व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

योहानामध्ये विश्‍वासाची उणीव होती का?

योहानामध्ये विश्‍वासाची उणीव होती का?

अध्याय ३८

योहानामध्ये विश्‍वासाची उणीव होती का?

जवळजवळ एक वर्ष तुरुंगात असलेल्या योहानाला आता नाईन इथल्या विधवेच्या मुलाच्या पुनरुत्थानाची बातमी कळते. पण योहानाला स्वतः येशूकडून यामागील अर्थ जाणून घेण्याची इच्छा असते. यासाठीच, तो आपले दोन शिष्य येशूकडे पाठवून असे विचारतोः “जे येणार ते आपणच आहात की, आम्ही दुसऱ्‍याची वाट पहावी?”

विशेषतः दोन वर्षांपूर्वी येशूला बाप्तिस्मा देताना योहानाला देवाचा आत्मा येशूवर उतरलेला दिसला व देवाचे येशूबद्दलच्या संतोषाचे बोल त्याला ऐकू आले असल्याने हा प्रश्‍न विचित्र वाटण्याचा संभव आहे. योहानाच्या या प्रश्‍नामुळे त्याचा विश्‍वास कमी झाला असल्याचा निष्कर्ष कोणी काढील. पण वस्तुस्थिती तशी नाही. योहानाला शंका येऊ लागली असती तर या प्रसंगी येशूने त्याच्याबद्दल काढले तसे प्रशंसेचे उद्‌गार काढले नसते. तर मग, योहान हा प्रश्‍न का विचारतो?

येशू मसीहा असल्याची पुष्टी फक्‍त त्याच्याकडून योहानाला हवी असावी. तुरुंगामध्ये खितपत पडलेल्या योहानाला त्यामुळे बळकटी मिळेल. परंतु योहानाच्या प्रश्‍नात यापेक्षा जास्त काही गोवलेले असावे असे दिसते. मशीहाने पूर्ण करायचे सर्व भविष्यवाद पूर्ण करण्यासाठी येशूच्या मागून वारसासारखा आणखी कोणी येणार आहे किंवा कसे हे जाणून घेण्याची त्याची इच्छा आहे हे उघड आहे.

योहानाला परिचित असलेल्या पवित्र शास्त्रातील भविष्यवादानुसार देवाचा अभिषिक्‍त हा राजा, मुक्‍तीदाता असेल. पण येशूच्या बाप्तिस्म्यानंतर अनेक महिने लोटले तरी योहान अजून तुरुंगातच आहे. तेव्हा, “दृश्‍य सामर्थ्याने देवाचे राज्य स्थापन करणारे तुम्हीच आहात, की मशीहाच्या गौरवाच्या अनुषंगाने सर्व अद्‌भुत भविष्यवाद पूर्ण होण्यासाठी आम्ही वाट पहावी असा दुसरा कोणी तुमचा वारस आहे?” असे योहान येशूला विचारत आहे हे उघड आहे.

‘जो येणार होता तो मीच आहे!’ असे योहानाच्या शिष्यांना सांगण्याऐवजी, तात्काळ अनेकांना बरे करून, त्यांच्या सर्व प्रकारच्या रोगांचे व दुखण्याचे निवारण करून येशू एक असामान्य प्रदर्शन करतो. मग, तो त्या शिष्यांना सांगतोः “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगाः आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरीबांस सुवार्ता सांगण्यात येते.”

दुसऱ्‍या शब्दात, येशू जे करीत आहे त्यापेक्षा अधिक काही करील व बहुधा योहानाला स्वतःला मुक्‍त करील अशी अपेक्षा योहानाच्या प्रश्‍नात सूचित होत असेल. पण येशू करीत असलेल्या चमत्कारांखेरीज योहानाने अधिक अपेक्षा ठेवू नये असे येशू त्याला सांगत आहे.

योहानाचे शिष्य जातात तेव्हा येशू जमावाकडे वळतो व मलाखी ३:१ मधील भविष्यवादात सांगितलेला “निरोप्या” व मलाखी ४:५, ६ मध्ये भाकित केलेला एलिया संदेष्टाही योहानच असल्याचे तो त्यांना सांगतो. “मी तुम्हास खचित सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान ह्‍याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणारा योहान ह्‍याच्या दिवसापासून तो आतापर्यंत स्वर्गाचे राज्य हे असे ध्येय आहे ज्यासाठी लोक धडपडत आहेत.”

स्वर्गाच्या राज्यातील कनिष्ठ, बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानापेक्षा मोठा असल्याने, तो स्वर्गाच्या राज्यात नसेल असे येशू येथे दाखवत आहे. योहानाने येशूसाठी मार्ग बनवला. पण स्वतःबरोबर त्याच्या राज्यात सहअधिपती होण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांसोबत करार वा वायदा करण्यापूर्वी तो मरण पावतो. या कारणास्तव येशू म्हणतो की, योहान स्वर्गाच्या राज्यात असणार नाही. त्याऐवजी, योहान देवाच्या राज्याच्या पृथ्वीवरील प्रजाजनात असेल. लूक ७:१८-३०; मत्तय ११:२-१५.

▪ जो येणारा तो येशूच आहे की दुसऱ्‍या कोणाची वाट पहावी असे योहान का विचारतो?

▪ योहान कोणते भविष्यवाद पूर्ण करतो असे येशू म्हणतो?

▪ बाप्तिस्मा करणारा योहान येशूसह स्वर्गात का नसेल?