व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सातव्या दिवशी अधिक शिक्षण देणे

सातव्या दिवशी अधिक शिक्षण देणे

अध्याय ६८

सातव्या दिवशी अधिक शिक्षण देणे

मंडपांच्या सणाचा शेवटला, सातवा, दिवस अजून चालू आहे. “जामदारखाना” म्हटल्या गेलेल्या मंदिराच्या भागात येशू शिकवत आहे. स्त्रियांच्या आवारात हा भाग असावा असे दिसते. लोक अर्पणे टाकत असत त्या पेट्या येथे आहेत.

मंदिराच्या या भागात, सणामध्ये प्रत्येक रात्री दिव्यांचे विशेष प्रदर्शन असते. येथे चार प्रचंड दीपमाळा ठेवलेल्या असून प्रत्येक दीपमाळेला तेल भरलेली चार मोठी भांडी आहेत. १६ भांड्यातून तेल जाळणाऱ्‍या या दिव्यांचा प्रकाश रात्रीच्या आसमंतात दूरवर उजेड देण्याइतका प्रखर आहे. येशूचे पुढील शब्द त्याच्या श्रोत्यांना या प्रदर्शनाची आठवण करून देत असतील. येशू म्हणतोः “मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”

याबद्दल परुशी आक्षेप घेतातः “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.”

उत्तरादाखल येशू म्हणतोः “मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे. कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे. मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हास ठाऊक नाही.” तो पुढे म्हणतोः “मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले तोही माझ्याविषयी साक्ष देतो.”

“तुमचा पिता कोठे आहे?” परुशी विचारतात.

“तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही,” येशू उत्तर देतो. “तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” येशूला धरून नेण्याची परुशांची अजूनही इच्छा असते तरी कोणी त्याला स्पर्श करीत नाही.

येशू पुन्हा म्हणतोः “मी निघून जातो . . . मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”

यामुळे यहुदी विचारात पडतात. त्यांना वाटतेः “‘मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही,’ असे हा म्हणतो; यावरुन हा आत्महत्त्या तर करणार नाही?”

येशू खुलासा करतोः “तुम्ही खालचे आहा, मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहा, मी ह्‍या जगाचा नाही.” मग, तो पुढे म्हणतोः “मी तो [संदेष्टा] आहे असा विश्‍वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.”

येशू अर्थातच, त्याच्या मानवी प्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वाबद्दल व तो वचनयुक्‍त मशीहा किंवा ख्रिस्त असल्याबद्दल बोलत आहे. तरीही, लोक मोठ्या तिरस्काराने विचारतातः “तुम्ही कोण आहात?”

त्यांनी अव्हेर केला असता येशू उत्तर देतोः “तुमच्याशी मी बोलावे तरी कशाला?” तरी पुढे तो म्हणतोः “ज्याने मला पाठवले तो खरा आहे, आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगास सांगतो. जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे. आणि मी आपण होऊन काही करीत नाही तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्‍या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो.”

येशू असे म्हणतो तेव्हा कित्येक त्याच्यावर विश्‍वास ठेवतात. त्यांना तो म्हणतोः “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला स्वतंत्र करील.”

त्याचे विरोधक मध्येच म्हणतातः “आम्ही अब्राहामाचे वंशज आहो व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर ‘तुम्ही स्वतंत्र व्हाल’ असे तुम्ही कसे म्हणता?”

यहुदी अनेकदा परक्या लोकांच्या अमलाखाली राहिले असले तरी कोणताही जुलूमशहा आपला धनी असल्याचे ते मान्य करीत नाहीत. दास म्हणवून घ्यायला ते नकार देतात. पण येशू त्यांच्या ध्यानात आणून देतो की, ते खरोखरचे दास आहेत. ते कसे? तो म्हणतोः “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे.”

पापातील आपल्या दास्यत्वाचा नकार करणे यहुद्यांना बिकट परिस्थितीत टाकते. येशू खुलासा करतोः “दास घरात सर्वदा राहात नाहीत, पुत्र सर्वदा राहतो.” दासाला वारसा हक्क नसल्याने कोणत्याही वेळी काढून टाकला जाण्याचा त्याला धोका असतो. फक्‍त त्या घराण्यात प्रत्यक्ष जन्मलेला किंवा दत्तक घेतलेला पुत्र “सर्वदा” म्हणजे तो जिवंत असेपर्यंत राहतो.

येशू पुढे म्हणतोः “म्हणून जर पुत्र तुम्हाला स्वतंत्र करील तर तुम्ही खरेखुरे स्वतंत्र व्हाल.” अशा रितीने लोकांना बंधमुक्‍त करणारे सत्य हे पुत्राबद्दलचे, येशू ख्रिस्ताबद्दलचे सत्य होय. केवळ त्याच्या परिपूर्ण जीवनाच्या बलिदानानेच मृत्युदायक पापापासून कोणाचीही सुटका होते. योहान ८:१२-३६.

▪ सातव्या दिवशी येशू कोठे शिकवतो? तेथे रात्री काय होते व त्याचा येशूच्या शिकवणीशी काय संबंध आहे?

▪ येशू आपल्या उत्पत्तीबद्दल काय म्हणतो व तो आपली ओळख कशी स्पष्ट करतो?

▪ यहुदी कोणत्या प्रकारे दास आहेत, पण कोणते सत्य त्यांना स्वतंत्र करील?