व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाढदिवसाच्या मेजवानीत खून

वाढदिवसाच्या मेजवानीत खून

अध्याय ५१

वाढदिवसाच्या मेजवानीत खून

येशूने आपल्या प्रेषितांना सूचना दिल्यावर तो त्यांना जोडी-जोडीने क्षेत्रात पाठवतो. कदाचित पेत्र व आंद्रिया हे भाऊ जोडीने जातात, तसेच याकोब व योहान, फिलिप्प व बर्थलमय, थोमा व मत्तय, याकोब व तद्दय, आणि शिमोन व यहूदा इस्कर्योत हे जोडीने जातात. सुवार्तिकांच्या या सहा जोड्या जिकडे जातात तिकडे राज्याच्या सुवार्तेची घोषणा करतात व अद्‌भूतरित्या रोगनिवारणाचे कार्य करतात.

दरम्यान, बाप्तिस्मा करणारा योहान अजून तुरुंगात आहे. आता तो जवळजवळ दोन वर्षांपासून तेथे आहे. हेरोद अंतिपाने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिला स्वतःची बायको करून घेणे चूक असल्याबद्दल योहानाने जाहीरपणे म्हटल्याचे तुम्हाला आठवत असेल. हेरोद अंतिपा मोशेच्या नियमाचे पालन करण्याचा दावा करीत असल्याने हा व्यभिचारी संबंध योहानाने उघड केला हे योग्यच होते. ह्‍या कारणामुळे, कदाचित्‌ हेरोदियाच्या आग्रहावरुन, हेरोदाने योहानाला तुरुंगात टाकले होते.

योहान नीतीमान मनुष्य असल्याचे हेरोदाच्या ध्यानात येते व तो आनंदाने त्याचे बोलणे ऐकतो देखील. त्यामुळे त्याचे काय करावे हे त्याला कळत नाही. उलटपक्षी हेरोदिया योहानाचा द्वेष करते व त्याला ठार करण्याचे मार्ग शोधीत असते. शेवटी ती वाट पाहात असलेली संधी येते.

इ. स. ३२ च्या वल्हांडणाच्या थोडेसे आधी आपल्या वाढदिवसानिमित्त हेरोद एक मोठा उत्सव करतो. त्या मेजवानीसाठी हेरोदाचे उच्च पदाधिकारी, लष्करी अधिकारी तसेच गालीलातील प्रतिष्ठित नागरिक जमले आहेत. संध्याकाळ होते तेव्हा, हेरोदियाला तिच्या आधीच्या पतीपासून—फिलिप्पापासून—झालेली मुलगी, सलोमी, हिला पाहुण्यांपुढे नाच करण्यास पाठवण्यात येते. तेथील पुरुष श्रोतृवर्ग तिच्या नाचाने मोहीत होतो.

हेरोद सलोमीवर अतिशय खूष झाला आहे. “जे काही तू मागशील ते मी तुला देईन,” अशी तो घोषणा करतो. तो शपथही घेतोः “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.”

उत्तर देण्यापूर्वी सलोमी आपल्या आईचा सल्ला घेण्यासाठी बाहेर जाते. ती विचारतेः “मी काय मागू?”

एकदाची, शेवटी नामी संधि लाभली! हेरोदिया तात्काळ उत्तरतेः “बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे शीर.”

लगेच सलोमी हेरोदाकडे येऊन विनंती करतेः “माझी इच्छा अशी आहे की बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे शीर तबकात घालून आताच्या आता मला द्यावे.”

हेरोद अतिशय खिन्‍न होतो. पण आपल्या पाहुण्यांनी त्याची शपथ ऐकली असल्याने, एका निष्पाप माणसाचा खून करणे असा याचा अर्थ होत असला तरी ती विनंती अमान्य करण्याची त्याला लाज वाटते. भीतीदायक सूचनांसह एका पहारेकऱ्‍याला विनाविलंब तुरुंगाकडे पाठवले जाते. लवकरच तो एका तबकात योहानाचे शीर घेऊन परततो व तो ते सलोमीला देतो. ती ते तिच्या आईकडे नेते. घडलेली गोष्ट योहानाच्या शिष्यांना कळते तेव्हा ते येतात व त्याचे प्रेत नेऊन दफन करतात; व मग ते ही गोष्ट येशूला कळवतात.

कालांतराने, जेव्हा येशूचे लोकांना बरे करणे व भूते काढणे हे हेरोदाच्या कानी येते तेव्हा तो घाबरतो. मृतांमधून उठलेला योहानच येशू आहे अशी भीती त्याला वाटते. त्यानंतर, त्याची शिकवण ऐकण्यासाठी नव्हे तर त्याची भीती साधार आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी येशूला भेटण्याची इच्छा बाळगतो. मत्तय १०:१-५; ११:१; १४:१-१२; मार्क ६:१४-२९; लूक ९:७-९.

▪ योहान तुरुंगात का आहे व त्याला मारून टाकण्याची हेरोदाची का इच्छा नाही?

▪ शेवटी हेरोदिया योहानाला कशी मारवते?

▪ योहानाच्या मृत्युनंतर येशूला भेटण्याची हेरोदाला का इच्छा आहे?