व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

श्रीमंत मनुष्य व लाजर

श्रीमंत मनुष्य व लाजर

अध्याय ८८

श्रीमंत मनुष्य व लाजर

भौतिक धनाच्या योग्य वापराबद्दल येशू आपल्या शिष्यांबरोबर बोलत आहे. आपण एकाच वेळी त्याचे व देवाचे दास होऊ शकत नसल्याचा खुलासा तो करतो. परुशी देखील ते ऐकत आहेत, व त्यांना पैशाचा लोभ असल्यामुळे ते येशूला नाक मुरडू लागतात. या कारणामुळे तो त्यांना म्हणतोः “तुम्ही स्वतःस लोकांपुढे नीतीमान म्हणवून घेणारे आहा, परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.”

ऐहिक वस्तु, राजकीय सत्ता तसेच धार्मिक वर्चस्व व प्रभाव या बाबतीत श्रीमंत असलेल्या लोकांवर बाजू उलटविण्याची वेळ आली आहे. त्यांचे तोंड बंद करायचे आहे. पण आपली आध्यात्मिक गरज जाणणाऱ्‍या लोकांना आधार द्यायचा आहे. परुशांसोबत बोलताना येशू अशा बदलाकडे लक्ष वेधवतो. तो म्हणतोः

“[बाप्तिस्मा करणाऱ्‍या] योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते. तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे, आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण [ते मिळविण्याची धडपड] करतो. नियमशास्त्रातील एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे.”

मोशेचे नियमशास्त्र पाळण्याच्या त्यांच्या दाव्याचा, शास्त्री व परुशांना गर्व आहे. येशूने यरुशलेममध्ये चमत्काराने एका माणसाला दृष्टी दिली तेव्हा “आम्ही मोशेचे शिष्य आहो. देव मोशेबरोबर बोलला आहे हे आम्हाला ठाऊक आहे,” अशी बढाई त्यांनी मारली होती याची आठवण करा. पण आता, नम्र लोकांना देवाच्या नियुक्‍त राजापर्यंत मार्गदर्शन करण्याचा, मोशेच्या नियमशास्त्राचा निहित हेतु पूर्ण झाला आहे. यामुळेच, योहानाच्या सेवाकार्याच्या सुरवातीपासून सर्व प्रकारचे लोक, विशेषतः नम्र व गरीब, देवाच्या राज्याचे प्रजाजन होण्याचा निकराचा प्रयत्न करीत आहेत.

मोशेचे नियमशास्त्र आता पूर्ण होत असल्याने ते पाळण्याचे बंधन आता दूर करण्यात येणार आहे. नियमशास्त्र वेगवेगळ्या कारणासाठी घटस्फोटाला परवानगी देते. पण, आता येशू म्हणतोः “जो कोणी आपली बायको टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो व नवऱ्‍याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करतो तो व्यभिचार करतो.” विशेषतः परुशी अनेक कारणांसाठी घटस्फोटाला परवानगी देत असल्यामुळे अशा उद्‌गारांनी त्यांना किती क्षुब्ध केले असेल!

परुशांसोबत आपले बोलणे पुढे चालू ठेवून येशू एक दाखला सांगतो; ज्यात दोन माणसांचे स्थान किंवा परिस्थिती नाट्यमयरित्या बदलते. ती माणसे कोणाला चित्रित करतात व त्यांच्या परिस्थितीतील बदलाचा अर्थ काय हे तुम्हाला ठरवता येते का?

येशू सांगतोः “कोणीएक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या दरवाज्याजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरुन खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.”

येथे येशू परुशी व शास्त्रीच नव्हे तर सदुकी व मुख्य याजकासह यहुदी धार्मिक नेत्यांना चित्रित करण्यास, श्रीमंत माणसाचा उपयोग करतो. ते धार्मिक अधिकार व संधी याबाबतीत श्रीमंत असून त्या श्रीमंत माणसासारखे वागतात. त्यांचे शाही जांभळे कपडे, त्यांचे कृपापात्र स्थान चित्रित करतात व पांढरी वस्त्रे ते स्वतःला गणत असलेली नीतीमत्ता चित्रित करतात.

हा गर्विष्ठ श्रीमंत मनुष्यांचा वर्ग सर्वसाधारण गरीब लोकांकडे अत्यंत तुच्छतेने पाहतो. त्यांना ʽअम्‌ह․ʼआʹरेटस्‌ वा धरतीचे [मातीचे] लोक संबोधतो. अशा रितीने हे धार्मिक पुढारी ज्यांना यथायोग्य आध्यात्मिक पोषक अन्‍न व अधिकार नाकारतात, त्या लोकांना, दरिद्री लाजर चित्रित करतो. त्यामुळे फोडांनी भरलेल्या लाजराप्रमाणे, आध्यात्मिक रोगट व केवळ कुत्र्यांच्या सहवासास योग्य असे मानून सर्वसाधारण लोकांना तुच्छ लेखण्यात येते. पण लाजर वर्गाच्या लोकांना आध्यात्मिक पोषणाची भूक व तहान असल्यामुळे, श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून आध्यात्मिक अन्‍नाचे मिळतील ते अर्धे-मुर्धे तुकडे मिळण्याच्या इच्छेने ते दरवाजाजवळ आले आहेत.

आता येशू, श्रीमंत मनुष्य व लाजर यांच्या परिस्थितीतील बदलाचे वर्णन करतो. हे बदल कोणते व काय चित्रित करतात?

श्रीमंत मनुष्य व लाजर बदल अनुभवतात

तो श्रीमंत मनुष्य, अधिकार व संधी यांनी विशेष कृपापात्र धार्मिक नेत्यांना चित्रित करतो व लाजर, आध्यात्मिक पोषणाच्या भुकेल्या, सर्वसाधारण लोकांना चित्रित करतो. त्या माणसांच्या परिस्थितीतील नाट्यमय बदलाचे वर्णन करीत येशू पुढे गोष्ट सांगतो.

येशू म्हणतोः “पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला, आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्‍यांना दुरुन पाहिले.”

श्रीमंत मनुष्य व लाजर ही खरोखरची माणसे नसून लोकांच्या वेगवेगळ्या वर्गाची प्रतिके असल्यामुळे, तर्काने त्यांचा मृत्युही प्रतिकात्मक आहे. त्यांचा मृत्यु कशाचे प्रतिक आहे वा काय चित्रित करतो?

‘[बाप्तिस्मा करणाऱ्‍या] योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते; पण तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे,’ असे म्हणून परिस्थितीतील बदलाकडे येशूने नुकतेच लक्ष वेधले आहे. तेव्हा, योहान व येशू ख्रिस्ताच्या प्रचाराने, श्रीमंत माणूस व लाजर हे दोघे त्यांच्या आधीच्या परिस्थितीला मरतात.

नम्र व पश्‍चातापदग्ध लाजर वर्ग त्यांच्या पूर्वीच्या आध्यात्मिक नागवणूकीच्या परिस्थितीस मरतात व ईश्‍वरी कृपेच्या दर्जाला येतात. मागे आध्यात्मिक मेजावरून पडणाऱ्‍या तुकड्यांसाठी ते धार्मिक नेत्यांकडे डोळे लावून होते; तर आता येशू देत असलेल्या आध्यात्मिक सत्यांनी त्यांच्या गरजा पूर्ण होत आहेत. अशा रितीने ते, मोठा अब्राहाम, यहोवा देव, याच्या उराशी वा कृपेच्या स्थितीत आणले जातात.

उलटपक्षी, येशू शिकवत असलेल्या राज्याचा संदेश स्वीकारण्यास सतत नकार दिल्यामुळे श्रीमंत माणसाच्या वर्गात मोडणाऱ्‍या लोकांवर ईश्‍वरी अवकृपा होते. त्यामुळे कृपापात्र भासणाऱ्‍या त्यांच्या पूर्वीच्या स्थितीला ते मरतात. इतकेच नव्हे तर ते लाक्षणिक यातनात असल्याचे म्हटले जाते. श्रीमंत मनुष्य बोलतो ते आता ऐकाः

“हे बापा, अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठीव, ह्‍यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी. कारण ह्‍या जाळात मी क्लेश भोगीत आहे.” येशूच्या शिष्यांनी घोषित केलेले देवाच्या जळजळीत न्यायाचे संदेशच, श्रीमंत माणसाच्या वर्गाच्या व्यक्‍तींना यातना देत आहेत. शिष्यांनी हे संदेश देणे थांबवावे, व अशा रितीने त्यांच्या यातनातून त्यांना थोडा दिलासा द्यावा, अशी त्यांची इच्छा आहे.

पण, “अब्राहाम म्हणालाः ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्‍याची आठवण कर. आता ह्‍याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यांस जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे.’”

लाजर वर्ग व श्रीमंत मनुष्याचा वर्ग ह्‍यांच्यात असा नाट्यमय फेरबदल व्हावा हे किती न्याय्य व योग्य आहे! परिस्थितीतील हा बदल काही महिन्यानंतर, इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टला साध्य केला जातो. तेव्हा जुन्या नियमशास्त्राच्या कराराची जागा नव्या कराराने घेतली जाते. त्या वेळी निःसंदिग्धपणे स्पष्ट होते की, परुशी व इतर धार्मिक नेते नव्हे, तर शिष्य देवाच्या कृपेत आहेत. प्रतिकात्मक श्रीमंत माणसाला येशूच्या शिष्यांपासून वेगळे करणारा “मोठा दरा,” देवाच्या अचल, नीतीमान न्यायाला चित्रित करतो.

“बाप अब्राहामा”ला तो श्रीमंत माणूस मग विनंती करतोः “[लाजराला] माझ्या बापाच्या घरी पाठव.” अशा रितीने तो श्रीमंत माणूस कबूल करतो की, दुसऱ्‍या एका बापाशी जो प्रत्यक्ष दियाबल सैतान आहे, त्याचे अधिक जवळचे नाते आहे. त्याच्या “पाच भावां”ना, त्याच्या धार्मिक मित्रांना, “ह्‍या यातनेच्या स्थळी” टाकण्यात येऊ नये म्हणून लाजराने देवाचा संदेश मुळमुळीत करावा अशी विनवणी श्रीमंत माणूस करतो.

“पण अब्राहामाने त्याला म्हटलेः ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत. त्यांचे त्यांनी ऐकावे.” होय, त्या “पाच भावां”ना यातनातून सुटका हवी असल्यास, येशूची मशीहा म्हणून ओळख करून देणाऱ्‍या, मोशे व संदेष्ट्यांच्या लिखाणाकडे लक्ष द्यावे व मग त्याचे शिष्य व्हावे. पण श्रीमंत माणूस आक्षेप घेतोः “हे बापा, अब्राहामा, असे नाही. पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्‍चाताप करतील.”

परंतु त्याला सांगितले जातेः “ते मोशाचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.” लोकांची खात्री पटवण्यासाठी देव विशेष चिन्हे किंवा चमत्कार देणार नाही. त्याची कृपा प्राप्त करायची असल्यास त्यांनी शास्त्रलेख वाचले पाहिजे व आचरणात लागू केले पाहिजे. लूक १६:१४-३१; योहान ९:२८, २९; मत्तय १९:३-९; गलतीकर ३:२४; कलस्सैकर २:१४; योहान ८:४४.

▪ श्रीमंत माणूस व लाजर यांचे मृत्यु प्रतिकात्मक का असले पाहिजे व त्यांच्या मृत्युने काय चित्रित केले आहे?

▪ योहानाने सेवाकार्य सुरु केल्यापासून कोणता बदल घडतो असे येशू सूचित करतो?

▪ येशूच्या मृत्युनंतर काय काढून टाकण्यात येणार आहे व त्यामुळे घटस्फोटाच्या बाबतीत कसा परिणाम होईल?

▪ येशूच्या दाखल्यामध्ये श्रीमंत मनुष्य व लाजर यांनी कोणाला चित्रित केले आहे?

▪ श्रीमंत माणसाने सोसलेल्या यातना म्हणजे काय व कोणत्या मार्गाने त्यातून मुक्‍तता मिळावी अशी विनंती तो करतो?

▪ “मोठा दरा” कशाला चित्रित करतो?

▪ श्रीमंत माणसाचा खरा बाप कोण व त्याचे पाच भाऊ कोण?