व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू ७० जणांना पाठवतो

येशू ७० जणांना पाठवतो

अध्याय ७२

येशू ७० जणांना पाठवतो

येशूच्या बाप्तिस्म्यानंतर पूर्ण तीन वर्षांनी हा इ. स. ३२ चा पानझडीचा ऋतु आहे. येशू व त्याचे शिष्य यरुशलेमात नुकतेच मंडपांच्या सणाला उपस्थित होते; आणि ते अजूनही तेथेच जवळ कोठेतरी असावेत असे वाटते. वस्तुतः आपल्या सेवा कार्यातील उरलेल्या सहा महिन्यातील बहुतेक वेळ येशू यहूदीयात किंवा यार्देन नदीच्या पलिकडील पेरिया प्रांतात घालवतो. या प्रदेशातही सुवार्ता पसरवण्याची गरज आहे.

इ. स. ३० च्या वल्हांडणानंतर येशूने प्रचार करीत यहूदीयात आठ महिने घालवले हे खरे. पण इ. स. ३१ च्या वल्हांडणाच्या वेळी तेथील यहुद्यांनी त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यावर जवळजवळ केवळ गालीलात शिकवण्यात त्याने पुढील दीड वर्ष घालवले. त्या काळात त्याने उत्तम प्रशिक्षण दिलेल्या प्रचारकांची मोठी संस्था उभी केली. ही त्याच्यापाशी आधी नव्हती. म्हणून आता तो यहूदीयामध्ये प्रभावी साक्षीची एक शेवटची मोहीम सुरु करतो.

७० शिष्यांना वेचून त्यांना दोघादोघांच्या जोडीने पाठवून येशू या मोहिमेची सुरवात करतो. अशा रितीने त्या प्रदेशात काम करण्यासाठी राज्य-प्रचारकांची एकूण ३५ पथके आहेत. येशू नक्कीच त्याच्या प्रेषितांसोबत जेथे जाण्याचा बेत करीत आहे त्या प्रत्येक शहराला व स्थळाला हे आधी जातात.

त्या ७० जणांना सभास्थानात जाण्यास सांगण्याऐवजी, खासगी घरात जाण्यास येशू सांगतो. तो खुलासा करतोः “ज्या कोणत्या घरात जाल तेथे ‘ह्‍या घरास शांती असो,’ असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील.” त्यांचा संदेश काय असेल? येशू म्हणतोः “त्यांना सांगा की, ‘देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.’” त्या ७० जणांच्या कार्याबद्दल मॅथ्यू हेन्रीज्‌ कॉमेंटरी हे पुस्तक म्हणतेः ‘त्यांच्या धन्याप्रमाणे जेथे जेथे ते जात तेथे ते घरोघर प्रचार करीत.”

एका वर्षापूर्वी येशूने १२ जणांना गालीलात प्रचाराच्या मोहिमेवर पाठवताना, त्यांना दिलेल्या सूचनांसारख्याच सूचना या ७० जणांना तो देतो. घराघरातील लोकांना संदेश देण्यासाठी तयारी व्हावी म्हणून तो त्या ७० जणांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या विरोधाबद्दलच इशारा देत नाही तर आजारी लोकांना बरे करण्याचे सामर्थ्यही तो त्यांना देतो. अशा रितीने, नंतर लवकरच येशू येतो तेव्हा, अशी अद्‌भूत कृत्ये ज्याचे शिष्य करू शकतात अशा धन्याला भेटण्यास अनेक लोक उत्सुक असतील.

त्या ७० जणांचे प्रचाराचे कार्य व त्याचा फायदा घेऊन येशूने पाठोपाठ केलेले कार्य तसेच थोडा वेळच चालते. लवकरच राज्य प्रचारकांची ती ३५ पथके येशूकडे परत येतात. ते आनंदाने म्हणतातः “प्रभुजी, आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात.” सेवाकार्याच्या अशा उत्तम बातम्यांनी येशूला खचितच आनंद होतो. कारण तो म्हणतोः “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. पहा, मी तुम्हाला साप व विंचू ह्‍यांना तुडवण्याचा . . . अधिकार दिला आहे.”

शेवटल्या काळी देवाच्या राज्याच्या उदयानंतर सैतान व त्याचे दुरात्मे स्वर्गातून बाहेर टाकले जाणार आहेत हे येशूला माहीत आहे. परंतु सध्या साध्या मानवांनी भूते काढणे हे त्या होऊ घातलेल्या घटनेची विशेष हमी देते. त्यामुळे सैतानाच्या, स्वर्गातून होणाऱ्‍या त्या भावी पतनाबद्दल, ती एक निखळ निश्‍चित गोष्ट असल्यासारखे येशू बोलतो. त्यामुळे साप व विंचवांना तुडवण्याचा ७० जणांना दिलेला अधिकार देखील सांकेतिक अर्थाचा आहे. तरीही येशू म्हणतोः “भूते तुम्हाला वश होतात ह्‍याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्‍याचा आनंद माना.”

येशूला अत्यंत आनंद झाला असून इतक्या समर्थपणे त्याच्या दीन सेवकांचा उपयोग करून घेतल्याबद्दल तो आपल्या पित्याची जाहीर प्रशंसा करतो. आपल्या शिष्यांकडे वळून तो म्हणतोः “तुम्ही जे पाहत आहा ते पाहणारे डोळे धन्य होत. मी तुम्हाला सांगतो की, तुम्ही जे पाहत आहा ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि जे तुम्ही ऐकत आहा ते ऐकावयाची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.” लूक १०:१-२४; मत्तय १०:१-४२; प्रकटीकरण १२:७-१२.

▪ येशूने त्याच्या सेवाकार्याच्या पहिल्या तीन वर्षात कोठे प्रचार केला व त्याच्या शेवटल्या सहा महिन्यात तो कोणत्या प्रदेशात सुवार्ता पसरवतो?

▪ लोकांचा शोध घेण्यासाठी त्या ७० जणांना येशू कोठे जाण्याची सूचना देतो?

▪ सैतान स्वर्गातून पडलेला त्याने पाहिला असे येशू का म्हणतो?

▪ ते ७० जण साप व विंचवांना कोणत्या अर्थाने तुडवू शकतात?