व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शेवटल्या दिवसांचे चिन्ह

शेवटल्या दिवसांचे चिन्ह

अध्याय १११

शेवटल्या दिवसांचे चिन्ह

आतापर्यंत मंगळवारची दुपार झालेली आहे. खालच्या मंदिराकडे बघत येशू जैतुनाच्या डोंगरावर बसला असताना पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान एकांती त्याच्याकडे येतात. चिऱ्‍यावर चिरा राहणार नाही असे येशूने नुकतेच सांगितल्यामुळे त्यांना मंदिराची काळजी वाटत आहे.

पण ते येशूकडे येतात तेव्हा त्यांच्या मनात आणखी काही आहे असे दिसते. काही आठवड्यांपूर्वी “मनुष्याचा पुत्र प्रकट होईल” अशा त्याच्या “उपस्थिती”च्या काळाबद्दल तो बोलला होता. आणि याच्याही आधी एका प्रसंगी त्याने त्यांना “युगाच्या समाप्ती”बद्दल सांगितले होते. त्यामुळे प्रेषितांना अतिशय कुतुहल वाटत आहे.

ते म्हणतातः “ह्‍या गोष्टी [ज्यामुळे यरुशलेम व त्याच्या मंदिराचा नाश होईल] केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” थोडक्यात त्यांच्या प्रश्‍नाचे तीन भाग आहेत. प्रथम, यरुशलेम व त्याच्या मंदिराचा नाश, मग राज्य वैभवात येशूची उपस्थिती आणि शेवटी या सर्व व्यवस्थेचा अंत. या गोष्टी जाणण्याची त्यांची इच्छा आहे.

त्याने सविस्तर दिलेल्या माहितीमध्ये येशू प्रश्‍नाच्या तिन्ही भागांची उत्तरे देतो. यहुदी व्यवस्था कधी संपेल याची ओळख पटवणारे चिन्ह तो सांगतो. आणि तो अधिक माहिती देखील देतो. ते त्याच्या उपस्थितीच्या व या संपूर्ण व्यवस्थेच्या अंताजवळच्या काळात जगत आहेत असे त्याच्या भावी शिष्यांना समजावे म्हणून त्यांना सावध करण्यासाठीही तो एक चिन्ह देतो.

वर्षामागून वर्षे जातात तसे प्रेषितांना येशूच्या भविष्यवादाची पूर्तता दिसून येते. होय, त्याने सांगितलेल्याच गोष्टी त्यांच्या दिवसांमध्ये होऊ लागतात. अशा रितीने ३७ वर्षांनंतर इ. स. ७० मध्ये हयात असलेले ख्रिस्ती लोक, यहुदी व्यवस्था व त्याच्या मंदिराच्या नाशामुळे आश्‍चर्यचकित होत नाहीत.

परंतु येशूची उपस्थिती व संपूर्ण व्यवस्थेची समाप्ती इ. स. ७० मध्ये होत नाही. राज्य सामर्थ्यातील त्याची उपस्थिती बरीच नंतर घडते. पण कधी? येशूच्या भविष्यवादाच्या अभ्यासाने ते प्रकट होते.

येशू भाकित करतो की, “लढाया . . . व लढायांच्या आवया” होतील. तो म्हणतोः “राष्ट्रांवर राष्ट्र . . . उठेल,” आणि दुष्काळ, भूमिकंप व रोगराया होतील. त्याच्या शिष्यांचा द्वेष केला जाईल आणि त्यांना जिवे मारले जाईल. खोटे संदेष्टे उठून अनेकांना फसवतील. अनीती वाढेल आणि पुष्कळांची प्रीती थंडावेल. याच वेळी सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला जाईल.

इ. स. ७० मध्ये यरुशलेमाचा नाश होण्यापूर्वी येशूच्या भविष्यवादाची मर्यादित पूर्णता झाली असली तरी, तिची मोठी पूर्णता, त्याची उपस्थिती व या व्यवस्थेच्या अंताच्या वेळी होते. १९१४ पासूनच्या जागतिक घटनांचे लक्षपूर्वक अवलोकन केल्यास त्या सालापासून येशूच्या महत्त्वाच्या भविष्यवाणीची पूर्तता होत असल्याचे दिसून येते.

येशूने दिलेल्या चिन्हाचा आणखी एक भाग म्हणजे “ओसाडीचा [ओस करणारा] अमंगळ पदार्थ” याचा उदय होय. इ. स. ६६ मध्ये रोमी “सैन्या”च्या रुपाने हा अमंगळ पदार्थ उदयाला आला. ते सैन्य यरुशलेमाला वेढा देते व मंदिराची भिंत पाडते. हा “अमंगळ पदार्थ” नको तेथे उभा आहे.

या चिन्हाच्या मोठ्या पूर्णतेमध्ये लीग ऑफ नेशन्स व त्याच्या पाठीवर आलेला संयुक्‍त राष्ट्रसंघ हा तो अमंगळ पदार्थ आहे. जागतिक शांतीसाठी असलेल्या या संगठनेकडे, ख्रिस्ती धर्मजगातील लोक, देवाच्या राज्याची जागा घेणारी गोष्ट या दृष्टीने पाहतात. किती घृणास्पद ही गोष्ट! त्यामुळे कालांतराने संयुक्‍त राष्ट्रसंघाशी संलग्न असलेल्या राजकीय शक्‍ती ख्रिस्ती धर्मजगतावर [यरुशलेमेने चित्रित केलेली गोष्ट] हल्ला करील व त्याला उद्‌ध्वस्त करील.

अशा तऱ्‍हेने, येशू भविष्यवाद करतोः “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.” इ. स. ७० मध्ये यरुशलेमाच्या नाशाच्या वेळी दहा लाखाहून अधिक लोक मारले गेले असे म्हटले जाते. ते संकट खरोखरच मोठे होते. तरी नोहाच्या दिवसातील जागतिक प्रलयापेक्षा मोठे नव्हते. या कारणास्तव, येशूच्या भविष्यवादाच्या या भागाची मोठी पूर्तता अजून व्हावयाची आहे.

शेवटल्या दिवसामध्ये आत्मविश्‍वास

मंगळवार, निसान ११ चा दिवस मावळतो तेव्हा येशू राज्य सामर्थ्यातील आपली उपस्थिती आणि या व्यवस्थेच्या अंताच्या चिन्हाबद्दल आपल्या प्रेषितांबरोबर करीत असलेली चर्चा पुढे चालू ठेवतो. खोट्या ख्रिस्तांमागे न जाण्याबद्दल तो त्यांना इशारा देतो. तो म्हणतो की, “साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून” प्रयत्न केले जातील. परंतु दूरदृष्टी असलेल्या गिधाडांप्रमाणे, खरे आध्यात्मिक अन्‍न असेल तेथेच म्हणजे त्याच्या अदृश्‍य उपस्थितीमध्ये खऱ्‍या ख्रिस्तापाशी, हे निवडलेले लोक जमतील.

खोटे ख्रिस्त केवळ दृश्‍य रितीने उपस्थित होऊ शकतात. या उलट येशूची उपस्थिती अदृश्‍य असेल. येशू म्हणतो त्याप्रमाणे, त्याची उपस्थिती मानवी इतिहासातील भयप्रद काळात घडेल. कारण “सूर्य अंधःकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही.” होय, मानवजातीच्या अस्तित्वातला हा सर्वात अंधःकाराचा काळ असेल. तेव्हा जणू दिवसा सूर्य काळा होईल व रात्री चंद्र प्रकाश देणार नाही.

येशू पुढे सांगतोः “आकाशातील बळे डळमळतील.” याद्वारे तो हे सूचित करतो की भौतिक आकाश देखील उग्र स्वरुप धारण करील. पुढे ते केवळ पक्ष्यांचे निवासस्थान म्हणून राहणार नाही तर युद्धविमाने, अग्निबाण, व अंतराळ शोधक आयुधांनी भरून जाईल. भय व हिंसाचार या गोष्टी मानवी इतिहासात पूर्वी कधी अनुभवल्या नव्हत्या इतक्या पराकोटीला पोहंचतील.

परिणामी, येशू म्हणतोः “रा घाबरी होऊन पेचात पडतील. भयाने व जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील.” येशूने म्हटल्याप्रमाणे खरोखर मानवजातीच्या अस्तित्वातील या सर्वात अंधाऱ्‍या काळाची परिणती अशा समयात होईल की तेव्हा येशूने म्हटल्याप्रमाणे “मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल, मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील.”

परंतु या दुष्ट व्यवस्थेचा नाश करण्यासाठी ‘मनुष्याचा पुत्र सामर्थ्यासह येतो’ तेव्हा सर्वच लोक शोक करीत नसतील. ख्रिस्ताबरोबर त्याच्या स्वर्गीय राज्यात सहभागी होणारे १,४४,००० “निवडलेले” आणि येशूने त्याच्या “दुसरी मेंढरे” संबोधलेले त्यांचे सोबती यापैकी कोणीही शोक करणार नाहीत. मानवी इतिहासाच्या सर्वात काळ्या काळात राहात असूनही, “ह्‍या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्‍तीसमय जवळ आला आहे,” या येशूच्या उत्तेजनाला ते प्रतिसाद देतात.

शेवटल्या दिवसात राहणाऱ्‍या त्याच्या शिष्यांना अंत जवळ आल्याचे निश्‍चित करता यावे म्हणून येशू हा दाखला देतोः “अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पाहाः त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच ह्‍या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की, सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.”

अशा रितीने, या चिन्हाचे वेगवेगळे पैलू पूर्ण होताना दिसतील तेव्हा त्याच्या शिष्यांनी जाणावे की, या व्यवस्थेचा अंत जवळ आला असून लवकरच देवाचे राज्य दुष्टपणाला समूळ नष्ट करील. एवढेच नव्हे तर येशूने सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता पाहणाऱ्‍या लोकांच्या हयातीत तो अंत होईल!

अति महत्त्वाच्या त्या शेवटल्या दिवसात हयात असणाऱ्‍या शिष्यांना ताकीद देताना येशू म्हणतोः “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारुबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्‍या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल. तुम्ही तर होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा.”

शहाण्या व मूर्ख कुमारी

राज्य-सामर्थ्यातील आपल्या उपस्थितीविषयी चिन्ह सांगण्याबद्दल त्याच्या प्रेषितांनी केलेल्या विनंतीला येशू उत्तर देत आहे. आता त्या चिन्हाच्या आणखी काही वैशिष्ट्याबद्दल तो तीन बोधकथा किंवा दाखले देतो.

प्रत्येक दाखल्याची पूर्णता त्याच्या उपस्थितीच्या काळातील लोकांना दिसू शकेल. पहिल्याची सुरवात तो अशी करतोः “तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्‍या जाण्यास निघाल्या. त्यात पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.”

“स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे होईल” असे म्हणताना स्वर्गीय राज्याचे वतन प्राप्त करण्यात अर्धे लोक मूर्ख व अर्धे शहाणे आहेत असा येशूच्या बोलण्याचा अर्थ नव्हता! तर स्वर्गीय राज्याच्या संदर्भात एक वैशिष्ट्य असे वा तसे आहे किंवा राज्याच्या संदर्भातील गोष्टी अशा अशा सारख्या असतील असे त्याचे म्हणणे होते.

त्या दहा कुमारी, स्वर्गीय राज्यास पात्र असलेल्या किंवा आपण पात्र आहोत असे म्हणणाऱ्‍या सर्व ख्रिस्ती लोकांचे प्रतिक आहेत. इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टला ख्रिस्ती मंडळीचे पुनरूत्थित, वैभवी वराला, येशू ख्रिस्ताला वाग्दान झाले. पण लग्न मात्र स्वर्गात, भविष्य काळात कोणा अनुल्लेखित काळी होणार होते.

या दाखल्यामध्ये, वराला सामोरे जाण्याच्या व वरातीत सामील होण्याच्या उद्देशाने त्या दहा कुमारी जातात. तो येईल तेव्हा, त्याच्या वधूसाठी तयार केलेल्या घरात तिला तो आणीत असताना, वरातीचा मार्ग त्या आपल्या दिव्यांनी प्रज्वलित करतील व अशा रितीने त्याचा सन्मान करतील. परंतु येशू स्पष्टता करतोः “मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली.”

वराला लागलेला मोठा विलंब दर्शवतो की, अधिपत्य करणारा राजा या नात्याने ख्रिस्ताची उपस्थिती भविष्यात मोठ्या कालावधीनंतर होणार आहे. शेवटी १९१४ साली तो गादीवर येतो. त्या आधीच्या प्रदीर्घ रात्रीत सर्व कुमारी झोपी जातात. पण ह्‍यासाठी त्यांना दोष दिला जात नाही. मूर्ख कुमारींना त्यांच्या भांड्यात तेल नसल्याबद्दल दोष दिला आहे. वर येण्यापूर्वी कुमारी कशा जाग्या होतात त्याचा खुलासा येशू करतोः “तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की, ‘पहा, वर आला आहे. त्याला सामोऱ्‍या चला.’ मग, त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यांस म्हटलेः ‘तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या. कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत.’ पण शहाण्यांनी उत्तर दिले की, ‘कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्‍यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे.’”

दीपक म्हणून खऱ्‍या ख्रिस्तीजनांना उजळत ठेवणाऱ्‍या गोष्टीचे, ते तेल, प्रतिक आहे. ज्यावर ख्रिस्ती लोक घट्ट पकड ठेवतात ते देवाचे वचन आणि ते समजण्यास मदत करणारा पवित्र आत्मा या त्या गोष्टी आहेत. लग्नाच्या मेजवानीला जाणाऱ्‍या वरातीत, वराचे स्वागत करण्यासाठी उजाळा देणे या आध्यात्मिक तेलामुळे त्या शहाण्या कुमारींना शक्य होते. पण मूर्ख कुमारींच्या वर्गात स्वतःमध्ये, म्हणजे त्यांच्या भांड्यांमध्ये जरुरीचे आध्यात्मिक तेल नाही.

“त्या [मूर्ख कुमारी] [तेल] विकत घ्यावयास गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या, आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्‍याही कुमारी येऊन म्हणाल्याः ‘प्रभुजी, प्रभुजी, आम्हासाठी दार उघडा.’ त्याने उत्तर दिलेः ‘मी तुम्हास खचित सांगतो की, मी तुम्हास ओळखीत नाही.’ ”

ख्रिस्त त्याच्या स्वर्गीय राज्यात आल्यानंतर, खऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा, शहाण्या कुमारींचा वर्ग, परतलेल्या वराच्या स्तुतीसाठी या अंधःकारमय जगात उजाळा देण्याच्या आपल्या विशेषाधिकाराबद्दल जागृत होतो. परंतु मूर्ख कुमारींनी चित्रित केलेले लोक ही स्वागतपर स्तुती करण्याच्या तयारीत नाहीत. म्हणून ती वेळ आल्यावर ख्रिस्त स्वर्गातील लग्नाच्या मेजवानीचे दार त्यांच्यासाठी उघडत नाही. इतर सर्व कुकर्म्यांसह नाश पावण्यासाठी, तो त्यांना जगाच्या सर्वात मोठ्या रात्रीच्या अंधारात बाहेर राहू देतो. येशू समारोप करतोः “यास्तव, तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.”

रुपयांचा दाखला

दाखल्याच्या तीन मालिकेतील दुसरा दाखला सांगून जैतुनाच्या डोंगरावर येशू आपल्या शिष्यांबरोबर चर्चा पुढे चालवतो. थोड्याच दिवसापूर्वी तो यरीहोमध्ये असताना देवाचे राज्य भविष्यात अजून खूप दूर असल्याचे दाखवण्यासाठी त्याने मोहरांचा दाखला दिला होता. तो आता सांगत असलेल्या दाखल्यामध्ये त्यासारखीच अनेक वैशिष्ट्ये असली तरी त्याची पूर्णता होईल तेव्हा राज्य-सामर्थ्यासह ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्‍या कार्यांचे वर्णन त्यामध्ये आहे. पृथ्वीवर असेपर्यंत त्याच्या शिष्यांनी ‘त्याची मालमत्ता’ वाढवण्यासाठी काम केले पाहिजे, असे त्यात उदाहरणाने स्पष्ट दाखवले आहे.

येशू आरंभ करतोः “ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्‍या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली त्याप्रमाणे हे [म्हणजे, राज्याशी संबंधित परिस्थिती] आहे.” स्वर्गाला परदेशी जाण्यापूर्वी आपल्या दासांना—स्वर्गीय राज्यास पात्र असलेल्या शिष्यांना—आपली मालमत्ता सोपवून देणारा तो मनुष्य येशू होय. ही मालमत्ता म्हणजे भौतिक संपत्ती नव्हे तर अधिक शिष्य बनवण्याची क्षमता ज्यामध्ये त्याने तयारी केली आहे अशा मशागत केलेल्या शेताचे ते प्रतिक आहे.

स्वर्गारोहण करण्याच्या थोड्याच अलिकडे येशू त्याची मालमत्ता त्याच्या दासांवर सोपवतो. हे तो कसे करतो? त्या मशागत केलेल्या शेतात सतत काम करण्याची म्हणजेच जगाच्या दूरवरच्या भागापर्यंत राज्य-संदेशाचा प्रचार करण्याची सूचना देऊन, येशूने म्हटल्याप्रमाणेः “एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला.”

अशा रितीने ते आठ हजार रुपये—ख्रिस्ताची मालमत्ता—दासांच्या योग्यतेप्रमाणे वा आध्यात्मिक शक्यतेनुसार वाटलेले आहेत. ते दास म्हणजे शिष्यांचे वर्ग होत. पहिल्या शतकात पाच हजार रुपये मिळालेल्या वर्गात प्रेषित होते हे उघड आहे. येशू पुढे सांगतो की, राज्य प्रचाराने व शिष्य बनवण्याने पाच हजार व दोन हजार रुपये मिळालेल्या दोन्ही दासांनी त्यांची दुपटीने वाढ केली. परंतु एक हजार रुपये मिळालेल्या दासाने ते जमिनीत पुरुन लपवून ठेवले.

येशू पुढे म्हणतोः “मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला.” ख्रिस्त, जवळजवळ १,९०० वर्षांनी २० व्या शतकात हिशोब घेण्यासाठी परतला. तेव्हा तो खरोखरच “बराच काळ” होता. मग, पुढे येशू म्हणतोः

“तेव्हा ज्याला पाच हजार रुपये मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणालाः ‘महाराज, आपण माझ्यावर पाच हजार रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी पाच हजार मिळवले आहेत.’” त्याला त्याच्या धन्याने म्हटलेः “शाब्बास, भल्या व विश्‍वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्‍वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” दोन हजार रुपये मिळालेल्या दासानेही त्याप्रमाणेच आपले रुपये दुप्पट केले व त्यालाही तशीच शाबासकी व बक्षीस मिळाले.

परंतु हे दास त्यांच्या धन्याच्या आनंदात कसे सहभागी होतात? तो स्वर्गात परदेशी आपल्या पित्याकडे गेला तेव्हा राज्याचा ताबा मिळणे हा त्यांच्या धन्याचा, येशू ख्रिस्ताचा आनंद आहे. आधुनिक युगातील विश्‍वासू सेवकांना राज्याच्या अधिक जबाबदाऱ्‍या त्यांच्यावर सोपवल्या जाण्यात मोठा आनंद आहे. आणि त्यांचे पृथ्वीवरील वास्तव्य संपले की, स्वर्गीय राज्यात पुनरुत्थान मिळण्यात त्यांना अत्त्युच्च आनंद मिळेल. पण तिसऱ्‍या दासाचे काय?

हा दास तक्रार करतोः “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहा. म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते. पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत.” प्रचार करुन व शिष्य बनवून मशागत केलेल्या शेतात काम करण्याचे त्या दासाने हेतुपुरस्सर नाकारले. त्यामुळे तो धनी त्याला “दुष्ट व आळशी” म्हणतो व ही शिक्षा ठोठावतोः “ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या . . . आणि ह्‍या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे व दातखाणे चालेल.” या दुष्ट दासवर्गाला बाहेर टाकल्याने ते सर्व आध्यात्मिक आनंदापासून वंचित होतात.

ख्रिस्ताचे अनुयायी असल्याचा दावा करणाऱ्‍या सर्वांना यापासून एक गंभीर धडा मिळतो. त्यांना त्याच्या शाबासकी व बक्षीसाचा आनंद उपभोगावयाचा आहे आणि बाहेरील अंधारात टाकले जाणे टाळायचे आहे तर प्रचाराच्या कामात पूर्णपणे सहभागी होऊन आपल्या स्वर्गीय धन्याची मालमत्ता वाढविण्यासाठी त्यांनी काम केलेच पाहिजे. या बाबतीत तुम्ही कष्ट घेत आहात का?

ख्रिस्त राज्य-सामर्थ्यासह येतो तेव्हा

येशू अजून आपल्या प्रेषितांसह जैतुनाच्या डोंगरावर आहे. त्याची उपस्थिती व या व्यवस्थेच्या अंताच्या चिन्हाबद्दल त्यांनी केलेल्या विनंतीला उत्तर म्हणून तो आता तीन दाखल्यांच्या मालिकेतील शेवटचा दाखला सांगतो. तो म्हणतोः “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल.”

देवदूतांना त्यांच्या स्वर्गीय वैभवात माणसे पाहू शकत नाहीत. त्यामुळे मनुष्याच्या पुत्राचे, येशू ख्रिस्ताचे, देवदूतासह आगमन १९१४ मध्ये घडते. पण कोणत्या उद्देशासाठी? येशू खुलासा करतोः “त्याच्यापुढे सर्व रा जमविली जातील. आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील. आणि मेंढरांस तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे ठेवील.”

कृपेच्या बाजूला वेगळे केलेल्यांचे काय होईल याचे वर्णन करताना येशू म्हणतोः “तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांस म्हणेलः ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.” ह्‍या दाखल्यामधील मेंढरे ख्रिस्ताबरोबर स्वर्गात राज्य करणार नाहीत. पण त्याचे पृथ्वीवरील प्रजाजन होण्याच्या अर्थाने राज्याचे वतन मिळवतील. आदाम व हव्वेने प्रथम मुले निपजविली तेव्हा ‘जगाची स्थापना’ झाली. त्या मुलांना पापाच्या शिक्षेतून सोडवलेल्या मानवजातीसाठी देवाने केलेल्या तरतुदीचा फायदा मिळू शकेल.

पण मेंढरांना राजाच्या कृपेच्या हाताशी वेगळे का करण्यात आले? राजा उत्तर देतोः “कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला.”

ती मेंढरे पृथ्वीवर असल्यामुळे त्यांच्या स्वर्गीय राजासाठी त्यांनी ही सत्कर्मे कशी केली असतील हे त्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे. ती विचारतातः “प्रभुजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यावयास दिले? केव्हा परके पाहून घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? आणि तुम्हाला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो?”

राजा उत्तर देतोः “मी तुम्हास खचित सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्‍या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्याअर्थी ते मला केले आहे.” ख्रिस्ताबरोबर स्वर्गात राज्य करणाऱ्‍या १,४४,००० पैकी पृथ्वीवर उरलेले ख्रिस्ताचे भाऊ आहेत. आणि येशू म्हणतो की, त्यांचे भले करणे म्हणजे त्याचे भले करण्यासारखेच आहे.

मग, राजा शेरडांना म्हणतोः “अहो, शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्‍यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही.”

परंतु शेरडे तक्रार करतातः “प्रभुजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही?” ज्या आधारावर मेंढरांना अनुकूल न्याय दिला जातो त्याच आधारावर शेरडांना प्रतिकूल न्याय दिला जातो. येशू उत्तर देतोः “ज्या अर्थी तुम्ही ह्‍या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही.”

तेव्हा मोठ्या संकटामध्ये या दुष्ट व्यवस्थेचा अंत होण्याच्या जरा आधी राज्य-सामर्थ्यातील ख्रिस्ताच्या उपस्थितीचा काळ हा न्यायाचा समय असेल. शेरडे “सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील; आणि नीतीमान [मेंढरे] सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील.” मत्तय २४:२–२५:४६, १३:४०, ४९; मार्क १३:३-३७; लूक २१:७-३६; १९:४३, ४४; १७:२०-३०; २ तीमथ्य ३:१-५; योहान १०:१६; प्रकटीकरण १४:१-३.

▪ प्रेषितांनी प्रश्‍न विचारण्याचे कारण काय, पण त्यांच्या मनात आणखी काय आहे?

▪ इ. स. ७० मध्ये येशूच्या भविष्यवादाच्या कोणत्या भागाची पूर्णता होते, पण तेव्हा काय घडत नाही?

▪ येशूच्या भविष्यवादाची पहिली पूर्णता केव्हा होते, पण त्याची मोठी पूर्णता कधी होते?

▪ “अमंगळ पदार्थ” हा पहिल्या व शेवटल्या पूर्णतेमध्ये काय आहे?

▪ यरुशलेमाच्या नाशाच्या वेळी मोठ्या संकटाची शेवटची पूर्णता झाली आहे असे का म्हणता येत नाही?

▪ कोणती जागतिक परिस्थिती ख्रिस्ताच्या उपस्थितीचे लक्षण आहे?

▪ “पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक” केव्हा “शोक करतील,” पण ख्रिस्ताचे अनुयायी काय करीत असतील?

▪ अंत जवळ असल्याचे त्याच्या भावी शिष्यांच्या ध्यानात येण्यासाठी येशू कोणता दाखला देतो?

▪ शेवटल्या दिवसात राहात असलेल्या त्याच्या शिष्यांना येशू काय ताकीद देतो?

▪ दहा कुमारी कोणाचे प्रतिक आहेत?

▪ ख्रिस्ती मंडळीचे वराला कधी वाग्दान झाले, पण आपल्या वधूला लग्नाच्या मेजवानीला नेण्यासाठी वर कधी येतो?

▪ तेल कशाचे प्रतिक आहे व ते असल्याने शहाण्या कुमारींना काय करता येते?

▪ लग्नाची मेजवानी कोठे होते?

▪ मूर्ख कुमारी कोणत्या प्रतिफळाला मुकतात व त्यांना काय भोगावे लागते?

▪ रुपयांचा दृष्टांत कोणता धडा शिकवतो?

▪ दास कोण आहेत व त्यांना सोपवलेली मालमत्ता कोणती?

▪ हिशोब घेण्यासाठी धनी कधी येतो व त्याला काय दिसून येते?

▪ विश्‍वासू दास ज्यात सहभागी होतात तो आनंद कोणता आणि तिसऱ्‍या दुष्ट दासाचे काय होते?

▪ ख्रिस्ताची उपस्थिती अदृश्‍य का असली पाहिजे व त्या वेळेला तो कोणते काम करतो?

▪ मेंढरे कोणत्या अर्थाने राज्याचे वतन पावतात?

▪ ‘जगाची स्थापना’ कधी झाली?

▪ शेरडे व मेंढरे म्हणून कशाच्या आधारावर लोकांचा न्याय होतो?