बहुधा त्याचा अर्थ, स्थानिक सभास्थानात त्याला मोठे स्थान आहे किंवा तो न्यायसभेचा सभासद आहे. तसेच तो अत्यंत श्रीमंत आहे. तो विचारतोः “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?”

येशू उलट विचारतोः “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही.” त्या माणसाने “उत्तम” हा शब्द पदवीसारखा वापरला असू शकेल. त्यामुळे, अशी पदवी केवळ देवालाच लावता येते हे येशू त्याला सांगतो.

तो पुढे सांगतोः “तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ.”

“कोणत्या?” तो माणूस विचारतो.

दहा आज्ञांतील पाचांचा उल्लेख करून येशू म्हणतोः “व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर.” आणि त्याहूनही महत्त्वाची आज्ञा जोडत येशू म्हणतोः “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर.”

तो माणूस अतिशय प्रामाणिकपणे उत्तर देतोः “मी हे सर्व पाळिले आहे. माझ्याठायी अजून काय उणे आहे?”

त्या माणसाची भावपूर्ण कळकळीची विनंती ऐकून येशूला त्याच्याबद्दल प्रेम वाटते. पण त्या माणसाचा भौतिक मालमत्तेवरील लोभ त्याच्या ध्यानात येतो व म्हणून तो त्याच्या गरजेकडे लक्ष वेधतोः “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरीबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि चल, माझ्यामागे ये.”

तो माणूस उठतो व कष्टी होऊन निघून जातो तेव्हा येशू कीव येऊन त्याच्याकडे पाहतो यात शंका नाही. त्याची श्रीमंती त्याला खऱ्‍या धनाची किंमत कळू देत नाही. येशू दुःखाने म्हणतोः “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा!”

येशूच्या शब्दांचे शिष्यांना मोठे आश्‍चर्य वाटते. पण तो एक सर्वसामान्य नियम व्यक्‍त करतो तेव्हा त्यांना आणखीनच आश्‍चर्य वाटते. तो म्हणतोः “धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्‍यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून [नेड्यातून] जाणे सोपे आहे.”

“तर मग, कोणाचे तारण होणे शक्य आहे?” त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे.

त्यांच्याकडे निरखून पाहून तो उत्तर देतोः “मनुष्यांना ते अशक्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्वकाही शक्य आहे.”

त्या तरुण श्रीमंत अधिकाऱ्‍यापेक्षा आपण अगदी वेगळी गोष्ट पसंत केली असल्याची नोंद घेऊन पेत्र म्हणतोः “पहा, आम्ही सर्वकाही सोडून आपल्यामागे आलो आहोत,” व म्हणून तो विचारतोः “तर, आम्हाला काय मिळणार?”

येशू वचन देतोः “पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीही बारा राजासनांवर बसून इस्राएलांच्या बारा वंशांचा न्यायनिवाडा कराल.” होय, एदेन बागेत होत्या तशा गोष्टी होण्यासाठी पृथ्वीवरील परिस्थितीची पुनरुत्पत्ती होईल असे येशू दाखवीत आहे. आणि या संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर नंदनवनावर ख्रिस्तासोबत राज्य करण्याचे प्रतिफळ पेत्र व इतर शिष्यांना लाभेल. असे मोठे प्रतिफळ कोणत्याही त्यागाच्या लायकीचे नक्कीच आहे!

परंतु येशू खात्रीने सांगतो, त्याप्रमाणे आत्ताही त्याची प्रतिफळे आहेत. तो म्हणतोः “ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतवाडी सोडली आहेत, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्‍या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.”

येशूने वचन दिल्याप्रमाणे त्याचे शिष्य जगात जेथे कोठे जातात तेथे नैसर्गिक कुटुंबाच्या सदस्यांशी असलेल्या नातेसंबंधाच्या आनंदापेक्षा ख्रिस्ती बांधवांशी अधिक जवळचा व मौल्यवान नातेसंबंधाचा आनंद ते लुटतात. या व देवाच्या स्वर्गीय राज्यामधील सार्वकालिक जीवन या दोन्ही प्रतिफळांना तो श्रीमंत व तरुण अधिकारी मुकतो असे भासते.

यानंतर येशू आणखी असे म्हणतोः “तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.” असे म्हणण्यात त्याचा अर्थ काय?

त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा की, त्या श्रीमंत व तरुण अधिकाऱ्‍यासारखे धार्मिक विशेषाधिकारांचा उपभोग घेण्यात “पहिले” असलेले अनेक लोक देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत. ते “शेवटले” होतील. पण, येशूच्या नम्र शिष्यांसकट अनेक, ज्यांना ढोंगी परुशी “शेवटले”—धरतीचे लोक किंवा ʽअम्‌ह․ʼआʹरेटस्‌ —समजून तुच्छ लेखतात, ते “पहिले” होतील. त्यांच्या “पहिले” होण्याचा अर्थ, देवाच्या राज्यात ख्रिस्ताचे सहशास्ते होण्याचा विशेषाधिकार त्यांना प्राप्त होईल. मार्क १०:१७-३१; मत्तय १९:१६-३०; लूक १८:१८-३०.

▪ तरुण श्रीमंत माणूस कोणत्या प्रकारचा अधिकारी असल्याचे उघड आहे?

▪ उत्तम म्हणवून घेण्यास येशू कसा आक्षेप घेतो?

▪ तरुण अधिकाऱ्‍याच्या अनुभवावरून श्रीमंत असण्यातील धोका येशू कसे उदाहरण देऊन स्पष्ट करतो?

▪ येशू आपल्या शिष्यांना कोणत्या प्रतिफळाचे वचन देतो?

▪ पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले कसे बनतात?