व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वारशाचा प्रश्‍न

वारशाचा प्रश्‍न

अध्याय ७७

वारशाचा प्रश्‍न

येशू परुशांच्या घरी जेवत असल्याचे लोकांना समजल्याचे दिसते. यासाठीच ते हजारोंच्या संख्येने बाहेर जमले असून तो बाहेर येण्याची वाट पहात आहेत. येशूला विरोध करणाऱ्‍या व काहीतरी चुकीचे बोलण्यात त्याला धरु पाहणाऱ्‍या परुशांच्या अगदी उलट, ते लोक येशूचे बोलणे मोठ्या आस्थेने व उत्सुकतेने ऐकतात.

प्रथम आपल्या शिष्यांकडे वळून येशू म्हणतोः “तुम्ही आपणास परुशांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी संभाळा.” जेवणाच्या वेळी दाखवून दिल्याप्रमाणे परुशांची संपूर्ण धार्मिक व्यवस्था ढोंगीपणाने भरलेली आहे. पण परुशांचा ढोंगीपणा देवनिष्ठेच्या देखाव्याखाली दडवलेला असला तरी पुढे तो उघडकीस येईल. येशू म्हणतोः “जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काही गुप्त नाही.”

१२ जणांना गालीलात प्रचाराच्या दौऱ्‍यावर पाठवताना त्याने दिलेल्या प्रोत्साहनाची येशू पुनरावृत्ती करतो. तो म्हणतोः “जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका.” एखाद्या चिमणीलाही देव विसरत नसल्याने तो त्यांनाही विसरणार नाही अशी येशू त्याच्या अनुयायांना हमी देतो. तो म्हणतोः “जेव्हा तुम्हास सभा, सरकार व अधिकारी ह्‍यांच्यासमोर नेतील तेव्हा . . . तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हास शिकवील.”

लोकसमुदायातील एक माणूस बोलतो व विनंती करतोः “गुरुजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा.” ज्येष्ठ पुत्राला वारशातील दोन हिस्से मिळावेत असे मोशाचे नियमशास्त्र म्हणते. तेव्हा, वादाला काही कारणच नसावे. परंतु त्या माणसाला वारशातील त्याच्या कायदेशीर हिश्‍शापेक्षा अधिक हवे होते असे दिसते.

त्यात गोवले जाण्यास येशू योग्यपणे नकार देतो. तो विचारतोः “गृहस्था, मला तुम्हावर न्यायधीश किंवा वाटणी करणारा असे कोणी नेमले?” त्यानंतर तो जनसमुदायाला एक महत्त्वाची ताकीद देतोः “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” होय, माणसाजवळ कितीही संपत्ती असली तरी साधारणपणे तो मरेल व सर्व मागे सोडील. या गोष्टीवर भर देण्यासाठी तसेच देवापाशी चांगला लौकिक संपादन करण्यात उणे पडण्यामधील मूर्खपणा दाखवण्यासाठी येशू एक दाखला देतो. तो खुलासा करतोः

“कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, ‘मी काय करू? कारण माझे उत्पन्‍न साठवावयास मला जागा नाही.’ मग, त्याने म्हटलेः ‘मी असे करीनः मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग, मी आपल्या जिवाला म्हणेनः “हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर.”’ परंतु देवाने त्याला म्हटलेः ‘अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग, जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल?’”

समारोप करताना येशू म्हणतोः “जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.” संपत्ती साठवण्याच्या मूर्खपणात शिष्य अडकले नाहीत तरी जीवनाच्या दैनंदिन काळज्यांनी देवाची तन-मनाने सेवा करण्यापासून त्यांचे लक्ष सहज दूर होऊ शकेल. या कारणासाठी, साधारण दीड वर्षांपूर्वी डोंगरावरील प्रवचनात दिलेल्या उत्तम सल्ल्याची पुनरावृत्ती करण्यासाठी येशू या प्रसंगाचा उपयोग करतो. आपल्या शिष्यांकडे तो वळून म्हणतोः

“यास्तव, मी तुम्हास सांगतो: आपण काय खावे अशी आपल्या जिवाची, अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराची चिंता करीत बसू नका. . . . कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करीत नाही. त्यांस कणगी नाही व कोठारही नाही. तरी देव त्यांचे पोषण करतो. . . . फुले कशी वाढतात त्याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हास सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातील एकासारखाही सजला नव्हता. . . .

“काय खावे किंवा काय प्यावे ह्‍याच्या मागे लागू नका अथवा मनात अस्वस्थ राहू नका. कारण जगातील रा ह्‍या सर्व गोष्टी मिळविण्याची धडपड करतात. परंतु तुम्हास यांची गरज आहे हे तुमच्या पित्याला ठाऊक आहे. तर तुम्ही त्याचे राज्य मिळविण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर ह्‍याही गोष्टी तुम्हास मिळतील.”

विशेषतः आर्थिक तंगीच्या काळात येशूचे शब्द खरे असल्याचे सिद्ध होते. भौतिक गरजांबद्दल फाजील चिंता करून जो माणूस आध्यात्मिक कामात थंडावू लागतो तो वास्तविक आपल्या सेवकांच्या गरजा पुरविण्याच्या देवाच्या कुवतीमध्ये विश्‍वास नसल्याचे दर्शवितो. लूक १२:१-३१; अनुवाद २१:१७.

▪ तो माणूस कदाचित कोणत्या कारणास्तव वारसाबद्दल विचारतो, व येशू कोणती ताकीद देतो?

▪ येशू कोणता दाखला देतो व त्याचा उद्देश काय?

▪ येशू कोणत्या सल्ल्याची पुनरावृत्ती करतो व ते यथोचित का आहे?