व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

योहान मार्ग तयार करतो

योहान मार्ग तयार करतो

अध्याय ११

योहान मार्ग तयार करतो

येशू बारा वर्षांचा असताना मंदिरात गुरुजनांना प्रश्‍न विचारत होता त्यानंतर सतरा वर्षे उलटली आहेत. इ. स. २९ चा वसंत ऋतु आहे व यार्देन नदीजवळच्या प्रांतामध्ये प्रचार करणाऱ्‍या येशूच्या मावस भावाचे नाव, योहान, सर्वांच्या तोंडी झाले आहे असे दिसते.

योहान खरोखरच दिसण्यात व बोलण्यात छाप पाडणारा माणूस आहे. त्याचा वेश उंटाच्या केसांचा असून त्याच्या कमरेला कातडी पट्टा आहे. त्याचा आहार टोळ व रानमध आहे. आणि त्याचा संदेश? “पश्‍चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”

या संदेशाने त्याच्या श्रोत्यांमध्ये खळबळ उडते. अनेकांना पश्‍चातापाची, म्हणजेच आपले मन बदलून गतजीवनाचा मार्ग अनिष्ट मानण्याची, गरज समजली. या कारणामुळे यार्देनच्या आसपासच्या सर्व प्रांतातून तसेच यरुशलेमाहूनही लोक मोठ्या संख्येने योहानाकडे येतात व तो त्यांना यार्देनच्या पाण्यात बुडवून बाप्तिस्मा देतो. का बरे?

देवाच्या नियमशास्त्राच्या कराराविरुद्ध केलेल्या पापाबद्दल त्यांना झालेल्या मनःपूर्वक पश्‍चातापाची ओळख वा चिन्ह म्हणून योहान लोकांना बाप्तिस्मा देतो. तेव्हा, काही सदूकी व परुशी यार्देनला आल्यावर योहान त्यांचा धिक्कार करतो. तो म्हणतोः “अहो, सापाच्या पिलांनो, पश्‍चातापास योग्य अशी फळे द्या. आणि अब्राहाम आमचा बाप आहे असे मनात म्हणू नका. कारण मी तुम्हास सांगतो, ह्‍या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करावयास देव समर्थ आहे. आत्ताच झाडांच्या मुळाशी कुऱ्‍हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही, ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.”

योहानाची ख्याति पाहून यहूदी लोक याजक व लेवी यांना योहानाकडे पाठवतात. ते विचारतातः “आपण कोण?”

“मी ख्रिस्त नाही,” अशी योहान कबुली देतो.

“तर मग, आपण कोण? एलिया आहा काय?” ते विचारतात.

“नाही,” तो उत्तर देतो.

“आपण तो संदेष्टा आहात काय?”

“नाही.”

यावरुन ते खोदून विचारतातः “ज्यांनी आम्हाला पाठवले, त्यांना उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहा, हे सांगा. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?”

योहान स्पष्टीकरण देतो की, यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, “‘यहोवाचा मार्ग नीट करा’ असे अरण्यात ओरडणाऱ्‍याची वाणी मी आहे.”

“आपण ख्रिस्त नाही, एलिया नाही व तो संदेष्टा नाही, तर बाप्तिस्मा का करता?” हे त्यांना जाणून घ्यायचे आहे.

तो उत्तर देतोः “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो. ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हामध्ये उभा आहे. तो माझ्या मागून येणारा आहे.”

पुढे जो राजा होईल अशा मशीहाचा लोकांनी स्वीकार करावा म्हणून योहान त्यांची अंतःकरणे सिद्ध करत आहे. त्याच्याविषयी योहान म्हणतोः “माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या पायतणाचा बंद सोडण्यास मी योग्य नाही.” वास्तविक योहान असेही म्हणतोः “जो माझ्यामागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता.”

अशा रितीने, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे,” हा योहानाचा संदेश, यहोवाचा नियुक्‍त राजा येशू ख्रिस्ताचे सेवाकार्य लवकरच सुरु होणार असल्याचे, सार्वजनिकरित्या जाहीर करतो. योहान १:६-८, १५-२८; मत्तय ३:१-१२; लूक ३:१-१८; प्रे. कृत्ये १९:४.

▪ योहान कशा प्रकारचा माणूस आहे?

▪ योहान लोकांना का बाप्तिस्मा देतो?

▪ स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे असे योहान का म्हणू शकतो?