व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शुक्रवारी दफन—रविवारी कबर रिकामी!

शुक्रवारी दफन—रविवारी कबर रिकामी!

अध्याय १२७

शुक्रवारी दफन—रविवारी कबर रिकामी!

आतापर्यंत दुपारी उशीराची वेळ आहे, आणि निसान १५ चा शब्बाथ सूर्यास्ताला सुरु होईल. वधस्तंभावरील येशूच्या मृत शरीरात त्राण नाही, पण त्याच्या बाजूचे दोन्ही लुटारु अजून जिवंत आहेत. शुक्रवारच्या दुपारच्या वेळेस ‘तयारी’ म्हणतात, कारण भोजन बनवणे व शब्बाथाच्या दुसऱ्‍या दिवसापर्यंत पुढे न ढकलता येण्यासारखी कामे लोक तेव्हा करुन घेतात.

लवकरच सुरु होणारा शब्बाथ दिवस नेहमीचाच शब्बाथ [आठवड्याचा सातवा दिवस] नसून तो दुहेरी वा “मोठा” शब्बाथ आहे. निसान १५ हा बेखमीर भाकरीच्या सात दिवसांच्या सणातील पहिला दिवस असून, (आठवड्यातील कोणत्याही दिवशी तो आला तरी तो नेहमीच शब्बाथ असतो.) नेहमीच्या शब्बाथ दिवशीच आलेला आहे.

देवाच्या नियमशास्त्रानुसार वधस्तंभावर शरीरे रात्रभर टांगून ठेवायची नसतात. त्यामुळे मरणदंडाची शिक्षा झालेल्यांचे पाय मोडून त्यांचा मृत्यु लवकर घडवावा अशी मागणी यहूदी पिलाताला करतात. या कारणामुळे शिपाई दोन्ही लुटारुंचे पाय मोडतात. परंतु येशू मेलेला दिसल्यामुळे त्याचे पाय मोडण्यात येत नाहीत. यामुळे, “त्याचे हाड मोडणार नाहीत,” हा शास्त्रलेख पूर्ण होतो.

तथापि, येशू खराच मेला आहे की नाही ही शंका दूर करण्यासाठी एक शिपाई त्याच्या कुशीत भाला खुपसतो. तो भाला त्याच्या हृदयाच्या जवळच्या भागातून आरपार जातो, आणि रक्‍त व पाणी बाहेर येते. ही घटना पाहणारा साक्षीदार, प्रेषित योहान सांगतो की, यामुळे आणखी एक शास्त्रलेख पूर्ण होतोः “ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील.”

न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सभासद अरिमथाईकर योसेफ हा सुद्धा वधस्थानावर उपस्थित आहे. येशूविरुद्ध उच्च न्यायालयाने केलेल्या अन्यायी कारवाईला अनुकूल मत देण्याचे त्याने नाकारले. येशूचा शिष्य अशी आपली ओळख करू देण्यास तो भीत असला तरी प्रत्यक्षात तो एक शिष्य आहे. आता मात्र तो धैर्य दाखवतो आणि येशूचे शरीर मागण्यासाठी पिलाताकडे जातो. पिलात वधस्थानी नेमलेल्या सैन्याच्या अधिकाऱ्‍याला बोलावतो आणि येशू मेला असल्याची त्या अधिकाऱ्‍याने खात्री दिल्यावर, पिलात प्रेताचा ताबा देतो.

योसेफ ते शरीर घेतो आणि दफन करण्यासाठी त्याला स्वच्छ, उंची तागाच्या कापडात गुंडाळतो. न्यायसभेच्या दुसऱ्‍या एका सभासदाची, निकदेमाची, त्याला मदत मिळते. आपले स्थान गमावण्याच्या भीतीने निकदेमाने देखील येशूवरील आपला विश्‍वास कबूल केलेला नाही. पण आता, तो सुमारे ३३ किलो गंधरस आणि भारी अगरु घेऊन येतो. यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रितीप्रमाणे येशूचे शरीर, हा मसाला लावलेल्या पट्ट्यांनी गुंडाळले जाते.

यानंतर जवळच्या बागेमध्ये खडकात खोदलेल्या, योसेफाच्या नव्या स्मारक कबरेत ते शरीर ठेवण्यात येते. शेवटी कबरेच्या तोंडावर एक मोठा धोंडा लोटून ठेवला जातो. शब्बाथापूर्वी दफनविधी उरकण्यासाठी, मृत शरीराची घाईगर्दीने तयारी झाली आहे. त्या कारणाने, या तयारीत ज्यांनी कदाचित मदत केली आहे अशा, मरीया मग्दालिया आणि धाकट्या याकोबाची आई मरीया सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार करण्यासाठी लगबगीने घरी जातात. येशूचे शरीर अधिक काळ टिकवण्यासाठी, शब्बाथ दिवसानंतर, त्यावर उपचार करण्याची त्यांची योजना आहे.

दुसऱ्‍या दिवशी, शनिवारी, [शब्बाथ दिवशी], मुख्य याजक आणि परुशी पिलाताकडे जातात आणि म्हणतातः “महाराज, तो ठक जिवंत असताना ‘तीन दिवसानंतर मी उठेन,’ असे म्हणाला होता, ह्‍याची आम्हास आठवण आहे. म्हणून तिसऱ्‍या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे. नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकांस सांगतील. मग, शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल.”

पिलात म्हणतोः “तुमच्याजवळ पहारा आहे. जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” तेव्हा ते जातात आणि धोंड्यावर शिक्कामोर्तब करून तसेच रोमी शिपायांना पहाऱ्‍यावर नेमून, कबरेचा बंदोबस्त करतात.

रविवारी, भल्या सकाळी, येशूच्या शरीरावर उपचार करण्यासाठी, मरीया मग्दालिया आणि याकोबाची आई मरीया, सलोमे व योहान्‍ना इतर स्त्रियांबरोबर सुगंधी द्रव्ये घेऊन कबरेकडे येतात. वाटेत त्या एकमेकीला म्हणतातः “कबरेच्या तोंडावरुन धोंड आपल्याकरिता कोण लोटील?” पण तेथे पोहंचल्यावर त्यांना आढळते की भूकंप झाला असून यहोवाच्या दूताने धोंडा दूर लोटला आहे. पहारेकरी निघून गेले आहेत आणि कबर रिकामी आहे! मत्तय २७:५७–२८:२; मार्क १५:४२–१६:४; लूक २३:५०–२४:३, १०; योहान १९:१४, योहान १९:३१–२०:१; योहान १२:४२; लेवीय २३:५-७; अनुवाद २१:२२, २३; स्तोत्रसंहिता ३४:२०; जखर्या १२:१०.

▪ शुक्रवार याला ‘तयारी’चा दिवस का म्हणतात आणि “मोठा” शब्बाथ म्हणजे काय?

▪ येशूच्या शरीरासंबंधी कोणती शास्त्रवचने पूर्ण होतात?

▪ येशूच्या दफनाशी योसेफ व निकदेमाचा काय सबंध आणि त्यांचे येशूबरोबर कोणते नाते आहे?

▪ याजक पिलाताला काय विनंती करतात आणि त्यावर तो काय म्हणतो?

▪ रविवारी भल्या सकाळी काय घडते?