व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वधस्तंभावरील यातना

वधस्तंभावरील यातना

अध्याय १२५

वधस्तंभावरील यातना

मृत्युदंड देण्यासाठी येशूबरोबर दोन लुटारूंना नेण्यात येत आहे. ती यात्रा शहरापासून जवळच असलेल्या गुलगुथा किंवा कवटी स्थान म्हटल्या जाणाऱ्‍या ठिकाणी येऊन थांबते. गुन्हेगारांचे कपडे उतरवले जातात. मग, त्यांना बोळ मिसळलेला द्राक्षारस दिला जातो. यरुशलेमच्या स्त्रियांनी तो बनवला आहे, आणि रोमी लोक वधस्तंभावर खिळल्या जाणाऱ्‍यांना, यातनांची तीव्रता कमी करणाऱ्‍या या द्रवाची मनाई करीत नाही असे दिसते. पण, त्याची चव घेतल्यावर येशू ते पिण्यास नकार देतो. का बरे? कारण त्याच्या विश्‍वासाच्या या सर्वात मोठ्या परिक्षेच्या वेळी, आपण पूर्णपणे शुद्धीत असावे, अशी त्याची इच्छा आहे हे उघड आहे.

आता, हात डोक्याच्या वर ठेवलेल्या स्थितीत येशूला स्तंभावर आडवे केले आहे. मग, शिपाई त्याच्या हातात व पायात मोठे खिळे ठोकतात. खिळे मांस व स्नायुंमधून भोसकले जात असताना यातनांनी तो पिळवटून जातो. वधस्तंभ उभा केल्यावर, पराकाष्ठेच्या यातना होतात, कारण शरीराच्या भाराने खिळ्याच्या जखमा खेचल्या जातात. तरीही धमक्या देण्याऐवजी येशू रोमी शिपायांसाठी प्रार्थना करतोः “हे बापा, त्यांना क्षमा कर. कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”

वधस्तंभावर, “यहूद्यांचा राजा नासोरी येशू” असे लिहिलेली पाटी पिलाताने लावली आहे. येशूबद्दल त्याला आदर वाटतो म्हणूनच नव्हे तर त्याच्याकडून येशूला मृत्युदंड दिल्याबद्दल पिलाताला यहूदी याजकांबद्दल घृणा वाटत असल्यामुळे तो हे लिहितो असे दिसते. सर्वांना ती पाटी वाचता यावी म्हणून पिलात ती तीन भाषांमध्ये, इब्री, सरकारी लॅटिन व सर्वसामान्य ग्रीकमध्ये लिहून घेतो.

कयफा व हन्‍नासकट मुख्य याजक गोंधळतात. या निश्‍चित घोषणेने त्यांच्या विजयाच्या आनंदावर विरजण पडते. त्यामुळे ते तक्रार करतातः “‘यहुद्यांचा राजा’ असे लिहू नका, तर ‘मी यहुद्यांचा राजा आहे,’ असे त्याने म्हटले असे लिहा.” याजकांचे प्यादे झाल्यामुळे संतापलेला पिलात निश्‍चयी सुरात तिरस्काराने उत्तर देतोः “मी जे लिहिले ते लिहिले.”

आता याजक एका मोठ्या लोकसमुदायासह मृत्युदंड देण्याच्या ठिकाणी गोळा होतात. पाटीवरील साक्ष खोटी आहे असे याजक म्हणू लागतात. न्यायसभेतील चौकशीच्या वेळी दिलेल्या खोट्या साक्षींचा पुनरुच्चार ते करतात. त्यामुळे, “अरे, मंदिर मोडून तीन दिवसात बांधणाऱ्‍या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर. आणि वधस्तंभावरुन खाली उतर,” असे म्हणून निंदेने डोकी हलवून, जाणारे-येणारे त्याच्याबद्दल अपशब्द बोलू लागतात.

मुख्य याजक आणि त्यांचे धार्मिक मित्रही मध्येच तोंड घालतातः “त्याने दुसऱ्‍यांना वाचविले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही? तो इस्राएलाचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्‍वास ठेवू. तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे. कारण ‘मी देवाचा पुत्र आहे,’ असे तो म्हणत असे.”

त्यांच्या नादाने शिपाई देखील येशूची टर उडवतात. बहुधा त्याच्या सुकलेल्या ओठांच्या जरा आटोक्याबाहेर आंब धरून तो त्याला देण्याचा ते देखावा करतात. ते टोमणा मारतातः “तू यहूद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव.” त्याच्या उजवीकडे व दुसरा डावीकडे वधस्तंभावर खिळलेले ते लुटारू देखील त्याची निंदा करतात. विचार करा! पूर्वी कधी झाला नाही व यापुढेही कधी होणार नाही असा सर्वश्रेष्ठ माणूस, होय, सर्व गोष्टी बनवण्यात यहोवा देवाशी सहभागी असलेला माणूस कणखरपणे ही सर्व निंदा सहन करतो!

येशूची बाह्‍य वस्त्रे घेऊन शिपाई त्यांचे चार वाटे करतात. ते कोणाला द्यावे हे बघण्यासाठी ते त्यांच्यावर चिठ्ठ्या टाकतात. अंतर्वस्त्र मात्र उंची असल्याने त्याला शिवण नाही. त्यामुळे शिपायी एकमेकांना म्हणतातः “हा आपण फाडू नये. तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे.” अशा रितीने, ते अजाणतेपणाने, “त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकल्या,” असा शास्त्रलेख पूर्ण करतात.

काही वेळाने एका लुटारूला जाणीव होते की येशू खरोखरच राजा असावा. त्यामुळे आपल्या सोबत्याला रागावून तो म्हणतोः “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे. कारण आपण आपल्या कृत्यांचे फळ भोगीत आहोत. परंतु ह्‍याने काही अयोग्य केले नाही.” मग, येशूला विनंती करीत तो म्हणतोः “आपण राज्याधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.”

येशू उत्तर देतोः “आज मी तुला खचित सांगतो, ‘तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील.’” (न्यू.व.) राजा म्हणून येशू स्वर्गात राज्य करील आणि सुखलोक किंवा नंदनवनामध्ये पृथ्वीवर जगण्यासाठी या पश्‍चात्ताप पावलेल्या गुन्हेगाराला पुनरुत्थान देईल तेव्हा हे वचन पूर्ण होईल. हर्मगिदोनातून वाचलेल्यांना व त्यांच्या सोबत्यांना त्या सुखलोकाची मशागत करण्याचा विशेषाधिकार मिळेल. मत्तय २७:३३-४४; मार्क १५:२२-३२, लूक २३:२७, ३२-४३; योहान १९:१७-२४.

▪ बोळ मिसळलेला द्राक्षारस पिण्यास येशू का नकार देतो?

▪ येशूच्या वधस्तंभावर पाटी का लावली जाते असे दिसते आणि तिच्यामुळे पिलात व मुख्य याजकांमध्ये कोणती चकमक उडते?

▪ वधस्तंभावर येशूची अधिक निंदा कशी होते व कशामुळे?

▪ येशूच्या वस्त्रांचे जे केले जाते त्यात कोणता भविष्यवाद पूर्ण होतो?

▪ एका लुटारूत काय बदल होतो आणि त्याची विनंती येशू कशी पूर्ण करील?