व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वाधिक प्रसिद्ध असलेले प्रवचन

सर्वाधिक प्रसिद्ध असलेले प्रवचन

अध्याय ३५

सर्वाधिक प्रसिद्ध असलेले प्रवचन

डोंगर उतारावर बसलेला व आपले डोंगरावरील प्रसिद्ध प्रवचन देणारा येशू. पवित्र शास्त्र इतिहासातील सर्वात संस्मरणीय दृश्‍यांपैकी हे एक दृश्‍य आहे. ते ठिकाण गालील समुद्राजवळ बहुधा कफर्णहूमाजवळ आहे. संपूर्ण रात्र प्रार्थना करण्यात घालवल्यानंतर, प्रेषित बनण्यासाठी येशूने नुकतीच त्याच्या शिष्यांतील १२ जणांची निवड केली आहे. मग, त्या सर्वांसह तो उतरून डोंगराच्या सपाट भागावर येतो.

तुम्हाला वाटेल की, आतापर्यंत येशू अतिशय थकला असेल व त्याला झोपण्याची इच्छा आहे. पण मोठा जनसमुदाय आला आहे. त्यातील तर काही ९६ ते ११२ किलोमीटर्स दूरच्या यहूदीया व यरुशलेमाहून आले आहे. काही उत्तरेकडील सोर व सीदोनच्या समुद्र किनाऱ्‍याहून आलेले आहेत. ते येशूची शिकवण ऐकण्यासाठी व आपले आजार बरे करून घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्यामध्ये दुरात्म्यांनी, सैतानाच्या दुष्ट देवदूतांनी, पिडलेले लोकही आहेत.

येशू खाली येतो तसे आजारी लोक त्याला स्पर्श करावयास त्याच्याजवळ येतात व तो त्या सर्वांना बरे करतो. यानंतर येशू डोंगरावरच्या अधिक उंचवट्याच्या जागी चढतो. तेथे तो बसतो व त्याच्यासमोर पसरलेल्या मैदानावर बसलेल्या लोकांना शिकवू लागतो. विचार करा, तेथील सर्व श्रोत्यांपैकी एकाही माणसाला गंभीर आजार नाही!

चमत्कार करणाऱ्‍या शिक्षकाचे बोलणे ऐकायला लोक उत्सुक झाले आहेत. परंतु, बहुधा त्याच्या सर्वात निकट गोळा झालेल्या शिष्यांच्या फायद्यासाठी विशेषतः येशू प्रवचन देतो. आपल्यालाही त्याचा फायदा व्हावा म्हणून मत्तय व लूक या दोघांनी ते टिपून ठेवले आहे.

लूकच्या अहवालापेक्षा मत्तयाचा अहवाल चौपट मोठा आहे. मत्तयाच्या अहवालातले काही भाग, येशूने त्याच्या सेवाकार्यातील इतर प्रसंगी बोलले असल्याचे लूकने दाखवले आहे. मत्तय ६:९-१३ ची लूक ११:१-४ शी तसेच मत्तय ६:२५-३४ ची लूक १२:२२-३१शी तुलना केल्यास हे लक्षात येते. परंतु याचे आश्‍चर्य वाटू नये. येशूने त्याच गोष्टी एकापेक्षा अधिक वेळा शिकवल्या हे उघड आहे, आणि त्यातल्या काही शिकवणी लूकने दुसऱ्‍या प्रसंगाच्या संदर्भात नमूद करणे पसंत केले.

येशूचे प्रवचन फक्‍त त्यातील आध्यात्मिक गोष्टींच्या सखोलतेमुळे इतके बहुमोल झालेले नसून, ही सत्ये त्याने ज्या सरळतेने व स्पष्टतेने मांडली आहेत त्यामुळे झालेले आहे. तो सर्वसाधारण अनुभव व लोकांना परिचित गोष्टींचा वापर करतो व अशा रितीने देवाच्या मार्गामध्ये अधिक चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांना आपल्या कल्पना समजण्यास सोप्या करतो.

खरे धन्य कोण आहेत?

आपण धन्य व्हावे हे प्रत्येकाला हवे असते. हे ओळखून खऱ्‍या अर्थाने धन्यता प्राप्त करणाऱ्‍यांचे वर्णन करून, येशू, आपल्या डोंगरावरील प्रवचनाची सुरवात करतो. ही गोष्ट त्याच्या विशाल श्रोत्यांचे लक्ष आकर्षून घेते याची आपल्याला कल्पना येऊ शकते. तथापि, अनेकांना त्याच्या प्रस्तावनेचे शब्द विसंगत वाटतात.

आपल्या शिष्यांना उद्देशून बोलत येशू सुरवात करतोः “अहो दीनांनो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो, जे तुम्ही आता भुकेले आहा, ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो, जे तुम्ही आता रडता, ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही हसाल. . . . लोक तुमचा द्वेष करतील . . . तेव्हा तुम्ही धन्य . . . त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा. कारण पहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.”

येशूच्या प्रवचनाच्या प्रस्तावनेचा हा लूकने दिलेला अहवाल आहे. पण मत्तयाच्या अहवालानुसार येशू असेही म्हणतो की, सौम्य, दयाळू, अंतःकरणाचे शुद्ध व शांती करणारे ते धन्य आहेत. ते पृथ्वीचे वतन भोगतील, त्यांच्यावर दया होईल, ते देवाला पाहतील व त्यांना देवाची मुले म्हणतील असे येशू सांगतो.

परंतु धन्य असण्याचा येशूने केलेला अर्थ म्हणजे मजा करताना रंगेल असणे वा मौज वाटणे नव्हे. खरी धन्यता अधिक गाढ असून त्यात समाधान व जीवनातील यशाची भावना समाविष्ट असते.

या कारणामुळे, आपली आध्यात्मिक गरज ओळखणारे, आपल्या पापी स्थितीमुळे दुःखी झालेले व देवाला ओळखून त्याची सेवा करणारे लोक खरे धन्य असतात असे येशू दाखवतो. मग, देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी त्यांचा द्वेष किंवा छळ केला गेला तरी ते धन्यच राहतात, कारण आपण देवाला संतुष्ट करीत आहोत व त्याच्याकडून मिळणारे सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ आपल्याला मिळेल हे त्यांना माहीत असते.

परंतु आजच्या काही लोकांप्रमाणे येशूचे अनेक श्रोते समजतात की, धनवान असणे व सुखोपभोग घेण्याने माणूस धन्य किंवा आनंदी बनतो. येशूला माहीत आहे की, हे चूक आहे. त्याच्या अनेक श्रोत्यांना आश्‍चर्यचकित करणारी विरोधी गोष्ट सांगत तो म्हणतोः

“तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहा. अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहा त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हाला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यास असेच म्हणत असत”.

येशूच्या असे म्हणण्याचा अर्थ काय? संपत्ती बाळगणे, हसणे, सुखोपभागात बुडून जाणे व लोकांकडून मिळणारी वाहवा उपभोगणे यामुळे दुर्दशा का होते? ती अशा कारणाने की, या गोष्टी माणसाला मिळाल्या व तो त्यांना जतन करू लागला म्हणजे खरा आनंद वा धन्यता देणारी एकमेव गोष्ट—देवाची सेवा—त्याच्या जीवनातून वगळली जाते. पण याच वेळी येशूने हेही स्पष्ट केले की, गरीब, उपाशी आणि दुःखी असणे या गोष्टी माणसाला आनंदी करीत नाहीत. परंतु अनेकदा अशा प्रतिकूल स्थितीतील लोक येशूच्या शिकवणीला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे, व त्यामुळे त्यांना खरा आनंद मिळून ते धन्यता पावतात.

आपल्या शिष्यांना उद्देशून येशू पुढे म्हणतोः “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा.” ते शब्दशः मीठ आहेत असा त्याच्या म्हणण्याचा नक्कीच अर्थ नाही. तर मीठ न नासता टिकवून ठेवणारे आहे. यहोवाच्या मंदिरात वेदीपाशी त्याचा एक मोठा ढीग असे व अर्पणाला लावण्यासाठी याजक त्याचा वापर करीत.

येशूचे शिष्य “पृथ्वीचे मीठ” आहेत याचा अर्थ, त्यांच्यामुळे लोकांचे नाशापासून संरक्षण होते. खरोखर, त्यांच्या संदेशाला प्रतिसाद देणाऱ्‍या सर्वांचे जीवन सुरक्षित राहील! तो संदेश अशा लोकांच्या जीवनात शाश्‍वतता, निष्ठा व विश्‍वासूपणा आणील व कोठल्याही प्रकारच्या आध्यात्मिक व नैतिक ऱ्‍हासाला प्रतिबंध करील.

येशू आपल्या शिष्यांना सांगतोः “तुम्ही जगाचे प्रकाश आहा.” दिवा झाकून ठेवला जात नाही तर उंच ठिकाणी ठेवतात. यासाठीच येशू म्हणतोः “तसा तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या.” जाहीर साक्ष देऊन तसेच पवित्र शास्त्रातील तत्त्वांना अनुसरून केलेल्या आचरणाचे उत्तम उदाहरण घालून देऊन येशूचे शिष्य हे काम करतात.

शिष्यांसाठी नैतिकतेचा उच्च दर्जा

धार्मिक पुढारी येशूला, देवाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे मानतात व याकरता त्याला जिवे मारण्यासाठी त्यांनी अलिकडेच कट केला आहे. या कारणामुळे डोंगरावरील आपल्या प्रवचनात पुढे बोलताना येशू सांगतोः “नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलो आहे.”

देवाच्या नियमशास्त्राबद्दल येशूला प्रगाढ आदर आहे व तसा तो इतरांनी देखील दाखवावा म्हणून तो उत्तेजन देत आहे. वस्तुतः तो म्हणतोः “ह्‍यास्तव, जो कोणी या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील, त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील.” म्हणजेच अशी व्यक्‍ती देवाच्या राज्यात जाऊ शकणार नाही.

देवाच्या नियमांची पायमल्ली करणे तर दूरच राहो, ते मोडण्यामागील प्रवृत्तींचाही येशू निषेध करतोः “खून करू नको,” असे नियमशास्त्रात म्हटल्याचे नूमद करून येशू पुढे म्हणतोः “मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या भावावर राग धरून राहतो तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र आहे.”

आपल्या सोबत्यावर राग धरुन राहणे हे अतिशय गंभीर आहे, कदाचित त्यामुळे खून करण्यापर्यंतही मजल जाऊ शकते. शांती प्रस्थापित करण्यासाठी माणसाने कोठवर प्रयत्न करावे याचे उदाहरण येशू देतो. तो शिकवतोः “तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तेथे तुला स्मरण झाले तर, तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव, आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.”

दहा आज्ञातील सातवीकडे लक्ष वेधून येशू पुढे म्हणतोः “व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे.” परंतु व्यभिचाराकडे नेणाऱ्‍या प्रवृत्तींचा निषेध करून येशू म्हणतोः “मी तर तुम्हाला सांगतो की, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो, त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.”

येथे येशू एखाद्या क्षणिक अनैतिक विचाराबद्दल बोलत नसून “पाहात राहाण्या”बद्दल बोलत आहे. असे सतत पाहात राहिल्याने कामुक इच्छा उत्पन्‍न होते व संधी मिळाल्यास तिचे व्यभिचारात पर्यवसान होऊ शकते. एखादी व्यक्‍ती असे घडण्याला आळा कशी घालू शकते? अतिशय कडक उपायांची गरज पडण्याच्या शक्यतेबद्दल उदाहरण देत येशू म्हणतोः “तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे . . . तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे.”

आपले जीवन वाचवण्यासाठी अनेकदा लोक एखादा खरा रोगग्रस्त अवयव काढून टाकण्यास तयार असतात. पण येशूच्या म्हणण्याप्रमाणे अनैतिक आचार-विचाराला टाळण्यासाठी काहीही—अगदी डोळा वा हाताइतकी अनमोल गोष्टही—‘टाकून देणे’ अत्यावश्‍यक आहे. येशू सांगतो की, असे न केल्यास अशा व्यक्‍ती, सर्वनाशाचे प्रतिक असलेल्या गेहेन्‍नामध्ये (यरुशलेमाजवळची जळत्या कचऱ्‍याची दरी) टाकल्या जातील.

इजा व अपमान करणाऱ्‍या लोकांशी कसे वागावे याचीही चर्चा येशू करतो. त्याचा सल्ला आहे: “दुष्टाला अडवू नको. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर.” हल्ला झाल्यास स्वतःचा वा आपल्या कुटुंबाचा बचाव करू नये असे येशूचे म्हणणे नाही. थप्पड ही शारीरिक इजा करण्यासाठी नव्हे तर अपमान करण्यासाठी मारली जाते. यास्तव, येशूच्या म्हणण्याचा अर्थ असा की, एखाद्याने भांडण करण्याच्या वा वाद घालण्याच्या उद्देशाने अक्षरशः हाताने थापड मारली वा बोचरे अपमानकारक शब्द उच्चारले तर जशास तसे वागणे चुकीचे होईल.

शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याच्या देवाच्या नियमाकडे लक्ष वेधल्यावर येशू म्हणतोः “मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्‍यावर प्रीती करा, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” असे करण्यामागील बळकट कारण देताना तो सांगतो: “अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र असल्याचे सिद्ध करावे. कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो व नीतीमानांवर व अनीतीमानांवर पाऊस पाडतो.”

प्रवचनाच्या या भागाचा शेवट करताना तो ताकीद देतोः “जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.” पूर्णार्थाने लोक सिद्ध होऊ शकतात असा येशूच्या म्हणण्याचा अर्थ नाही. तर, देवाचे अनुकरण करून त्यांना आपले प्रेम इतके विकसित करणे शक्य आहे की, त्यात त्यांचे वैरीही सामावले जावे. लूकच्या अहवालात येशूचे पुढील शब्द नमूद केले आहेतः “जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.”

प्रार्थना व देवावर भाव

आपल्या प्रवचनामध्ये पुढे बोलताना, स्वतःच्या काल्पनिक चांगुलपणाचा देखावा करणाऱ्‍या लोकांच्या ढोंगीपणाचा येशू धिक्कार करतो. तो म्हणतोः “तू दानधर्म करतोस तेव्हा . . . ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नको.”

येशू पुढे म्हणतोः “तसेच, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका. कारण लोकांनी आपणास पहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांस आवडते.” याऊलट, तो शिकवतोः “तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर.” येशूने स्वतः जाहीररित्या प्रार्थना केल्या. तेव्हा तो त्यांचा धिक्कार करीत नसून श्रोत्यांवर आपली छाप टाकण्यासाठी व त्यांच्याकडून स्तुतीपर अभिनंदने घेण्यासाठी केलेल्या प्रार्थनांचा धिक्कार करीत आहे.

येशू पुढे सल्ला देतोः “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखे तेच ते पुनःपुन्हा बोलू नका.” पुनरावृत्ती मूळातच चूक आहे असा येशूच्या म्हणण्याचा अर्थ नाही. एकदा येशूने स्वतः प्रार्थना करताना पुनःपुन्हा “तेच शब्द” वापरले होते. परंतु विचार न करता प्रार्थनांचा पुनरुच्चार करताना जपमाळ ओढणाऱ्‍यांसारखे, पाठ केलेले शब्द “पुनःपुन्हा” म्हणण्याबद्दल तो नापसंती व्यक्‍त करतो.

प्रार्थना करण्यास त्याच्या श्रोत्यांना मदत व्हावी म्हणून येशू, सात विनंत्यांचा समावेश असलेली एक आदर्श प्रार्थना शिकवतो. त्यातील पहिल्या तीन अगदी रास्तपणे देवाचे सार्वभौमत्व व त्याचे उद्देश यांना मान्यता देतात. देवाचे नाव पवित्र व्हावे, त्याचे राज्य यावे व त्याच्या इच्छेप्रमाणे व्हावे यासाठी त्या विनंत्या आहेत. उरलेल्या चार विनंत्या वैयक्‍तीक आहेत, म्हणजे दैनिक आहारासाठी, पापांच्या क्षमेसाठी, स्वतःच्या सहनशक्‍तीपलिकडे परीक्षा न होण्यासाठी व सैतानापासून वाचवण्यासाठी.

पुढे जाऊन भौतिक गोष्टींवर अवास्तव भिस्त ठेवण्याच्या पाशाबद्दल येशू बोलतो. तो आग्रह करतोः “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात, आणि चोर घर फोडून चोरी करतात.” अशी संपत्ती फक्‍त नाशवानच नसून त्यामुळे देवापाशी आपली पतही वाढत नाही.

यासाठी येशू म्हणतोः “तर, स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा.” तुमच्या जीवनात देवाच्या सेवेला प्रथमस्थान देऊन हे केले जाते. अशा रितीने देवाकडे साठवण्यात आलेले पुण्य वा त्याचे मोठे प्रतिफळ कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मग येशू म्हणतोः “जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल.”

भौतिकवादाच्या पाशाविषयी पुढे बोलताना येशू पुढील उदाहरण देतोः “डोळा शरीराचा दिवा आहे. ह्‍यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधःकारमय होईल.” योग्य रितीने काम करणारा डोळा शरीराला, अंधाऱ्‍या जागी लावलेल्या दिव्यासारखा आहे. परंतु बरोबर पाहण्यासाठी डोळा साधा असला पाहिजे, म्हणजे त्याने एका गोष्टीवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. लक्ष केंद्रित न केलेल्या डोळ्यांमुळे गोष्टींचा विपर्यास होतो, जसे देवाच्या सेवेपेक्षा भौतिक ध्येयांना प्राधान्य दिले जाते. परिणाम, “सर्व शरीर” अंधःकारमय होते.

एक प्रभावशाली उदाहरण देऊन येशू या प्रकरणाचा उच्च बिंदू गाठतो. तो म्हणतोः “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्‍यावर प्रीती करील अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची व धनाची चाकरी करू शकत नाही.”

हा सल्ला दिल्यावर, लोकांनी देवाच्या सेवेला प्रथम स्थान दिल्यास त्यांच्या भौतिक गरजांसाठी त्यांना काळजी करण्याची गरज नसल्याबद्दल येशू आपल्या श्रोत्यांना हमी देतो. तो म्हणतोः “आकाशातील पाखरे निरखून पाहा. ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवत नाहीत. तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो.” मग तो विचारतोः “तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही?”

मग, येशू रानातील फुलांकडे निर्देश करतो व सांगतो की, “शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात यातल्या एकासारखा सजला नव्हता.” तो पुढे म्हणतो, रानातल्या गवताला “जर देव असा पोषाख घालतो तर, अहो तुम्ही अल्पविश्‍वासी, तो विशेषेकरुन तुम्हाला पोषाख घालणार नाही काय?” म्हणून येशू शेवटी म्हणतोः “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका. . . . तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतीमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”

जीवनाकडे जाणारा मार्ग

येशूच्या शिकवणींना धरून राहणे हा जीवनाकडे जाणारा मार्ग आहे. पण हे करणे सोपे नाही. उदाहरणार्थ, इतरांबद्दल कठोर टीका करण्याचा परुशांचा कल असतो व अनेक जण त्यांचे अनुकरण करणे शक्य आहे. म्हणून डोंगरावरील प्रवचनात येशू अशी ताकीद देतोः “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्याप्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील.”

फाजील टिका करणाऱ्‍या परुशांचे अनुकरण करणे धोक्याचे आहे. लूकच्या अहवालानुसार या धोक्याचे उदाहरण देताना येशू म्हणतोः “आंधळाच अंधळ्याला वाट दाखवू शकतो का? दोघेही खाचेत पडतील की नाही?”

इतरांवर अतिशय टिका करणे, त्यांचे दोष मोठे करून सांगणे, त्यांचा सतत उल्लेख करणे हा गंभीर गुन्हा आहे. म्हणून येशू विचारतोः “तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, ‘भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे’? अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.”

याचा अर्थ असा नव्हे की, येशूच्या शिष्यांनी इतर लोकांबद्दल तारतम्य बाळगू नये. कारण तो म्हणतो: “जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोत्ये डुकरांपुढे टाकू नका.” देवाच्या वचनातली सत्ये पवित्र आहेत. लाक्षणिक अर्थाने ती मोत्यांसारखी आहेत. परंतु कुत्र्यासारख्या वा डुकरासारख्या व्यक्‍ती या बहुमोल सत्यांची कदर करीत नसल्यास येशूच्या शिष्यांनी अशांना सोडून गुणग्राहक लोकांचा शोध घ्यावा.

डोंगरावरल्या आपल्या प्रवचनात या आधी प्रार्थनेची चर्चा केली असली तरी, आता तो त्यातील चिकाटीवर भर देत आहे. “मागत राहा म्हणजे तुम्हास दिले जाईल.” असे तो आवर्जून सांगतो. प्रार्थनेला उत्तर देण्याची देवाची तत्परता उदाहरणासहित दाखवण्यासाठी तो म्हणतो: “आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल . . . असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग, तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल?”

यानंतर, सामान्यपणे सुवर्ण-नियम म्हटला जाणारा आता प्रख्यात झालेला नियम सांगतो. तो म्हणतो: “ह्‍याकरता, लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” या नियमानुसार जगण्यात म्हणजेच इतरांनी आपल्याशी जसा व्यवहार करावा असे वाटते तसाच आपण त्यांच्याशी करण्यात, दुसऱ्‍यांचे भले करताना विधायक कृती गोवलेली आहे.

जीवनाकडे जाणारा मार्ग सोपा नव्हे हे येशूच्या सूचनांवरून स्पष्ट होतेः “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे; आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.”

येशू इशारा देतो की, फसण्याचा धोका मोठा आहेः “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात. पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.” जशी चांगली व वाईट झाडे त्यांच्या फळांवरून ओळखता येतात, तसे खोटे संदेष्टे त्यांच्या वाईट वर्तणूक व शिकवणींवरून ओळखता येतात असे येशू सांगतो.

पुढे जाता, येशू स्पष्ट करतो की, कोणी व्यक्‍ती फक्‍त आपल्या उक्‍तीनेच नव्हे तर कृतीने त्याचा शिष्य बनतो. येशू आपला प्रभू, असल्याचा दावा काही लोक करतात. परंतु ते येशूच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागत नसल्यास, तो म्हणतोः “मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो, अनाचार करणाऱ्‍यांनो, मजपुढून निघून जा.”

शेवटी येशू आपल्या प्रवचनाचा संस्मरणीय समारोप करतो. तो म्हणतोः “जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो एका सूज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही. कारण त्याचा पाया खडकावर घातला होता.”

याउलट, येशू म्हणतोः “जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला. तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.”

येशू प्रवचन संपवतो तेव्हा त्याच्या शिकवण्याच्या रितीने जनसमुदाय थक्क होतो. कारण तो त्यांना त्यांच्या धार्मिक पुढाऱ्‍यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवतो. लूक ६:१२-२३; मत्तय ५:१-१२; लूक ६:२४-२६; मत्तय ५:१३-४८; ६:१-३४; २६:३६-४५; ७:१-२९; लूक ६:२७-४९.

▪ येशू त्याचे सर्वाधिक प्रसिद्ध असणारे प्रवचन देताना कोठे असतो, तेथे कोण उपस्थित असतात व प्रवचन देण्याच्या नुकतेच आधी काय घडले आहे?

▪ या प्रवचनातील काही शिकवणी लूक इतर पार्श्‍वभूमीवर नमूद करतो यात आश्‍चर्य का नाही?

▪ येशूचे प्रवचन कशाने बहुमोल बनते?

▪ खऱ्‍या अर्थाने कोण धन्य आहेत व का?

▪ कोणाची दुर्दशा होणार व का?

▪ येशूचे शिष्य “पृथ्वीचे मीठ” व “जगाचा प्रकाश” कसे आहेत?

▪ येशू देवाच्या नियमशास्त्राला गाढ आदर कसा दाखवतो?

▪ खून व व्यभिचाराचे मूळ कारण नाहीसे करण्यासाठी येशू काय सूचना देतो?

▪ दुसरा गाल पुढे करण्याबद्दल सांगताना येशूचा कोणता अर्थ अभिप्रेत होता?

▪ देव पूर्ण आहे तसे आपणही कसे होऊ शकतो?

▪ येशू प्रार्थनेबद्दल काय सूचना देतो?

▪ स्वर्गीय संपत्ती श्रेष्ठ का आहे व ती कशी मिळवता येते?

▪ भौतिकवाद टाळण्यात मदत म्हणून कोणती उदाहरणे दिली आहेत?

▪ चिंता करण्याचे कारण नाही असे येशू का म्हणतो?

▪ इतरांवर टिका करण्याबाबत येशू काय म्हणतो; आणि तरीही, लोकांबाबत त्याच्या शिष्यांनी तारतम्य राखण्याची गरज असल्याचे तो कसे दाखवतो?

▪ प्रार्थनेबद्दल येशू आणखी काय म्हणतो व वागणुकीबाबत तो कोणता नियम देतो?

▪ जीवनाकडे जाणारा मार्ग सोपा नसेल व त्यात फसवले जाण्याचा धोका असल्याचे येशू कसे दाखवतो?

▪ येशू त्याच्या प्रवचनाचा समारोप कसा करतो, व त्याचा परिणाम काय होतो?