व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्मारकविधीचे भोजन

स्मारकविधीचे भोजन

अध्याय ११४

स्मारकविधीचे भोजन

येशूने त्याच्या प्रेषितांचे पाय धुतल्यानंतर स्तोत्रसंहिता ४१:९ येथील शास्त्रवचनाचा उल्लेख करून तो म्हणतोः “ज्याने माझे अन्‍न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे.” मग, आत्म्यात व्याकुळ होऊन तो म्हणतोः “तुम्हापैकी एकजण मला धरून देईल.”

प्रेषित खिन्‍न होऊ लागतात व एकामागे एक त्याला विचारू लागतातः “मी तर नाही ना?” असे विचारण्यात यहूदा इस्कर्योतही सामील होतो. येशूच्या शेजारी बसलेला योहान येशूच्या उरावर मागे लवतो व विचारतोः “प्रभुजी, तो कोण आहे?”

येशू उत्तर देतोः “बारा जणांपैकी एक जण, म्हणजे जो माझ्याबरोबर ताटात हात घालीत आहे तोच. मनुष्याचा पुत्र तर त्याच्याविषयी शास्त्रात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे जातो खरा, परंतु ज्या माणसाच्या हातून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो त्याची केवढी दुर्दशा होणार! तो माणूस जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.” त्यानंतर, यहूदाच्या दुष्ट बनलेल्या हृदयातील खिंडाराचा फायदा घेऊन सैतान पुन्हा त्याच्यामध्ये प्रवेश करतो. त्या रात्री पुढे येशू उचितपणे यहूदाला ‘नाशाचा पुत्र’ म्हणतो.

आता येशू यहूदाला सांगतोः “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.” प्रेषितातील बाकी कोणाला येशूच्या बोलण्याचा अर्थ कळत नाही. यहूदाजवळ पैशाची पेटी असल्याने “सणासाठी आपणास ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घे” (पंडिता रमाबाई भाषांतर) किंवा त्याने जाऊन गरीबांना काही द्यावे असे येशू त्याला सांगत आहे अशी काहींची कल्पना होते.

यहूदा गेल्यावर येशू आपल्या विश्‍वासू प्रेषितांसह एका अगदी नव्या समारंभाची वा स्मारकाची सुरवात करतो. तो एक भाकरी घेतो, उपकारस्तुती करतो, ती मोडतो व “घ्या, खा” असे म्हणत ती त्यांना देतो. तो सांगतोः “हे माझे शरीर आहे. ते तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”

प्रत्येकाने ती भाकरी खाल्ल्यावर येशू द्राक्षारसाचा एक प्याला घेतो. तो वल्हांडण सण साजरा करण्यामध्ये वापरण्यात येणारा चौथा प्याला असल्याचे उघड आहे. तो त्याबद्दलही उपकारस्मरण करून त्यांना देतो, त्यातून पिण्यास त्यांना सांगतो व म्हणतोः “हा प्याला माझ्या रक्‍तात नवा करार आहे. ते रक्‍त तुमच्यासाठी ओतिले जात आहे.”

तेव्हा, वास्तविक, हे येशूच्या मृत्युचे स्मरण आहे. येशू म्हणतो त्याप्रमाणे निसान १४ ला त्याच्या स्मरणार्थ त्याची पुनरावृत्ती करायची आहे. यामुळे मृत्युच्या शिक्षेपासून मानवजातीला सुटका देण्यासाठी येशू व त्याच्या स्वर्गीय पित्याने केलेल्या गोष्टींची आठवण ते साजरा करणाऱ्‍यांना होईल. ख्रिस्ताचे अनुयायी झालेल्या यहुद्यांसाठी हा समारंभ वल्हांडण सणाची जागा घेईल.

येशूच्या सांडलेल्या रक्‍तामुळे अंमलात येणारा नवा करार जुन्या नियमशास्त्राच्या कराराची जागा घेतो. एका बाजूला यहोवा देव आणि दुसऱ्‍या बाजूला १,४४,००० आत्म्यात जन्मलेले ख्रिस्तीजन अशा दोघात त्यासाठी येशू मध्यस्ती करतो. पापांची क्षमा देण्याव्यतिरिक्‍त त्या कराराद्वारे शाही याजकांचे एक स्वर्गीय राष्ट्र बनू शकते. मत्तय २६:२१-२९; मार्क १४:१८-२५; लूक २२:१९-२३; योहान १३:१८-३०; १७:१२; १ करिंथकर ५:७.

▪ एका सहकाऱ्‍याबद्दल येशू पवित्र शास्त्रातील कोणत्या भविष्यवादाचा उल्लेख करतो व तो ते कसे लागू करतो?

▪ प्रेषित अतिशय खिन्‍न का होतात व त्यांच्यातील प्रत्येकजण काय विचारतो?

▪ येशू यहूदाला काय करण्यास सांगतो पण इतर प्रेषित त्या सूचनांचा कसा अर्थ लावतात?

▪ यहूदा निघून गेल्यावर येशू कोणत्या समारंभाची सुरुवात करतो व त्यामुळे कोणता हेतू पूर्ण होतो?

▪ नवीन करार कोणामध्ये आहे व तो करार काय साध्य करतो?