व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विश्‍वासघात आणि अटक

विश्‍वासघात आणि अटक

अध्याय ११८

विश्‍वासघात आणि अटक

शिपाई, मुख्य याजक, परुशी व इतरांच्या मोठ्या जमावाला यहूदा गेथशेमाने बागेत घेऊन जातो तेव्हा मध्यरात्र टळून बराच वेळ झालेला आहे. येशूचा विश्‍वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीचे ३० रुपये देण्याचे याजकांनी मान्य केले आहे.

आधी, वल्हांडण सणाच्या भोजनातून यहूदाला जायला सांगण्यात आले तेव्हा तो तडक मुख्य याजकांकडे गेला होता हे उघड आहे. त्यांनी तात्काळ आपले अधिकारी तसेच शिपायांची एक तुकडी यांना गोळा केले. यहूदाने कदाचित प्रथम, येशू आणि त्याच्या प्रेषितांनी वल्हांडण सण जेथे साजरा केला तेथे नेले असावे. ते निघून गेल्याचे लक्षात येताच शस्त्रे, दिवे, व मशाली घेतलेला एक मोठा जमाव यहूदासोबत यरुशलेमाच्या बाहेर किद्रोन दरीच्या पलिकडे गेला.

एकंदर जमावाला जैतुनाच्या डोंगरावर नेत असताना येशू कोठे सापडेल ते आपल्याला माहीत असल्याबद्दल यहूदाला खात्री वाटते. गेल्या आठवड्यात बेथानी व यरुशलेमच्या दरम्यान ये-जा करताना येशू व त्याचे प्रेषित विश्रांती घेण्यासाठी व गप्पा करण्यासाठी अनेकदा गेथशेमाने बागेत थांबत असत. पण आता, जैतुनांच्या झाडाखालच्या अंधारात येशू न दिसण्याची शक्यता असताना शिपाई त्याला कसे ओळखू शकतील? त्यांनी यापूर्वी कधी त्याला पाहिलेही नसेल. त्यामुळे, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा व नीट बंदोबस्ताने घेऊन जा.” अशी खूण यहूदा देतो.

यहूदा त्या मोठ्या जमावाला बागेत घेऊन जातो, येशूला त्याच्या प्रेषितांसमवेत बघतो आणि थेट त्याच्याकडे जातो. “गुरुजी, सलाम,” असे म्हणून तो अतिशय प्रेमाने त्याचे चुंबन घेतो.

त्याला प्रतिटोला देत येशू विचारतोः “गड्या, तू कुठल्या हेतुने इथे आलास?” मग स्वतःच्याच प्रश्‍नाचे उत्तर देत तो म्हणतोः “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय?” या विश्‍वासघातक्याकडे लक्ष दिले तेवढे पुरे! तेव्हा, जळत्या मशाली व दिव्यांच्या उजेडात पुढे येऊन येशू विचारतोः “तुम्ही कोणाला शोधता?”

“नासरेथकर येशूला.” हे उत्तर मिळते.

त्या सर्वांसमोर धैर्याने उभा राहून येशू सांगतोः “मीच तो आहे.” त्याच्या धैर्याने आश्‍चर्यचकित होऊन व काय होणार ते न समजल्याने ते मागे हटून जमिनीवर पडतात.

येशू शांतपणे म्हणतोः “मीच तो आहे, असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधीत असाल तर ह्‍यांना जाऊ द्या.” थोड्याच वेळापूर्वी माडीवरील खोलीत असताना येशूने प्रार्थनेत आपल्या पित्याला सांगितले होते की, त्याने विश्‍वासू प्रेषितांचा संभाळ केला होता व “नाशाच्या पुत्राशिवाय” त्यातील एकाचाही नाश झालेला नव्हता. तेव्हा, त्याचा शब्द पूर्ण व्हावा म्हणून, त्याच्या अनुयायांना जाऊ द्यावे अशी तो विनंती करतो.

शिपाई स्वतःला सावरतात, उठतात व येशूला बांधू लागतात तेव्हा काय घडणार आहे हे प्रेषित ओळखतात. ते विचारतातः “प्रभुजी, आम्ही तरवार चालवावी काय?” येशूने उत्तर देण्यापूर्वीच प्रेषितांनी आणलेल्या दोन तरवारींपैकी एक तरवार चालवत पेत्र मल्खावर हल्ला करतो. तो प्रमुख याजकाचा दास आहे. पेत्राचा वार त्या दासाच्या डोक्याला न लागता त्याचा उजवा कान उडवतो.

येशू मध्ये पडत म्हणतोः “झाले तेवढे पुरे.“ (न्यू.व.) मल्खाच्या कानाला स्पर्श करून तो जखम बरी करतो. मग, पेत्राला आज्ञा देत तो एक महत्त्वाचा धडा शिकवतो. तो म्हणतोः “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल. कारण तरवार धरणारे सर्व तरवारीने नाश पावतील. तुला असे वाटते का की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?”

अटक करून घेण्यास येशू तयार आहे. कारण तो खुलासा करतोः “पण असे झाले तर ह्‍याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे?” पुढे तो म्हणतोः “पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय?” देवाने त्याच्याबद्दल राखलेल्या इच्छेशी तो पूर्णपणे सहमत आहे.

मग, जमावाला उद्देशून येशू बोलतो. तो विचारतोः “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरावयास तुम्ही तरवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही. पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे.”

तेव्हा, शिपायांची तुकडी, सैन्याचे अधिकारी व यहुद्यांचे कामदार हे येशूला धरून बांधतात. हे पाहिल्यावर प्रेषित येशूला सोडून पळून जातात. परंतु एक तरुण, जो कदाचित शिष्य मार्क असावा, जमावात राहतो. येशूने वल्हांडण सण जेथे साजरा केला त्या घरात तो असावा आणि तेथून मग तो जमावाच्या मागोमाग गेला असावा. आता मात्र तो ओळखला जातो व ते त्याला धरण्याचा प्रयत्न करतात. पण तो आपले तागाचे वस्त्र मागे टाकून पसार होतो. मत्तय २६:४७-५६; मार्क १४:४३-५२; लूक २२:४७-५३; योहान १७:१२; १८:३-१२.

▪ येशू गेथशेमाने बागेत आढळेल अशी यहूदाला खात्री का वाटते?

▪ येशू आपल्या प्रेषितांबद्दलची कशी काळजी व्यक्‍त करतो?

▪ येशूच्या रक्षणासाठी पेत्र काय कृती करतो, पण त्याबद्दल येशू पेत्राला काय म्हणतो?

▪ देवाने आपल्याबद्दल राखलेल्या इच्छेशी आपण पूर्णपणे सहमत आहोत हे येशू कसे प्रकट करतो?

▪ प्रेषितांनी येशूला सोडून दिल्यावर कोण मागे राहतो व त्याला काय घडते?