व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुधारण्यासाठी अधिक सल्ला

सुधारण्यासाठी अधिक सल्ला

अध्याय ६३

सुधारण्यासाठी अधिक सल्ला

येशू व त्याचे शिष्य कफर्णहूमातील घरात असताना, सर्वात मोठा कोण याबद्दलच्या शिष्यांच्या वादाव्यतिरिक्‍त इतर गोष्टींचीही चर्चा होते. ही घटना देखील, ते कफर्णहूमला परतल्यावर, येशू स्वतः उपस्थित नसताना, घडली असेल. प्रेषित योहान सांगतोः “कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिले. तेव्हा आम्ही त्याला मनाई केली. कारण तो आमच्याबरोबर तुम्हाला अनुसरत नाही.”

प्रेषित म्हणजे खास, अधिकारयुक्‍त रोग बरे करणाऱ्‍यांचा गट आहे असा योहानाचा दृष्टीकोण असल्याचे उघड आहे. या कारणामुळे तो माणूस त्यांच्यातील नसल्यामुळे तो ती प्रबळ कृत्ये अयोग्यपणे करीत होता असे योहानाला वाटते.

परंतु येशू सल्ला देतोः “त्याला मना करू नका. कारण जो माझ्या नावाने महत्त्कृत्ये करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हास पेलाभर पाणी प्यावयास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही, हे मी तुम्हास खचित सांगतो.”

येशूला अनुकूल असण्यासाठी त्या माणसाने शरीराने येशूमागे जाण्याची गरज नव्हती. ख्रिस्ती मंडळी अजून स्थापन करण्यात आली नसल्याने तो त्यांच्या गटात नाही म्हणजे तो वेगळी मंडळी आहे असा त्याचा अर्थ होत नव्हता. त्या माणसाचा येशूच्या नावावर खरोखरच विश्‍वास होता व म्हणून भूते काढण्यात तो यशस्वी झाला. प्रतिफळ मिळण्याच्या पात्रतेबद्दल येशू जे बोलला तसेच तो माणूस करीत होता. हे करण्यामुळे येशूने दाखविले त्याप्रमाणे तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नव्हता.

परंतु प्रेषितांच्या शब्दाने वा कृतीने तो अडखळल्यास कसे? ते अतिशय गंभीर होईल! येशू म्हणतोः “विश्‍वास ठेवणाऱ्‍या ह्‍या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे.”

येशू म्हणतो की, हात, पाय, वा डोळा अशासारखी प्रिय गोष्ट अडखळायला लावीत असल्यास, शिष्यांनी ती आपल्या जीवनातून काढूनच टाकावी. त्यांना धरून राहून, सार्वकालिक नाशाचे प्रतीक असलेल्या गेहेन्‍नात (हा यरुशलेमाजवळचा कचऱ्‍याचा तळ होता) पडण्यापेक्षा या प्रिय गोष्टीविना असावे व देवाच्या राज्यात प्रवेश करावा हे बरे.

येशू असाही इशारा देतो की, “सांभाळा, ह्‍या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका. कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.” मग, ज्याच्याजवळ शंभर मेंढ्या असून त्यातील एक हरवली असलेल्या माणसाबद्दल उदाहरण देऊन तो त्यांना या “लहानां”चे महत्त्व सांगतो. येशू खुलासा करतो की, हरवलेली एक मेंढी शोधण्यासाठी तो माणूस इतर ९९ मेंढ्यांना सोडून जातो व ती सापडल्यावर त्या ९९ पेक्षा तिच्याबद्दल त्याला अधिक आनंद होतो. मग, येशू समारोप करतोः “ह्‍या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.”

कदाचित, त्याच्या प्रेषितांमधील आपसातला वाद लक्षात असल्याने येशू आग्रह करतोः “तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या व एकमेकांबरोबर शांतीने राहा.” बेचव अन्‍नाला मिठाने रुचकर केले जाते. तसेच लाक्षणिक मिठाने एखाद्याचे बोल स्वीकारणे सोपे जाते. असे मीठ असल्यास त्यामुळे शांती टिकण्यास मदत होईल.

परंतु मानवी असिद्धतेमुळे कधीकधी गंभीर वादविवाद होतील. ते हाताळण्यासाठीही येशू मार्गदर्शक तत्त्वे देतो. येशू म्हणतोः “तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास असे होईल.” त्याने न ऐकल्यास, येशू सल्ला देतोः “तू आणखी एका-दोघांस आपणाबरोबर घे. अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा.”

फक्‍त शेवटचा उपाय म्हणून येशू म्हणतो की, ती गोष्ट “मंडळी”कडे म्हणजे न्याय करून निर्णय देऊ शकणाऱ्‍या मंडळीतील जबाबदार देखरेख्यांकडे न्यावी. येशू शेवट करतो की, जर गुन्हेगाराने त्यांचा निर्णय मानला नाही तर “तो तुला परराष्ट्रीयांसारखा किंवा जकातदार ह्‍यांच्यासारखा होवो.”

असा निर्णय करताना देखरेख्यांनी यहोवाच्या वचनातील सूचना बारकाईने पाळण्याची गरज असते. अशा रितीने एखादी व्यक्‍ती गुन्हेगार असल्याचे व शिक्षेस पात्र असल्याचे दिसून येते तेव्हा तो निर्णय ‘स्वर्गात आधीच बांधला गेला असेल.’ आणि ते “पृथ्वीवर मोकळे” करतात म्हणजे एखाद्याला निर्दोष जाणतात तेव्हा ते आधीच “स्वर्गात मोकळे” केलेले असेल. अशा न्यायासंबंधी उहापोहात, येशू म्हणतोः “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.” मत्तय १८:६-२०; मार्क ९:३८-५०; लूक ९:४९, ५०

▪ येशूच्या काळात त्याच्याबरोबर सोबत केलीच पाहिजे हे जरुरीचे का नव्हते?

▪ लहानांना अडखळवणे किती गंभीर आहे व अशा लहानांचे महत्त्व येशूने कसे स्पष्ट केले?

▪ प्रेषितांना स्वतःमध्ये मीठ ठेवण्यास येशू कदाचित कोणत्या कारणाने उत्तेजन देतो?

▪ ‘बांधणे’ व ‘सोडणे’ यांचा काय अर्थ आहे?