व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वचनयुक्‍त संतान

वचनयुक्‍त संतान

अध्याय ६

वचनयुक्‍त संतान

नासरेथला परत जाण्याऐवजी योसेफ व मरीया ही बेथलहेमातच राहतात. येशू आठ दिवसांचा झाल्यावर, देवाने मोशेला दिलेल्या नियमानुसार, ते त्याची सुंता करवतात. तसेच आठव्या दिवशी मुलाचे नाव ठेवण्याची प्रथा असावी असे दिसते. या कारणासाठी गब्रीएल देवदूताने आधीच सांगितल्याप्रमाणे ते त्याचे नाव येशू ठेवतात.

एका महिन्याहून जास्त काळ लोटतो व येशू ४० दिवसांचा होतो. आता त्याचे आई-वडील त्याला कोठे घेऊन जातात बरे? ते राहात असलेल्या जागेपासून जवळच काही किलोमीटर असलेल्या यरुशलेमातील मंदिराकडे. देवाने मोशेला दिलेल्या नियमाप्रमाणे मुलाला जन्म दिल्यापासून ४० दिवसांनी मातेने मंदिरात शुद्धिकरणाचे अर्पण आणायचे असते.

तेच मरीया करते. अर्पण म्हणून ती दोन लहान पक्षी आणते. यातून योसेफ व मरीया यांची आर्थिक स्थिती दिसून येते. मोशेचे नियमशास्त्र दर्शवते की, पक्षांपेक्षा महाग असणारा एक वर्षाचा मेंढा अर्पिला पाहिजे. परंतु मातेला ते शक्य नसल्यास दोन पारवे किंवा होले चालतील.

मंदिरामध्ये एक वृद्ध माणूस येशूला आपल्या दोन्ही हातात घेतो. त्याचे नाव शिमोन आहे. यहोवाच्या ख्रिस्ताला वा मशीहाला पाहण्याआधी तो मरणार नाही असे देवाने त्याला प्रकट केले आहे. या दिवशी शिमोन मंदिरात येतो तेव्हा पवित्र आत्म्याद्वारे त्याला योसेफ व मरीया यांच्या बाळाकडे जाण्याचा निर्देश मिळतो.

येशूला हातात घेऊन शिमोन देवाचे आभार मानतो. तो म्हणतोः “हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते, परराष्ट्रीयांस प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”

हे ऐकून योसेफ व मरीया यांना आश्‍चर्य वाटते. तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन शिमोन मरीयेस म्हणतो की, “इस्राएलात अनेकांचे पडणे व उठणे” होण्यासाठी तिचा मुलगा नेमला आहे व एखाद्या तरवारीप्रमाणे दुःख तिचा जीव घायाळ करील.

या प्रसंगी ८४ वर्षांची हन्‍ना संदेष्ट्री तेथे उपस्थित आहे. वस्तुतः ती मंदिर सोडून जात नाही. याच वेळी ती जवळ येते व देवाला धन्यवाद देऊ लागते व जे कोणी ऐकायला तयार असतील त्यांना ती येशूबद्दल सांगू लागते.

मंदिरातील या घटनांनी योसेफ व मरीया यांना किती आनंद होतो! या सर्व गोष्टींमुळे, ते मूल देवाचे वचनयुक्‍त संतान असल्याबद्दल नक्कीच त्यांची खात्री होते. लूक २:२१-३८; लेवीय १२:१-८.

▪ इस्राएली मुलाचे नाव केव्हा ठेवले जात असावे?

▪ मुलगा ४० दिवसांचा झाल्यावर त्याच्या इस्राएली मातेकडून कशाची अपेक्षा असे व त्याच्या पूर्ततेतून मरीयेच्या आर्थिक स्थितीबद्दल काय प्रकट होते?

▪ या प्रसंगी येशूला कोण ओळखतात व ही गोष्ट ते कशी प्रकट करतात?