व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लग्नाच्या मेजवानीचा दाखला

लग्नाच्या मेजवानीचा दाखला

अध्याय १०७

लग्नाच्या मेजवानीचा दाखला

दोन दाखल्यांनी येशूने शास्त्री व प्रमुख याजकांचे पितळ उघडे केले आहे. या कारणामुळे ते त्याला मारू इच्छितात. पण येशूने त्यांचा पिच्छा सोडलेला नाही. तो आणखी एक दाखला सांगतोः

“स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठविले. परंतु ते येईनात.”

आपल्या पुत्रासाठी, येशू ख्रिस्तासाठी लग्नाची मेजवानी देणारा राजा स्वतः यहोवा देव आहे. कालांतराने, १,४४,००० अभिषिक्‍त अनुयायांच्या बनलेल्या वधूचे स्वर्गात येशूसोबत मीलन होईल. राजाचे प्रजाजन म्हणजे इस्राएल लोक होत. इ. स. पू. १५१३ मध्ये नियमशास्त्राच्या करारात घेतल्यावर त्यांना “याजकराज्य” बनण्याची संधी मिळाली. अशा रितीने त्या प्रसंगी मुळात त्यांना लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले गेले.

परंतु या आमंत्रितांना इ. स. २९ मध्ये पहिले बोलावणे आले. त्यावेळी येशू व त्याच्या शिष्यांनी (म्हणजे राजाच्या दासांनी) आपले राज्य प्रचाराचे काम सुरु केले. परंतु, इ. स. २९ ते इ. स. ३३ पर्यंत या दासांनी केलेल्या बोलावण्याला स्वाभाविकपणे इस्राएली असलेले लोक येईनात. याकरता आमंत्रितांच्या या राष्ट्राला देवाने आणखी एक संधी दिली. येशू सांगतोः “पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांस म्हटलेः ‘आमंत्रितांस असे सांगाः “पाहा, मी जेवण तयार केले आहे. माझे बैल व पुष्ट पशू कापले आहेत. सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीस चला.”’” आमंत्रितांना हे दुसरे व शेवटले बोलावणे, इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टला, येशूच्या अनुयायांवर पवित्र आत्मा ओतला गेल्यावर, सुरु झाले. ते इ. स. ३६ पर्यंत चालले.

परंतु बहुसंख्य इस्राएली लोकांनी हे आमंत्रण तिरस्काराने झिडकारले. येशू म्हणतोः “तरी हे मनावर न घेता ते, कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांस धरून त्यांचा अपमान केला व त्यांस जिवे मारले.” येशू पुढे म्हणतोः “तेव्हा राजाला राग आला; आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकले.” इ. स. ७० मध्ये रोमी लोकांनी यरुशलेम जाळले व ते खुनी मारले गेले तेव्हा ही गोष्ट घडली.

दरम्यान काय घडले याचा खुलासा करीत येशू म्हणतोः “मग, तो [राजा] आपल्या दासांना म्हणालाः ‘लग्नाची तयारी आहे खरी; परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाठ्यांवर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यांस लग्नाच्या मेजवानीस बोलवा.’” दासांनी तसे केले, आणि “लग्नाचा मांडव जेवणाऱ्‍यांनी भरून गेला.”

आमंत्रितांच्या शहराबाहेरून, रस्त्यांवरून पाहुण्यांना बोलावण्याचे काम इ. स. ३६ मध्ये सुरु झाले. रोमी सैन्याधिकारी कर्नेल्य व त्याचे कुटुंब हे गोळा केलेल्या सुंता न झालेल्या यहुद्देत्तरातील पहिले होते. मुळात बोलावणे अव्हेरलेल्यांच्या जागी घेतलेल्या या यहुद्देत्तर लोकांना गोळा करण्याचे काम २० व्या शतकापर्यंत चालू आहे.

या २० व्या शतकात लग्न समारंभाची खोली भरते. तेव्हा काय होते ते सांगताना येशू म्हणतोः “मग राजा जेवणाऱ्‍यांना पाहावयास आत आला तेव्हा लग्नाचा पोषाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणालाः ‘मित्रा, तू लग्नाचा पोषाख न घालता येथे कसा शिरलास?’ त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांस सांगितलेः ‘ह्‍याचे हातपाय बांधून ह्‍याला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे व दातखाणे चालेल.’”

लग्नाचा पोषाख नसलेला माणूस ख्रिस्ती धर्मजगतातील नकली ख्रिश्‍चनांना चित्रित करतो. आध्यात्मिक इस्राएल म्हणून यथोचित ओळख असल्याबद्दल देवाने त्यांना कधीही मान्यता दिलेली नाही. राज्याचे वारस या दृष्टीने देवाने त्यांना पवित्र आत्म्याचा अभिषेक कधीही केलेला नाही. त्यामुळे त्यांना बाहेरच्या अंधारात टाकले जाते. तेथे ते नाश पावतील.

“बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत,” असे म्हणून येशू आपल्या दाखल्याचा समारोप करतो. ख्रिस्ताची वधू बनण्यासाठी इस्राएलच्या राष्ट्रातून पुष्कळांना आमंत्रण केलेले होते. परंतु केवळ थोडेसे स्वाभाविक इस्राएली निवडले गेले. स्वर्गीय प्रतिफळ मिळणाऱ्‍या १,४४,००० पाहुण्यांतील बहुसंख्य यहुद्देत्तर आहेत. मत्तय २२:१-१४; निर्गम १९:१-६; प्रकटीकरण १४:१-३.

▪ मुळात लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित कोण आहेत व त्यांना हे निमंत्रण कधी देण्यात आले?

▪ आमंत्रितांना पहिले बोलावणे केव्हा होते व ते करण्यासाठी पाठवलेले दास कोण आहेत?

▪ दुसरे बोलावणे कधी करण्यात येते व त्यानंतर कोणाला आमंत्रण देण्यात येते?

▪ लग्नाचा पोषाख नसलेला माणूस कोणाला चित्रित करतो?

▪ बोलावलेले पुष्कळ आणि निवडलेले थोडे कोण आहेत?