व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शेवटची दर्शने व इ. स. ३३ चा पेंटेकॉस्ट

शेवटची दर्शने व इ. स. ३३ चा पेंटेकॉस्ट

अध्याय १३१

शेवटची दर्शने व इ. स. ३३ चा पेंटेकॉस्ट

त्यानंतर एकदा येशू त्याच्या सर्व ११ प्रेषितांना गालीलातील एका डोंगरावर भेटण्याची योजना करतो. त्या भेटीबद्दल इतर शिष्यांनाही सांगितले जाते असे दिसते. त्यामुळे ५०० हून अधिक लोक जमतात. येशू प्रकट होऊन त्यांना शिकवू लागतो तेव्हा ते एक आनंदकारक अधिवेशन ठरते!

त्या मोठ्या लोकसमुदायाला येशू अनेक गोष्टींमध्ये असाही खुलासा करतो की, देवाने त्याला स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे. तो बोध करतोः “तेव्हा, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”

जरा विचार करा! हे शिष्य बनवण्याचे काम पुरुष, स्त्रिया व मुले अशा सर्वांना मिळते. प्रचार व शिकवणीचे त्यांचे काम थांबवण्याचा विरोधक प्रयत्न करतील. पण येशू त्यांना धीर देतोः “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” त्यांचे सेवाकार्य पूर्ण करण्यात त्यांना मदत करण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू त्यांच्या अनुयायांबरोबर राहतो.

आपल्या पुनरुत्थानानंतर एकूण ४० दिवस आपण जिवंत असल्याचे येशू त्याच्या शिष्यांना दाखवतो. या दर्शनांमध्ये तो त्यांना देवाच्या राज्याबद्दल शिकवतो आणि त्याचे शिष्य या नात्याने असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्‍यांवर भर देतो. एके प्रसंगी, तो आपल्या भावाला, याकोबालाही दर्शन देतो आणि तो [येशू] खरोखरीच ख्रिस्त असल्याबद्दल, या एकेकाळी विश्‍वास नसलेल्याची खात्री पटवतो.

प्रेषित अजून गालीलात असताना त्यांनी यरुशलेमाला परतावे अशी सूचना येशू देतो हे उघड आहे. तेथे त्यांना भेटत असताना तो त्यांना म्हणतोः “यरुशलेम सोडून जाऊ नका. तर पित्याने देऊ केलेल्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे, तिची वाट पाहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा; पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.”

पुढे येशू पुन्हा त्याच्या प्रेषितांना भेटतो आणि त्यांना यरुशलेम शहराबाहेर जैतूनाच्या डोंगरावर पूर्वेकडील उतारावर वसलेल्या बेथानीपर्यंत घेऊन जातो. आश्‍चर्य म्हणजे, लवकरच तो स्वर्गाला जाणार असल्याबद्दल त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टींच्या पश्‍चात्‌ त्याचे राज्य पृथ्वीवर स्थापन केले जाईल अशी अजूनही शिष्यांची श्रद्धा आहे. या कारणामुळे ते विचारतातः “प्रभुजी, ह्‍याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?”

त्यांची गैरसमजूत सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी येशू इतकेच उत्तर देतोः “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही.” मग, त्यांनी करावयाच्या कामावर पुन्हा एकदा जोर देत तो म्हणतोः “पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल; आणि यरुशलेमात, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”

आणि ते पाहात असताना येशू स्वर्गाकडे उंच जाऊ लागतो आणि मग एक ढग त्याला त्यांच्या दृष्टीआड करतो. आपले मानवी शरीर अंतर्धान करून, एक आत्मिक व्यक्‍ति म्हणून तो स्वर्गारोहण करतो. ते ११जण आकाशाकडे पाहात असताना पांढरी वस्त्रे घातलेली २ माणसे त्यांच्या शेजारी प्रकट होतात. हे शरीर धारण केलेले देवदूत म्हणतातः “अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहात उभे आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल.”

जाहीर गाजावाजा न करता आणि केवळ त्याचे विश्‍वासू अनुयायी पाहात आहेत अशा रितीने येशू नुकताच पृथ्वी सोडून गेला आहे. तेव्हा, त्याचप्रकारे, म्हणजे जाहीर गाजावाजा न करता व तो परतला असून राज्य-सामर्थ्याने त्याने आपली उपस्थिती सुरु केली आहे असे केवळ त्याच्या विश्‍वासू अनुयायांच्या ध्यानात येईल असा तो परत येणार होता.

आता प्रेषित जैतूनाच्या डोंगरावरून उतरतात, किद्रोन नदी पार करतात व पुन्हा एकदा यरुशलेममध्ये प्रवेश करतात. येशूची आज्ञा मानून ते तेथेच राहतात. दहा दिवसानंतर, इ. स. ३३च्या यहूद्यांच्या पेंटेकॉस्ट सणाच्या वेळी, यरूशलेममध्ये माडीवरील एका खोलीत सुमारे १२० शिष्य जमलेले असताना अचानक मोठ्या वाऱ्‍याच्या सुसाट्यासारखा आवाज त्या सर्व घरभर होतो. अग्नीसारख्या जिभा दिसू लागतात व तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकावर एक अशा बसतात; आणि सर्व शिष्य वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागतात. हा, येशूने कबूल केलेला, पवित्र आत्मा ओतण्यात आला आहे! मत्तय २८:१६-२०; लूक २४:४९-५२; १ करिंथकर १५:५-७; प्रे. कृत्ये १:३-१५; २:१-४.

▪ येशू जाण्यापूर्वी गालीलातील एका डोंगरावर कोणाला सूचना देतो आणि त्या सूचना कोणत्या आहेत?

▪ येशू त्याच्या शिष्यांना कसा धीर देतो आणि तो त्यांच्याबरोबर कसा राहील?

▪ पुनरुत्थानानंतर येशू किती काळ त्याच्या शिष्यांना दर्शन देतो आणि तो त्यांना काय शिकवतो?

▪ येशूच्या मृत्युपूर्वी जो निश्‍चितच शिष्य नव्हता, अशा कोणत्या व्यक्‍तीला येशू दर्शन देतो?

▪ येशू आपल्या शिष्यांना कोणत्या दोन शेवटल्या भेटी देतो आणि या प्रसंगी काय घडते?

▪ येशू ज्या रितीने गेला तशाच तऱ्‍हेने परत येईल हे कसे?

▪ इ. स. ३३च्या पेंटेकॉस्टला काय घडते?