व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शेजारधर्माला जागणारा शोमरोनी

शेजारधर्माला जागणारा शोमरोनी

अध्याय ७३

शेजारधर्माला जागणारा शोमरोनी

येशू कदाचित यरुशलेमापासून जवळपास दोन मैलावरील बेथानी गावाजवळ आहे. मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत असलेला एक मनुष्य प्रश्‍न विचारण्यासाठी त्याच्याकडे येऊन विचारतोः “गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?”

हा माणूस एक शास्त्री असून केवळ माहिती मिळविण्यासाठी प्रश्‍न विचारत नसून आपली परीक्षा घेण्याची इच्छा असल्याने विचारत आहे हे येशू उमजतो. यहुद्यांच्या संवेदना दुखावतील असे उत्तर येशूला द्यायला लावण्याचे त्या शेजाऱ्‍याच्या मनात असू शकेल. पण, प्रथम, त्या शास्त्र्याला त्याचे मत प्रकट करायला लावण्यासाठी येशू विचारतोः “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे?”

असाधारण मर्मज्ञान प्रकट करीत उत्तर द्यावे म्हणून तो शास्त्री देवाच्या नियमातून अनुवाद ६:५ व लेवीय १९:१८ मधील उतारे उद्धृत करतो व म्हणतोः “तू आपला देव यहोवा ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्‍तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर.”

येशू प्रतिसाद देतोः “ठीक उत्तर दिलेस. हेच कर म्हणजे जगशील.”

परंतु त्या शास्त्र्याचे समाधान झालेले दिसत नाही. येशूचे त्याला हवे असलेले उत्तर तितके स्पष्ट नाही. आपला दृष्टीकोन योग्य आहे व म्हणून तो इतरांना देत असलेली वागणूक नीतीमान असल्याची पुष्टी त्याला येशूकडून हवी आहे. यासाठीच तो विचारतोः “पण, माझा शेजारी कोण?”

लेवीय १९:१८ मध्ये आलेली “शेजारी” ही संज्ञा केवळ यहुदी बांधवांपुरतीच मर्यादित आहे अशी यहुद्यांची धारणा आहे. ती इतकी की, कालांतराने प्रेषित पेत्राने देखील असे म्हटलेः “तुम्हाला ठाऊकच आहे की, यहुदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणे-येणे ठेवणे हे त्याच्या रितीरिवाजाविरुद्ध आहे.” या कारणामुळे तो शास्त्री व बहुधा येशूचे शिष्य देखील मानतात की केवळ यहुदी बांधवांना प्रेमाने वागवले तर ते नीतीमान आहेत, कारण त्यांच्या मते यहुद्देत्तर खरोखर त्यांचे शेजारी नव्हेत.

मग, आता आपल्या श्रोत्यांना न दुखवता, येशू त्यांचे मत कसे सुधरवणार? कदाचित सत्य घटनेवर आधारीत अशी एक गोष्ट तो सांगतो. येशू खुलासा करतोः “एक [यहुदी] यरुशलेमाहून खाली यरीहोस जात असताना लुटारुंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला, आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.”

येशू पुढे म्हणतोः “मग, एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसऱ्‍या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला व त्याला पाहून दुसऱ्‍या बाजूने चालता झाला. मग, एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला.”

अनेक याजक व मंदिरातील त्यांचे मदतनीस लेवी यरीहोमध्ये राहतात. ते जेथे काम करतात त्या यरुशलेमातील मंदिरापासून हे ठिकाण २१ किलोमीटर्स दूर असून यरुशलेमाहून तो रस्ता ९३० मीटर्स खाली उतरतो व तो असुरक्षित आहे. संकटात सापडलेल्या यहुदी बांधवाला याजक व लेवी यांनी मदत करावी अशी अपेक्षा असते. पण ते मदत करीत नाहीत. त्याऐवजी एक शोमरोनी माणूस ती मदत देतो. यहुदी लोक शोमरोन्यांचा इतका द्वेष करतात की, नुकताच यहुद्यांनी येशूला “शोमरोनी” संबोधून कडक शब्दात त्याचा अपमान केला.

यहुद्याला मदत करण्यासाठी तो शोमरोनी माणूस काय करतो? येशू म्हणतोः “त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांस तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या. त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्‍या दिवशी त्याने दोन दिनार [साधारण दोन दिवसांची मजुरी] काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटलेः ‘ह्‍याची काळजी घ्या; आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन.’”

गोष्ट सांगून झाल्यावर येशू शास्त्र्याला विचारतोः “तर लुटारुंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्‍या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला?”

चांगुलपणाचे श्रेय एखाद्या शोमरोन्याला देणे गैरसोयीचे वाटून तो उत्तरतोः “त्याच्यावर दया करणारा तो.”

समारोपादाखल, येशू म्हणतोः “जा, आणि तू देखील तसेच कर.”

येशूने त्या शास्त्र्याला, यहुद्देत्तरही त्याचे शेजारी आहेत असे सरळ सांगितले असते तर त्याने ते स्वीकारलेच नसते, इतकेच नव्हे तर बहुधा त्याच्या श्रोत्यातील बहुतेकांनी, येशूबरोबर झालेल्या या चर्चेमध्ये त्या शास्त्र्याची बाजू घेतली असती. पण, वास्तव जीवनाशी मिळत्या जुळत्या या गोष्टीने, खंडन करता येणार नाही अशा रितीने उघड केले की, आपल्या स्वतःच्या वंशाच्या वा राष्ट्राच्या लोकांव्यतिरिक्‍त इतर लोकांचाही आपल्या शेजाऱ्‍यात समावेश आहे. खरेच, येशूची शिकवण्याची रीत किती अद्‌भूत आहे! लूक १०:२५-३७; प्रे. कृत्ये १०:२८; योहान ४:९; ८:४८.

▪ शास्त्री येशूला कोणते प्रश्‍न विचारतो व ते विचारण्यामागे त्याचा काय हेतू असावा हे उघड आहे?

▪ आपले शेजारी कोण आहेत अशी यहुद्यांची धारणा आहे व शिष्यांचा दृष्टीकोण तसाच असावा असे मानण्यास काय कारण आहे?

▪ शास्त्र्याला खंडण करता येणार नाही अशा कोणत्या रितीने येशू योग्य दृष्टीकोण त्याच्या ध्यानात आणून देतो?