व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शताधिपतीचा मोठा विश्‍वास

शताधिपतीचा मोठा विश्‍वास

अध्याय ३६

शताधिपतीचा मोठा विश्‍वास

येशू त्याचे डोंगरावरील प्रवचन देतो तेव्हा तो त्याच्या जाहीर सेवाकार्याच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलेला आहे. याचा अर्थ, पृथ्वीवरचे त्याचे काम पूर्ण करण्यास त्याला फक्‍त एक वर्ष व जवळपास नऊ महिनेच उरले आहेत.

त्याच्या कार्याचा जसाकाही मुख्य तळ असलेल्या कफर्णहूम शहरात आता येशू प्रवेश करतो. येथे यहुद्यांची वडीलमंडळी त्याच्याकडे एक विनंती घेऊन येतात. त्यांना रोमी सैन्यातील एका शताधिपतीने पाठवले आहे. तो माणूस परराष्ट्रीय म्हणजे यहुद्यांपेक्षा दुसऱ्‍या वंशाचा आहे.

त्या शताधिपतीचा आवडता दास एका गंभीर आजाराने मरणाला टेकला असून येशूने आपल्या दासाला बरे करावे अशी त्याची इच्छा आहे. शताधिपतीच्या वतीने यहुदी मनःपूर्वक याचना करतात. ते म्हणतातः “आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे. कारण आपल्या राष्ट्रावर तो प्रेम करतो आणि यानेच आमच्याकरता सभास्थान बांधून दिले आहे.”

येशू त्या लोकांबरोबर का कू न करता जातो. परंतु ते घरापाशी येत असताना, शताधिपती आपल्या मित्रांना सांगून पाठवतोः “प्रभुजी, श्रम घेऊ नका. कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. ह्‍यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही.”

इतरांना आज्ञा देण्याची सवय असलेल्या माणसाकडून किती हे नम्रतेचे बोल! पण, रुढीनुसार यहुद्यांना यहुद्देत्तरांशी व्यवहार करण्यास मनाई असल्याचे लक्षात आल्याने बहुधा त्याला येशूची ही काळजी वाटत असावी. पेत्रानेही म्हटले होतेः “तुम्हाला ठाऊकच आहे की, यहुदी मनुष्याने अन्यजातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे ठेवणे हे त्याच्या रीतीरिवाजाविरुद्ध आहे.”

बहुधा ही रुढी मोडल्याचे दुष्परिणाम येशूला भोगावे लागू नयेत अशी इच्छा असल्याने, तो शताधिपती आपल्या मित्रांना त्याला अशी विनंती करायला सांगतोः “शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला जा, म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्‍याला ये, म्हटले म्हणजे तो येतो. आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.”

हे ऐकून येशूला आश्‍चर्य वाटते. तो म्हणतोः “मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्‍वास मला इस्राएलातही आढळला नाही.” शताधिपतीच्या चाकराला बरे केल्यावर, त्या प्रसंगाचा उपयोग करून, अविश्‍वासी यहुद्यांनी अव्हेरलेले आशीर्वाद विश्‍वासू यहुद्देत्तरांना कसे दिले जातील हे येशू सांगतो.

येशू म्हणतोः “पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या पंक्‍तीस बसतील; परंतु राज्याचे पुत्र अंधारात टाकले जातील. तेथे त्यांचे रडणे व दातखाणे चालेल.”

‘बाहेरच्या अंधारात टाकले गेलेले राज्याचे पुत्र’ म्हणजे ख्रिस्तासह राजे होण्याची सर्वप्रथम दिली गेलेली संधी न स्वीकारणारे स्वाभाविक यहुदी होत. अब्राहाम, इसहाक व याकोब देवाची राज्य-व्यवस्था चित्रित करतात. अशा रितीने, जणू स्वर्गाच्या राज्यात, स्वर्गीय जेवणावळीच्या आसनावर बसण्यासाठी यहुद्देत्तरांचे कसे स्वागत केले जाईल, ते येशू सांगत आहे. लूक ७:१-१०; मत्तय ८:५-१३; प्रे. कृत्ये १०:२८.

▪ यहुद्देत्तर शताधिपतीच्या वतीने यहूदी का विनंती करतात?

▪ शताधिपतीने येशूला आपल्या घरात येण्याचे आमंत्रण न देण्याच्या कारणाचा खुलासा कसा होईल?

▪ येशूच्या समारोपाच्या उद्‌गारांचा अर्थ काय?