व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

योहानाचा ऱ्‍हास व येशूची वृद्धी

योहानाचा ऱ्‍हास व येशूची वृद्धी

अध्याय १८

योहानाचा ऱ्‍हास व येशूची वृद्धी

.स. ३० च्या वसंत ऋतुमध्ये वल्हांडण सण साजरा केल्यानंतर येशू व त्याचे शिष्य यरुशलेम सोडतात. परंतु ते गालीलात आपल्या घरी न जाता यहूदीया प्रांतात जातात व तेथे बाप्तिस्मा देण्याचे काम करतात. बाप्तिस्मा करणारा योहानही जवळपास एक वर्ष तेच काम करत आहे व अजून काही शिष्य त्याच्या सहवासात आहेत.

वास्तविक, येशू स्वतः बाप्तिस्मा देत नाही, पण त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याचे शिष्य ते काम करतात. जो योहानाने केलेल्या बाप्तिस्म्याचा अर्थ होता तोच त्यांच्या बाप्तिस्म्याचाही आहे. देवाच्या नियमशास्त्राच्या कराराविरुद्ध केलेल्या पापांबद्दल यहुद्यांना झालेल्या पश्‍चातापाचे ते चिन्ह होते. परंतु येशूने पुनरुत्थानानंतर त्याच्या शिष्यांना करायला सांगितलेल्या बाप्तिस्म्याचा अर्थ वेगळा आहे. आज ख्रिस्ती बाप्तिस्मा, देवाची सेवा करण्यास व्यक्‍तीने स्वतःचे समर्पण केल्याचे प्रतिक आहे.

येशूच्या सेवाकार्याच्या या सुरवातीच्या वेळी मात्र योहान व तो वेगळे राहून काम करत असले तरी पश्‍चाताप केलेल्यांना शिकवत व बाप्तिस्मा देत आहेत. परंतु योहानाच्या शिष्यांना हेवा वाटू लागतो व ते त्याच्याकडे येशूबद्दल तक्रार करतातः “गुरुजी, पाहा . . . तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात.”

हेवा करण्याऐवजी योहान येशूच्या यशाने आनंदित होतो व आपल्या शिष्यांनीही आनंद करावा असे त्याला वाटते. तो त्यांना आठवण करून देतोः “मी ख्रिस्त नव्हे, तर त्याच्यापुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो, ह्‍याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहा.” मग, तो एक सुंदर उदाहरण देतोः “वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.”

सहा महिन्यांपूर्वी योहानाने आपल्या शिष्यांची येशूशी ओळख करून दिली तेव्हा, वराच्या एका मित्राच्या रुपाने त्याला आनंद झाला होता. त्या शिष्यांतील काही, आत्म्याने अभिषेक केलेल्या ख्रिस्ती जनांनी बनणाऱ्‍या, ख्रिस्ताच्या स्वर्गीय वधू वर्गाचे भावी सदस्य झाले. ख्रिस्ताचे सेवाकार्य यशस्वी होण्यासाठी मार्ग तयार करण्याचा योहानाचा उद्देश असल्याने, त्याच्या सध्याच्या शिष्यांनीही येशूच्या मागे जावे असे त्याला वाटते. बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने स्पष्ट केल्याप्रमाणे “त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्‍हास व्हावा हे अवश्‍य आहे.”

पूर्वी बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचा शिष्य असलेला, येशूचा नवा शिष्य योहान, येशूचा आरंभ व मानवाच्या तारणातील त्याची महत्त्वाची भूमिका याविषयी लिहितोः “जो वरुन येतो तो सर्वांच्या वर आहे. . . . पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”

बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने स्वतःच्या ऱ्‍हासाबद्दल चर्चा केल्यानंतर लवकरच हेरोद राजा त्याला कैद करतो. हेरोदाने आपला भाऊ फिलिप्पची बायको हेरोदिया हिला स्वतःकडे ठेवले आहे, आणि त्याचे हे कृत्य चुकीचे असल्याबद्दल योहानाने जाहीरपणे उघड केल्यावर हेरोदाने त्याला तुरुंगात टाकले आहे. योहानाला कैद झाल्याचे येशूने ऐकल्यावर तो आपल्या शिष्यांसह यहूदीया सोडून गालील येथे जातो. योहान ३:२२–४:३; प्रे. कृत्ये १९:४; मत्तय २८:१९; २ करिंथकर ११:२; मार्क १:१४; ६:१७-२०.

▪ येशूच्या पुनरुत्थानापूर्वी केलेल्या बाप्तिस्म्यांचा काय अर्थ आहे, व त्याच्या पुनरुत्थानानंतर काय अर्थ आहे?

▪ आपल्या शिष्यांची तक्रार असमर्थनीय असल्याचे योहान कसे दाखवतो?

▪ योहानाला कैदेत का टाकले आहे?