व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वर्गाकडून संदेश

स्वर्गाकडून संदेश

अध्याय १

स्वर्गाकडून संदेश

संपूर्ण पवित्र शास्त्र, हा वस्तुतः स्वर्गाकडून आलेला संदेश असून आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्या शिक्षणासाठी तो दिलेला आहे. तथापि, “देवासमोर उभा” राहणाऱ्‍या एका देवदूतामार्फत, साधारणतः २,००० वर्षांपूर्वी दोन विशेष संदेश देण्यात आले. त्या देवदूताचे नाव आहे, गब्रीएल. पृथ्वीस दिलेल्या या दोन महत्त्वपूर्ण भेटींच्या परिस्थितीची पाहणी आपण करू या.

हे इ.स.पू. ३ रे वर्ष आहे. यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात, यरूशलेमाजवळच जखऱ्‍या नावाचा यहोवाचा एक याजक राहतो. तो तसेच त्याची बायको अलीशिबा वयोवृद्ध झाले आहेत. शिवाय त्यांना मूलबाळ नाही. जखऱ्‍या, आपल्या वर्गाच्या क्रमानुसार, यहोवाच्या मंदिरात याजकाचे काम करीत आहे. अचानक धूपवेदीच्या उजव्या बाजूस गब्रीएल प्रकट होतो.

जखऱ्‍या अतिशय घाबरतो. “जखऱ्‍या, भिऊ नको, कारण तुझी विनंति ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी, अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव,” असे सांगून गब्रीएल त्याची भीती घालवतो. योहान “यहोवाच्या दृष्टीने महान” होईल, तसेच तो “यहोवासाठी योग्य प्रजा तयार करील,” अशी घोषणा पुढे गब्रीएल करतो.

पण, जखऱ्‍याचा या गोष्टीवर विश्‍वास बसत नाही. त्या उतारवयात त्याला व अलीशिबेला मूल होणे अशक्य वाटते. यासाठीच, गब्रीएल त्याला सांगतोः “हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही, कारण . . . माझ्या वचनांवर तू विश्‍वास ठेवला नाही.”

त्यावेळी, मंदिरात जखऱ्‍याला इतका उशीर का लागत आहे याबद्दल लोक बाहेर आश्‍चर्य करीत आहेत. शेवटी तो बाहेर येतो तेव्हा त्याला बोलता येत नाही, परंतु हातांनी खुणा करता येतात, तेव्हा त्याने काहीतरी अद्‌भुत पाहिले असल्याचे त्यांच्या लक्षात येते.

मंदिराच्या सेवेचे आपले दिवस पूर्ण झाल्यावर जखऱ्‍या घरी परत येतो. आणि थोड्या दिवसानंतर ती गोष्ट खरीच घडते—अलीशिबा गर्भवती राहते! त्या अवस्थेत ती पाच महिने लोकांच्या नजरेआड आपल्या घरी राहते.

त्यानंतर गब्रीएल पुन्हा प्रकट होतो. आणि तो कोणाशी बोलतो? नासरेथ गावाच्या मरीया नावाच्या तरुण कुमारीशी. यावेळी तो कोणता संदेश देतो? ऐका! गब्रीएल मरीयेस सांगतोः “देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव.” गब्रीएल पुढे म्हणतोः “तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील, . . . तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”

हे संदेश देण्याचा सन्मान मिळाल्याबद्दल गब्रीएलला आनंद वाटत असणार याची आपण खात्री बाळगू शकतो. योहान व येशूविषयीची अधिक माहिती मिळवू तेव्हा स्वर्गाकडून आलेले हे संदेश इतके महत्त्वपूर्ण का आहेत ते आपल्याला अधिक स्पष्टपणे समजेल. २ तीमथ्य ३:१६; लूक १:५-३३.

▪ स्वर्गाकडून कोणते दोन महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आले?

▪ संदेश कोण देतो व कोणाला ते दिले जातात?

▪ या संदेशावर विश्‍वास ठेवणे इतके कठीण का आहे?